शी जिनपिंग : चीनला युद्धाच्‍या खाईत लोटू शकणारे ‘द रेड एम्‍परर’ !

शी जिनपिंग यांच्‍या क्रूर क्‍लृप्‍त्‍या पहाता भारताने त्‍यापासून वाचण्‍यासाठी आक्रमक धोरण अवलंबणे आवश्‍यक !

(‘द रेड एम्‍परर’ म्‍हणजे लाल सम्राट)

‘चीनचे राष्‍ट्राध्‍यक्ष शी जिनपिंग यांची कारकीर्द अतीमहत्त्वाकांक्षा असलेली आणि अन्‍य देशांच्‍या कुरापती काढणारी आहे. यामध्‍ये भूमी आणि सागरी विस्‍तारवादाचाही समावेश आहे. ‘साम्‍यवादी राजवटीच्‍या शताब्‍दीला, म्‍हणजे वर्ष २०४९ पर्यंत चीनला जागतिक महासत्ता बनवणे’, हे शी जिनपिंग यांचे स्‍वप्‍न आहे. गेल्‍या वर्षी म्‍हणजेच वर्ष २०२२ मध्‍ये चीनचा नवीन राजा म्‍हणून शी जिनपिंग यांनी पुन्‍हा एकदा सत्ता हातात घेतली आहे. यासह जिनपिंग यांनी स्‍वतःच्‍या साम्‍यवादी पक्षाच्‍या मुख्‍य समितीत त्‍यांना ‘होयबा’ म्‍हणणार्‍यांचा समावेश करून पक्षांतर्गत विरोध आधीच मोडून काढत स्‍वतःचे राष्‍ट्राध्‍यक्षस्‍थान आणखी बळकट केले आहे. ही समिती जिनपिंग सांगतील त्‍याप्रमाणेच वागते. जिनपिंग यांची राष्‍ट्राध्‍यक्षपदी सलग तिसर्‍यांदा झालेल्‍या निवडीचा चीनच्‍या आर्थिक स्‍थितीवर आणि आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर वाईट परिणाम झाला आहे.

१. शी जिनपिंग यांची राजवट ‘सामूहिक हत्‍या करणारी’ !

ब्रह्मा चेलानी

शी जिनपिंग हे ‘वूल्‍फ वॉरिअर’ डावपेच (लांडग्‍याप्रमाणे डावपेच) कार्यवाहीत आणत आहेत. यासह ते अन्‍य देशांना कर्जाचे मोठ्या प्रमाणात वितरण करून त्‍यांच्‍याभोवती त्‍याचे जाळे निर्माण करत आहेत. हा त्‍यांचा मनमानीपणा असून ते आंतरराष्‍ट्रीय कायद्याची फसवणूक करत आहेत. त्‍यामुळेच अमेरिकेतील अनेक प्रशासकांनी जिनपिंग यांच्‍या राजवटीला ‘सामूहिक हत्‍या करणारी’ किंवा ‘मानवतेविरुद्ध गुन्‍हा करणारी’, असे संबोधले आहे. नाझी राजवटीपासून शी जिनपिंग यांचे ‘शिनजिगांग गुलाग’, म्‍हणजे धार्मिक पार्श्‍वभूमीवर समाजातील लोकांना कैद करणे चालूच आहे. लाखो मुसलमान जिनपिंग यांच्‍या ‘गुलाग’मध्‍ये दीनपणे रहात आहेत. यासाठी त्‍यांना पाश्‍चिमात्‍य देशांकडून संमतीची आवश्‍यकता नाही.

२. कोरोना महामारीविषयी चीनकडून करण्‍यात आलेली कोल्‍हेकुई !

शी जिनपिंग यांच्‍या वाढत्‍या अधिकारशाहीची आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील किंमत चीनमध्‍ये चालू झालेल्‍या कोरोना महामारीमुळे झालेल्‍या विनाशकारी परिणामाच्‍या रूपात मोजावी लागत आहे. या महामारीमध्‍ये जगातील ६८ लाख लोक मृत्‍यूमुखी पडले आहेत. या महामारीला ३ वर्षे होत आली, तरी ‘कोरोना हा प्राण्‍यांमुळे पसरला ? कि चीनमधील वुहान येथील प्रयोगशाळेतून गळती होऊन पसरला ?’, हे जगाला अजूनही ठाऊक नाही. वरवर असे दिसते की, जिनपिंग यांच्‍या राजवटीने या विषाणूच्‍या संसर्गाविषयी खोटी माहिती दिली, तसेच ‘हा विषाणू एका व्‍यक्‍तीतून दुसर्‍या व्‍यक्‍तीत संक्रमित होतो’, याचे पुरावे लपवून ठेवले. एवढेच नव्‍हे, तर या विषाणूविषयी माहिती देणार्‍या आधुनिक वैद्यांना ‘गप्‍प’ केले. कोरोना विषाणूची उत्त्पत्ती लपवण्‍यासाठी चीन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत होता, हे यावरून दिसून येते. याविषयी आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील अन्‍वेषणाला सहकार्य करण्‍यास जिनपिंग यांनी नकार दिला आणि अन्‍वेषणाच्‍या या कृतीला ‘ओरिजिन ट्रेसिंग टेरेरिझम’ (मूळ शोधण्‍याविषयीचा आतंकवाद) असे संबोधत उलट अन्‍य देश चीनच्‍या विरोधात कट रचत असल्‍याच्‍या अफवा पसरवल्‍या.

