Revanth Reddy : ‘माझ्या कुटुंबियांविरुद्ध बोललात, तर विवस्त्र करून रस्त्यावर चोप देईन !’

  • काँग्रेसशासित तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे विधान

  • कुटुंबातील महिलांविषयी वापरलेल्या भाषेमुळे रक्त उसळत असल्याचेही विधान

रेवती पोगदंडा आणि तन्वी यादव यांना अटक

भाग्यनगर (तेलंगाणा) – माझ्या कुटुंबियांविरुद्ध काही बोललात, तर विवस्त्र करून रस्त्यावर चोप देईन, अशा शब्दांत काँग्रेसशासित तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी त्यांच्यावर टीका करणार्‍यांना धमकी दिली.

‘पल्स न्यूज’ नावाच्या यू ट्यूब वाहिनी चालवणार्‍या रेवती पोगदंडा आणि त्यांच्या सहकारी संध्या उपाख्य तन्वी यादव यांनी मुख्यमंत्री रेड्डी अन् त्यांच्या कुटुंबियांविषयी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केली होती. या प्रकरणी पोलिसांनी १० मार्चला दोघींविरुद्ध गुन्हा नोंदवून १२ मार्चला त्यांना अटक केली.

पोलिसांचे म्हणणे आहे की, या दोन्ही महिलांनी राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या बी.आर्.एस्. पक्षाच्या (भारत राष्ट्र समिती या पक्षाच्या) कार्यालयात या व्हिडिओचे चित्रीकरण केले आहे. कुटुंबियांवर झालेल्या टीकेमुळे रेड्डी चांगलेच संतप्त झाले.

मुख्यमंत्री रेड्डी पुढे म्हणाले की,

रेवंत रेड्डी

१. माझ्या आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांविषयी अत्यंत अपमानास्पद भाषेत पोस्ट करण्यात आली. माझ्या कुटुंबातील महिलांविरुद्ध सामाजिक माध्यमांतील या पोस्टमध्ये वापरल्या जाणार्‍या भाषेमुळे माझे रक्त उसळत आहे.

२. ‘मी मुख्यमंत्री आहे म्हणून गप्प बसीन’, असे समजू नका. मी तुम्हाला विवस्त्र करून चोप देईन. माझ्या आज्ञेनुसार तुम्हाला मारण्यासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरतील. माझ्या स्वभावामुळे मी सहनशील रहातो. तथापि मी जे काही करीन, ते कायद्याच्या कक्षेत राहून करीन.

३. मी सार्वजनिक जीवनात वावरत असल्याने टीकेसाठी सदैव सिद्ध असतो; पण माझ्या कुटुंबातील सदस्यांना का लक्ष्य केले जाते ? पत्रकारितेच्या नावाखाली सामाजिक माध्यमांत अपमानास्पद मजकूर पसरवण्याची कुप्रथा संपेपर्यंत मी गप्प बसणार नाही. सामाजिक माध्यमांवर खोट्या बातम्या पसरवणार्‍यांना सोडणार नाही.

यू ट्यूब वाहिनी चालवणार्‍यांना पत्रकार मानले जाणार नाही !

सामाजिक माध्यमांत खोट्या बातम्या पसरवणार्‍यांचा मुखवटा आम्ही जनतेसमोर आणू. यू ट्यूब वाहिनी चालवणार्‍यांना पत्रकार मानले जाणार नाही. मी आमचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डी. श्रीधर बाबू, तसेच माहिती आणि जनसंपर्क मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांना मान्यताप्राप्त पत्रकारांची सूची सिद्ध करण्याचा आदेश दिला आहे. ज्यांचे नाव या सूचीत नसेल, ते पत्रकार नाहीत, तर गुन्हेगार आहेत. गुन्हेगारांना जशी वागणूक दिली जाते, तशीच वागणूक त्यांना दिली जाईल.

संपादकीय भूमिका

  •  जीभेवर संयम नसलेले मुख्यमंत्री ! राज्याच्या प्रमुखानेच अशी भाषा वापरणे, हा त्यांच्यातील असंस्कृतपणाच दर्शवतो !
  • केवळ स्वतःच्या कुटुंबातीलच नव्हे, तर राज्यातील कुठल्याही महिलेविषयी आक्षेपार्ह विधान करणार्‍यांवर किंवा हिंदु मुलींच्या विरोधात लव्ह जिहाद करणार्‍यांवर मुख्यमंत्र्यांनी कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे !