
विक्रोळी (मुंबई) – विक्रोळी पार्क येथील नीलकंठेश्वर मंदिर येथे ९ मार्च या दिवशी हिंदु युवक – युवतींसाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर पार पडले. यामध्ये कराटे, दंडसाखळी, लाठी-काठी यांचे प्रशिक्षण देण्यात आले, तसेच वक्त्यांनी भारतीय संस्कृती आणि भारताचा गौरवशाली इतिहास यांविषयी संबोधित केले.
या वेळी स्वसंरक्षण प्रशिक्षक कु. सिद्धी बाळे आणि कु. राज जाधव यांनी युवकांना संबोधित केले. स्थानिक हिंदुत्वनिष्ठ कु. सुहानी पांडे यांच्या प्रयत्नातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. स्वसंरक्षण प्रशिक्षणाने महिलांमध्ये आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे त्या प्रतिकार करून स्वरक्षण करतील’, असे कु. सुहानी पांडे म्हणाल्या.
‘प्रत्येक हिंदु स्त्रीने धर्माचरणासह शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ मिळवणे आवश्यक आहे’, असे कु. सिद्धी बाळे म्हणाल्या.
श्री. राज जाधव म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे पुत्र जन्माला येण्यासाठी आधी जिजामाता सिद्ध व्हायला हव्यात. त्यासाठी माता भगिनींनी चंगळवादी बॉलिवूड नट-नट्यांना आदर्श न मानता जिजामाता, राणी लक्ष्मीबाई, प्रीतीलता वड्डेदार, राणी चेन्नमा यांच्या सारख्या वीरांगनांचा आदर्श ठेवला पाहिजे. इतिहासातून प्रेरणा घेऊन मातृभूमीसाठी योगदान देण्यासाठी सिद्ध व्हायला हवे; कारण देश सुरक्षित नाही, तोपर्यंत आपण सुरक्षित नाही.’’