महिला तस्करीविषयी राज्य आणि राष्ट्रीय महिला आयोग संयुक्त कार्यक्रम राबवणार ! – रूपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग

पुणे – महिलांची तस्करी देशातून मोठ्या प्रमाणात होत आहे. यामागे आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत आहे. या संदर्भात राज्य आणि राष्ट्रीय महिला आयोग संयुक्त कृती कार्यक्रम राबवणार आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांनी दिली. संभाजीनगर येथून ३९ दिवसांत ५८ महिला गायब झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर त्या पुणे येथे बोलत होत्या.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या रेखा शर्मा यांची भेट घेऊन चाकणकर यांनी राज्यातील महिलांवरील आघातांविषयी माहिती दिली. त्यांनी संभाजीनगरच्या प्रकरणाची गांभीर्याने नोंद घेतली, असे त्यांनी या वेळी सांगितले. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना त्या संदर्भात समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही संभाजीनगरच्या घटनेच्या संदर्भात पत्र पाठवले आहे, असे त्या म्हणाल्या.