३. जागतिक महासत्ता बनण्‍यासाठी चीनचे अण्‍वस्‍त्रांंच्‍या सज्‍जतेविषयीचे धोरण

शी जिनपिंग यांनी राष्‍ट्रीय स्‍तरावर अण्‍वस्‍त्रे सिद्ध करण्‍याची गती एवढी वाढवली आहे की, ‘पेंटागॉन’ या अमेरिकेच्‍या संरक्षण मंत्रालयाने ‘चीन वर्ष २०३० पर्यंत ४०० ऐवजी १ सहस्र अण्‍वस्‍त्रे तैनात करील’, असा अंदाज वर्तवला आहे. पेंटागॉनच्‍या वृत्तानुसार चीनने त्‍याची ‘हायपरसॉनिक’ शस्‍त्रांची यंत्रणा अगोदरच कार्यान्‍वित केली आहे. यासह शांतता काळातील अण्‍वस्‍त्रांच्‍या संदर्भातील शस्‍त्रे ‘लाँच ऑन वॉर्निंग’ (प्रतिआक्रमणासाठी सज्‍ज) स्‍थितीमध्‍ये अधिक क्षमतेने वाढवण्‍याचे ध्‍येय ठेवले आहे. अण्‍वस्‍त्रांंच्‍या सज्‍जतेविषयी असलेली ही अभूतपूर्व गती आणि वाढ याचा शी जिनपिंग यांच्‍या विस्‍तारवादाशी अन् वर्ष २०४९ पर्यंत जागतिक महासत्ता बनण्‍याच्‍या ध्‍येयाशी थेट संबंध आहे. यामुळे जागतिक स्‍तरावर चीनची प्रतिमा अगदीच खराब झाली आहे. वर्ष २०२१ मध्‍ये केलेल्‍या जागतिक सर्वेक्षणानुसार ‘आर्थिक सुब्‍बता’ असणार्‍या देशांत चीनविरोधी विचार सर्वाधिक प्रमाणात आहे.

४. चीनचे अन्‍य देशांच्‍या भूमीवर वाढत असलेले अतिक्रमण

तरीही याविषयी काही सुधारणा करण्‍याऐवजी जिनपिंग यांनी तैवानशी गुंडगिरीने वागण्‍यास आरंभ केला आहे. चीनला हाँगकाँग गिळंकृत करण्‍यात यश मिळाल्‍यानंतर त्‍याने दक्षिण चीन सागराच्‍या सीमरेषा पालटल्‍या आणि भूमीवर भारत, नेपाळ, भूतान यांच्‍या सीमेवरील हिमालयाच्‍या भागांवर अतिक्रमण केले. आता तैवान हे त्‍याचे पुढचे लक्ष्य आहे. तथापि जिनपिंग यांचा बेलगाम अधिकार आंतरराष्‍ट्र्रीय सुरक्षा आणि चीनचे स्‍वतःविषयीचे भविष्‍य यांसाठी चांगला नाही. ते चीनला युद्धात ढकलू शकतात.

५. चीनच्‍या संस्‍थापकांचा अपूर्ण राहिलेला विस्‍तारवाद पूर्ण करण्‍याचा शी जिनपिंग यांचा प्रयत्न !

शी जिनपिंग यांच्‍या या विस्‍तारवादी वृत्तीमुळे आणि त्‍यांनी धाकदपटशाहने चीनची सलग तिसर्‍यांदा सत्ता बळकावली आहे. त्‍यामुळे त्‍यांची तुलना मागच्‍या शतकातील क्रूर राज्‍यकर्त्‍यांशी होऊ लागली आहे. अमेरिकेचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रंप यांचे राष्‍ट्रीय सुरक्षा सल्‍लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी शी जिनपिंग यांची रशियाचे हुकूमशहा जोसेफ स्‍टॅलीन यांच्‍याशी तुलना केली आहे. इतर काही जणांनी जिनपिंग यांची तुलना जर्मनीच हुकूमशाह अ‍ॅडॉल्‍फ हिटलर याच्‍याशी करून त्‍यांना उपहासाने ‘शीटलर’ असे टोपणनाव दिले आहे. एकूणच जिनपिंग यांनी माओ झेडांग यांच्‍याप्रमाणे स्‍वतःची प्रतिमा निर्माण केली असून ते माओवादी चीनच्‍या संस्‍थापकांकडून अपूर्ण राहिलेला विस्‍तारवादाचा हेतू पूर्ण करत आहेत.

‘माओ झेडांग यांच्‍या विचारसरणीप्रमाणे माझी विचारसरणी चीनच्‍या राज्‍यघटनेत अंतर्भूत व्‍हावी, तसेच माओवादी पक्षाला मार्गदर्शन करणारी मुख्‍य तत्त्वप्रणाली व्‍हावी’, असे शी जिनपिंग समजत असावेत. माओ यांच्‍याप्रमाणे शी जिनपिंग यांना आदरपूर्वक ‘रेनमिंग लिंगश्‍यू’ (‘लिंगश्‍यू’ हा शब्‍द चीनमध्‍ये नेत्‍यांविषयी आदरपूर्वक वापरला जातो) किंवा ‘लोकांचा नेता’ असे संबोधले जाते. चीनचा हा ‘नवीन माओ’ (जिनपिंग) हा प्राचीन मार्क्‍स किंवा लेनिन यांच्‍या विचारसरणीशी बांधील असला, तरी तो ‘फॅसिझम’ (हुकूमशाही) सिद्ध करत असल्‍याचे अधोरेखित होते.

६. ‘बेल्‍ट अँड रोड इनिशिएटीव्‍ह’ हा चीनचा विस्‍तारवाद दर्शवणारा धूर्त उपक्रम !

(टीप : बेल्‍ट अँड रोड इनिशिएटीव्‍ह म्‍हणजे आशिया, आफ्रिका आणि युरोप खंडातील विविध देशांना जोडण्‍याची योजना)

चीनचे स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यासाठी शी यांच्‍या डावपेचांमधील महत्त्वाचा घटक म्‍हणजे ‘वन बेल्‍ट वन रोड’ हा प्रकल्‍प. याच प्रकल्‍पाला ‘बेल्‍ट अँड रोड इनिशिएटीव्‍ह’ (बी.आर्.आय.) असेही म्‍हटले जाते. या प्रकल्‍पाच्‍या अंतर्गत चीनने परदेशात पायाभूत सुविधा निर्माण करण्‍यासाठी गुंतवणूक केली असून इतर राष्‍ट्रांना चीनच्‍या कक्षेत आणणे, हे त्‍याचे धूर्त ध्‍येय आहे. जिनपिंग यांनी या प्रकल्‍पाला ‘शतकातील प्रकल्‍प’ (द प्रॉजेक्‍ट ऑफ द सेंच्‍युरी) असे म्‍हटले आहे. ‘बी.आर्.आय.’ हा ‘मार्शाल आराखड्या’पेक्षा (दुसर्‍या महायुद्धानंतर पश्‍चिम युरोपमधील उद़्‍ध्‍वस्‍त झालेली अर्थव्‍यवस्‍था उभारण्‍यास अमेरिकेचे सचिव जार्ज मार्शाल यांनी सुचवलेल्‍या आराखड्यापेक्षा) १२ पटींनी मोठा आहे.

‘बी.आर्.आय.’ प्रकल्‍पाला जरी अलीकडे कर्जाच्‍या सापळ्‍याच्‍या भीतीने भागीदार देशांकडून विरोध होत असला आणि चीनला त्‍याचे पाऊल मागे घ्‍यावे लागले असले, तरी त्‍याचे परिणाम सर्वदूर पसरलेले आहेत. या परिणामांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ‘बी.आर्.आय.’ प्रकल्‍प हा चीनचा विस्‍तारवाद दर्शवणारा उपक्रम आहे. जिनपिंग हे त्‍यांचे परराष्‍ट्राविषयीचे आक्रमक धोरण पुढे रेटण्‍यासाठी या प्रकल्‍पाचा वापर करत आहेत.

(क्रमशः)

– प्रा. ब्रह्मा चेलानी, परराष्‍ट्र विश्‍लेषक, नवी देहली (३०.१०.२०२२) (साभार : www.chellaney.net)

(प्रा. ब्रह्मा चेलानी हे ‘सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’ या केंद्रात ‘स्‍ट्रेटेजिक स्‍टडीज’ (धोरणात्‍मक अभ्‍यास) या विषयाचे प्राध्‍यापक आहेत. त्‍यांना बर्लिन (जर्मनी) येथील ‘रॉबर्ट बॉश अकादमी’ ही शिष्‍यवृत्ती मिळाली असून त्‍यांनी एकूण ९ पुस्‍तके लिहिली आहेत. यामध्‍ये ‘एशियन जगरनॉट : वॉटर’, ‘एशियाज न्‍यू बॅटलग्राऊंड’, ‘वॉटर पीस अँड वॉर : कन्‍फ्रंटिंग द ग्‍लोबल वॉटर क्रायसिस’, या पुस्‍तकांचा समावेश आहे.)