काँग्रेस पुन्हा ‘भारत जोडो’ यात्रा काढणार !

रायपूर (छत्तीसगड) – येथे काँग्रेसच्या ८५ व्या अधिवेशनाची सांगता झाली. २४ ते २६ फेब्रुवारी या काळात हे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. शेवटच्या दिवशी काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी सांगितले, ‘काँग्रेस अरुणाचल प्रदेश ते गुजरातपर्यंत भारत जोडो यात्रा काढण्याचा विचार करत आहे.’ या वेळी राहुल गांधी यांनी भाषण केले. त्यांनी त्यांच्या भाषणात भारत जोडो यात्रा, अदानी-हिंडेनबर्ग प्रकरण, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे चीनवरील वक्तव्य आणि वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसह अनेक सूत्रांवर मते मांडली.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आदल्या दिवशी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले. ‘राहुल यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेने माझा कार्यकाळ संपुष्टात येत आहे, याचा सर्वाधिक आनंद वाटत आहे’, असे विधान त्यांनी या वेळी केले.