भगवंतालाही ज्यांना पहावेसे वाटते, अशा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

भक्ताला भगवंताचे दर्शन घेण्याची आस असते. भगवंताला स्वतःलाच ज्या भक्ताचे दर्शन घ्यावेसे वाटत असेल, तो भक्त किती थोर असेल ? त्या आहेत भक्तीमय अंतःकरणाने भगवंताला प्रसन्न करून घेणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ! सप्तर्षी जीवनाडीपट्टीमध्ये सांगितले आहे, ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून स्वयं श्रीदेवी पृथ्वीवर अवतरली आहे.’ स्वतः महालक्ष्मीस्वरूप असूनही अत्यंत भक्तीभावाने ज्या भगवंताला आळवतात, त्या श्रीचित्‌‌शक्ति गाडगीळकाकू यांच्या वर्ष २०२१ मध्ये झालेल्या वाढदिवसाला तिरुपती बालाजीने घडवलेली लीला पाहूया !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१.  ‘श्रीविष्णूला कार्तिकपुत्रीला पहावेसे वाटत आहे’, असे सप्तर्षींनी नाडीवाचनात सांगणे

१५.१२.२०२१ ला झालेल्या १९४ व्या नाडीवाचनात सप्तर्षी म्हणाले होते की, ‘मार्गशीर्ष मास हा श्रीविष्णूची भक्ती करण्याचा मास आहे. संगीताच्या माध्यमातून त्याची स्तुती करण्याचा मास आहे. भगवान तिरुपती बालाजी कार्तिकपुत्रीची (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची) आठवण काढत आहे. १७ डिसेंबर २०२१ या दिवशी तिथीप्रमाणे कार्तिकपुत्रीचा वाढदिवस आहे. या दिवशी कार्तिकपुत्रीने तिरुपती बालाजीचे दर्शन घ्यावे. एरव्ही कार्तिकपुत्रीला श्रीविष्णूचे दर्शन घ्यायचे असते, या वेळी मात्र श्रीविष्णूला कार्तिकपुत्रीला पहायचे आहे; म्हणून त्याने कार्तिकपुत्रीला तिरुपती येथे बोलवले आहे.’

श्री तिरुपती बालाजी

२. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या वाढदिवसाच्या शुभदिनी तिरुपती बालाजीचे जवळून दर्शन घेता येणे

सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तिरुपतीला जायचे ठरवले. तिरुपती बालाजीचे दर्शन घ्यायचे असल्यास किमान १-२ मास आधी नियोजन करावे लागते; मात्र सप्तर्षींच्या कृपेने या वेळी १-२ दिवसांतच आमची दर्शनाची सोय झाली. यापूर्वी आम्ही जेव्हा जेव्हा तिरुपती येथे दर्शनाला गेलो होते, तेव्हा आम्हाला बालाजीचे दर्शन गाभार्‍यातील ‘जय-विजय द्वार’ या तिसर्‍या द्वारातून झाले होते. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या वाढदिवसाच्या शुभदिनी मात्र आम्हाला बालाजीचे दर्शन पहिल्या द्वारातून म्हणजे अगदी जवळून झाले.

श्री. विनायक शानभाग

३. तिरुपती बालाजीने श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘तुमच्या सर्व प्रार्थना पूर्ण करणार’, असा आशीर्वाद देणे

तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन आम्ही चेन्नईला परत आलो आणि सप्तर्षींनी नाडीवाचन केले. त्या नाडीवाचनात सप्तर्षी म्हणाले, ‘दर्शनाच्या वेळी कार्तिकपुत्री बालाजीला हात वर करून काहीतरी दाखवत होत्या, त्या वेळी देवलोकात देवतांनाही कळत नव्हते की, कार्तिकपुत्री काय करत आहे ? भगवान तिरुपती बालाजी कार्तिकपुत्रीकडे पहात होते. बालाजी म्हणाले, ‘मी तुमच्याकडे बघत आहे. तुमच्या सर्व प्रार्थना मी पूर्ण करणार आहे.’’

४. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी करुंगाळीच्या लाकडाची जपमाळ देवाला दाखवून साधकांच्या रक्षणासाठी प्रार्थना करणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हातात सप्तर्षींनी दिलेली एक करुंगाळी वृक्षाच्या लाकडाची जपमाळ होती. ती त्यांना धारण करायची होती. ‘आधी बालाजीला दाखवून मग ती माळ धारण करायचे’, असे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ठरवले होते. जसे जसे त्या देवाच्या जवळ जात होत्या, तसे तसे त्यांनी हात वर करून बालाजीला ती माळ दाखवली आणि प्रार्थना केली, ‘‘देवा, सर्व साधकांच्या रक्षणासाठी मला ही माळ धारण करायची आहे. तुला आपत्काळात सर्व साधकांचे रक्षण करायचे आहे.’’

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), चेन्नई (२२.११.२०२२)

धन्य त्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि धन्य त्यांची साधकवत्सलता !

भगवंताला त्यांना पहावेसे वाटत असतांनाही श्रीचित्‌‌शक्ति काकूंच्या मनात मात्र साधकांच्या रक्षणाचाच विचार होता. त्यांनी देवाला तेव्हाही तशीच प्रार्थना केली. तिरुपती बालाजीनेही नाडीवाचनाच्या माध्यमातून सर्व प्रार्थना पूर्ण करण्याचा आशीर्वाद त्यांना दिला आणि साधकांच्या रक्षणाचे दायित्वच घेतले आहे ! वर्षानुवर्षे कठोर तपश्चर्या करणार्‍या भक्तांवर भगवंत प्रसन्न होतो आणि ‘तुला पाहिजे तो वर माग’, असे सांगतो, हे आम्ही पौराणिक कथांमध्ये वाचले आहे. ‘अशा दिव्य घटना आम्हाला कधी प्रत्यक्ष पहायला मिळतील’, याची साधकांनी कल्पनाही केली नव्हती. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून या दिव्य अनुभूती आम्हाला ‘याची डोळा याची देही’ घेता येत आहेत, यासाठी आम्ही तिरुपती बालाजी आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहोत !’

– श्री. विनायक शानभाग, चेन्नई (२२.११.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक