शैलजा आणि मॅगसेसे !

केरळच्या माजी आरोग्यमंत्री के.के. शैलजा

आशिया खंडातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘रामन मॅगसेसे’ पुरस्कार केरळच्या माजी आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांनी नाकारला. यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात बरीच चर्चा झाली. साम्यवादी राजकारणी म्हणे पक्षाशी बांधील असतात. त्यामुळे शैलजा यांना हा पुरस्कार घोषित झाल्यावर त्यांनी त्वरित मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला संपर्क करून पुरस्कार स्वीकारण्याविषयी विचारणा केली. पक्षाने ‘पुरस्कार स्वीकारू नये’, असा आदेश दिल्यावर शैलजा यांनी पुरस्कार नाकारला. त्याही या निर्णयाशी सहमत होत्या. फिलीपाईन्सचे सातवे राष्ट्रपती रामन मॅगसेसे यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो. मॅगसेसे यांनी साम्यवादी बंडखोरांच्या विरोधात सशस्त्र कारवाया करून त्यांचे कंबरडे मोडले होते. ‘ज्यांनी साम्यवादी विचारसरणी नाकारली, त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार कसा स्वीकारायचा ?’, हा माकपवाल्यांचा मूळ प्रश्न ! ‘तत्त्वात बसत नाही’ वगैरे कारण सांगून हा पुरस्कार नाकारल्यामुळे शैलजा यांचे समाजातील एका घटकाकडून कौतुक झाले; मात्र त्यांच्यावर माकपविरोधी लोकांकडून टीकाही झाली. एखादा प्रतिष्ठेचा पुरस्कार नाकारणे, याला तत्त्वनिष्ठता लागते, हे मान्य; मात्र साम्यवादी आणि तत्त्वनिष्ठता हे सूत्रच पचनी न पडणारे आहे.

अन्य पुरस्कार का स्वीकारले ?

शैलजा या केरळ सरकारच्या मागील मंत्रीमंडळात आरोग्यमंत्री असतांना त्यांनी निपाह संसर्ग आणि कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्याची नोंद घेत त्यांना मॅगसेसे पुरस्कार देण्यात आला. तो नाकारण्यामागे ‘प्रशासनाने संघटित प्रयत्न केले. कुणा एकाच्या प्रयत्नांमुळे महामारी आटोक्यात आली नाही’, असे माकपचे म्हणणे आहे. संघटित प्रयत्न करण्याचे सूत्र योग्यच आहे; मात्र सर्व यंत्रणांकडून हे प्रयत्न करवून घेणे आणि त्यांना दिशादर्शन करण्याचे काम हे नेतृत्व करणार्‍या व्यक्तीचे असते. शैलजा यांनी ते केले. त्यामुळे त्यांना त्याचे श्रेय मिळाल्यास माकपला पोटशूळ उठण्याचे कारण काय ? या कार्यामुळेच शैलजा यांना ‘सेंट्रल युरोपियन युनिव्हर्सिटी’ने वर्ष २०२१ मध्ये ‘ओपन सोसायटी’ पुरस्कार घोषित केला. कोरोना महामारी आटोक्यात आणल्याच्या कारणावरून संयुक्त राष्ट्रांनीही त्यांचा गौरव केला. त्या वेळी शैलजा यांनी नम्रपणे ‘माझा गौरव करू नका. केरळ प्रशासनाचा गौरव करा. त्याला पुरस्कार द्या’, असे का सांगितले नाही ? संयुक्त राष्ट्रांवर, तसेच युरोपमधील संस्था आणि विद्यापिठे यांच्यावर अमेरिकेचा प्रभाव आहे. अमेरिका आणि साम्यवादी यांचे वाकडे आहे. असे असतांना माकपवाल्यांना त्यांचे पुरस्कार किंवा त्यांनी केलेला गौरव चालतो, मग मॅगसेसे स्वीकारतांना तत्त्वनिष्ठता अचानक कशी काय जागृत झाली ? वैचारिक गोंधळ म्हणतात, तो हाच !

