चिपळूण येथे अद्ययावत रुग्णालय उभारावे !

बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुका समन्वयक दिलीपराव चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

चिपळूण – जिल्ह्यातील जनतेला वैद्यकीय सेवेचा लाभ होण्यासाठी मुंबईतील के.ई.एम्.च्या धर्तीवर चिपळूण येथे अद्ययावत रुग्णालय उभारावे, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेनेचे चिपळूण तालुका समन्वयक दिलीपराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की,

१. रत्नागिरी जिल्हा आजही वैद्यकीय सेवेच्या संदर्भात तेवढा प्रगतीशील नाही.
२. जिल्हा रुग्णालय जिल्ह्याच्या टोकाला असल्यामुळे एका बाजूला मंडणगड आणि दुसर्‍या बाजूला राजापूरसह अन्य तालुक्यांतील रुग्णांना या रुग्णालयात वैद्यकीय सेवा घेतांना फरफट होते.
३. उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्यकेंद्रातही योग्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने नाइलाजास्तव अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो.
४. शासकीय रुग्णालयांची अवस्था बिकट असल्याने तेथे उपचार घेणार्‍यांची संख्याही न्यून आहे.
५. कामथे (ता. चिपळूण) येथे उपजिल्हा रुग्णालय आहे; मात्र तेथे आधुनिक वैद्यकीय सुविधा नाहीत. वैद्यकीय अधिकार्‍यांचीही संख्या अल्प आहे.
६. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना आणि अन्य शासकीय योजना खासगी रुग्णालयास लागू असल्या, तरी शासकीय अनुदान घेऊनही रुग्णांना दिलासा मिळत नाही. परिणामी, अनेक रुग्णांना मिरज, कोल्हापूर, कराड, मुंबई किंवा पुणे येथे आजही जावे लागते. यातून रुग्णांची ये-जा आणि उपचाराऐवजी अन्य गोष्टींसाठीच अधिक खर्च होतो. यात अनेक रुग्ण भरडले जातात.

संपादकीय भूमिका

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसणे, हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !