उत्तराखंडमधील भाजप सरकारकडून पतंजलीच्या ५ औषधांवर बंदी

काही पालट करून पुन्हा अनुज्ञप्ती घेऊन औषधांची विक्री करण्याची सरकारची सूचना

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडमधील भाजप सरकारने योगऋषी रामदेवबाबा यांच्या पतंजलि समूहाच्या ५ औषधांवर बंदी घातली आहे. ही औषधे पतंजलीच्या ‘दिव्य फार्मसी’मध्ये बनवली जातात. रक्तदाब, मधुमेह, गलगंड, काचबिंदू आणि उच्च कोलेस्ट्रॉल यांच्यावरील बीपी ग्रिट, मधुग्रिट, थायरोग्रिट, लिपिडोम अन् आयग्रिट गोल्ड या ओषधांवर ही बंदी घालण्यात आली आहे.

१. उत्तराखंड सरकारच्या आयुर्वेद आणि यूनानी अनुज्ञप्ती विभागाने बंदी घालतांना म्हटले आहे की, या औषधांची विज्ञापने भ्रामक आहेत.

२. केरळमधील डॉ. के.व्ही. बाबू यांनी जुलै मासामध्ये तक्रार प्रविष्ट केली होती की, पतंजलीच्या दिव्य फार्मसीने ‘ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज (ऑब्जेक्शनेबल अ‍ॅडव्हर्टायझमेंट) अ‍ॅक्ट १९५४’, ‘ड्रग्स अँड कॉस्मेटिक अ‍ॅक्ट १९४०’ आणि ‘ड्रग्स अँड कॉस्मेटिक रूल्स १९४५’ या कायद्यांचे सातत्याने उल्लंघन केले आहे.

३. बंदीच्या आदेशामध्ये सरकारने म्हटले आहे की, पतंजलीने या औषधांच्या लेबलमध्ये काही पालट करून पुन्हा अनुज्ञप्ती घ्यावी. त्यानंतरच या औषधांचे विज्ञापन करावे.’ याचा अर्थ काही पालट करून पतंजलि पुन्हा या औषधांची निर्मिती करू शकते.

हे आयुर्वेदविरोधी ड्रग माफियांचे षड्यंत्र ! – योगऋषी रामदेवबाबा

याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना योगऋषी रामदेवबाबा म्हणाले, ‘‘अद्याप आम्हाला या आदेशाची प्रत मिळालेली नाही. या औषधांवर बंदी घालण्याच्या मागे आयुर्वेदविरोधी ड्रग माफियांचे षड्यंत्र आहेे. सरकारी विभागाने स्वतःची चूक सुधारत दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा पतंजलीच्या झालेल्या हानीची भरपाई द्यावी. भरपाई न दिल्यास कायदेशीर कारवाईसाठी सिद्ध रहावे.’’