उद्या चीनने शैलजा यांना त्याचा सर्वाेच्च पुरस्कार देऊ केला, तर त्यांची प्रतिक्रिया अशीच असेल का ? अन्य साम्यवाद्यांप्रमाणे शैलजाही पक्क्या चीनप्रेमी आहे. ‘चीन भारताच्या सार्वभौमत्वावर आक्रमण करत असल्यामुळे चीनकडून पुरस्कार स्वीकारणार नाही’, असे म्हणण्याचे धारिष्ट्य शैलजा आणि त्यांचा माकप पक्ष दाखवेल का ? चीनच्या भारतविरोधी कारवायांना माकपवाल्यांची मूकसंमती आहे. एवढेच कशाला, चीनने वर्ष १९६२ मध्ये भारतावर केलेल्या आक्रमणाला साम्यवाद्यांनी उघड पाठिंबा दिला होता. या सर्व सूत्रांना उजाळा देण्याचे कारण म्हणजे तत्त्व किंवा विचारसरणी आदी कारणे सांगून पुरस्कार न स्वीकारणे आणि त्यातून स्वतःची प्रतिमा उंचावू पहाणे, ही माकपची मनीषा होती; मात्र या कृतीतून साम्यवाद्यांचा वैचारिक भंपकपणा पुन्हा एकदा उघड झाला.

समस्त स्त्रीवादी कुठे आहेत ?

साम्यवाद्यांना स्त्रीस्वातंत्र्याचा पुळका असतो; मात्र हेच साम्यवादी स्वपक्षातील कार्यकर्त्या किंवा नेत्या यांची मात्र गळचेपी करतात. शैलजा यांची ‘आरोग्यमंत्री’ म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर ओळख वाढू लागल्यावर त्यांना राज्याच्या ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून ओळखले जाऊ लागले. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांना ही गोष्ट खटकली. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत त्या भरघोस मताधिक्याने पुन्हा एकदा निवडून येऊनही त्यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले नाही. यामुळे माकपवर टीकेची झोड उठवण्यात आली. त्या वेळी ‘नवीन आमदारांना संधी देण्यात येईल’, असे पक्षाकडून सांगण्यात आले. या कारणावर कोण विश्वास ठेवणार ? कारण ‘हाच नियम मुख्यमंत्री विजयन् यांना का लागू करण्यात आला नाही ?’, असे सामान्य जनतेकडून विचारण्यात आले. या प्रश्नाचे उत्तर मात्र विजयन् यांच्याकडे नव्हते; कारण ते स्वतः मात्र दुसर्‍यांदा मुख्यमंत्री झाले. ‘निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांपैकी एकाला मुख्यमंत्रीपद देऊया’, असा मोठेपणा त्यांनी दाखवला नाही. थोडक्यात विजयन् यांनी पक्षाच्या ध्येय-धोरणांचा आधार घेत त्यांच्या प्रतिस्पर्ध्याची राजकीय कारकीर्द संपवली. आताही ‘शैलजा यांना मॅगसेसे पुरस्कार मिळाल्यास त्यांची प्रतिमा उंचावेल’, तसेच ‘पुन्हा त्यांच्या कर्तृत्वाचा पाढा वाचून त्यांच्याकडे मुख्यमंत्री म्हणून पाहिले जाईल’, या कारणामुळेच शैलजा यांना पुरस्कार नाकारण्यास सांगण्यात आले.

‘शैलजा यांनी मॅगसेसे पुरस्कार स्वीकारणे योग्य कि अयोग्य ?’, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात इतरांनी ढवळाढवळ करण्याचे काहीच कारण नाही; मात्र तत्त्वनिष्ठतेची झूल पांघरून जर जनतेला वेड्यात काढण्याचा प्रयत्न होत असेल, तर साम्यवाद्यांचा समाचार घेणे आवश्यक आहे. शैलजा या पक्क्या स्त्रीवादी म्हणून ओळखल्या जातात; मात्र पक्षाने त्यांच्या संदर्भात जे काही निर्णय घेतले, त्यावरून त्यांची स्थिती ‘इकडे आड, तिकडे विहीर’, अशी झाली आहे. ‘पक्षाची बाजू घ्यायची कि स्वतःच्या आत्मसन्मानाचे रक्षण करायचे ?’, हेच त्यांना बहुदा कळेनासे झाले आहे. असे असले, तरी साम्यवादी शैलजा यांच्याविषयी सहानुभूती बाळगण्याचे काही कारण नाही. तत्त्वहीन, दिशाहीन अन् राष्ट्रघातकी विचारांना खतपाणी घालणारे पक्ष अन् त्यांचे नेते यांच्याविषयी राष्ट्रप्रेमींना कणव का असावी ? मॅगसेसे प्रकरणामुळे साम्यवाद्यांचा वैचारिक कोतेपणा पुन्हा एकदा जगासमोर आला एवढे मात्र खरे !

राष्ट्रहितासाठी घातक असणारा साम्यवाद भारतातून हद्दपार करण्यासाठी भारतातील बुद्धीजीवींनी पुढे यावे !