केंद्रशासनाकडून ‘भारतीय शिक्षण बोर्ड’ची स्थापना

  • योगऋषी रामदेवबाबा यांच्या ‘पतंजलि योगपीठ ट्रस्ट’कडे दायित्व !

  • केंद्रशासनाचा अभिनंदनीय निर्णय !

नवी देहली – केंद्रशासनाने स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर ‘भारतीय शिक्षण बोर्ड’ची स्थापना केली आहे. याचे संचालन करण्याचे दायित्व योगऋषी रामदेवबाबा यांच्या ‘पतंजलि योगपीठ ट्रस्ट’ला देण्यात आले आहे. यासाठी रामदेवबाबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले आहेत. वर्ष २०१५ मध्ये रामदेवबाबा यांनीच अशा प्रकारच्या शिक्षण मंडळाची कल्पना केंद्रशासनाकडे मांडली होती; मात्र तेव्हा ती फेटाळून लावण्यात आली होती.

‘भारतीय शिक्षण बोर्ड’ देशातील शाळांसाठीचा पहिले राष्ट्रीय शिक्षण मंडळ असणार आहे. हे मंडळ अभ्यासक्रम सिद्ध करणे, शाळांची नोंदणी करणे, परीक्षा आयोजित करणे प्रमाणपत्र देणे आदी कार्य करणार आहे. या मंडळाकडून भारतीय पारंपरिक ज्ञान शिकवण्यासह आधुनिक शिक्षणही देण्यात येणार आहे. सी.बी.एस्.ई.च्या (‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या) धर्तीवर हे शिक्षण मंडळ असणार आहे.

भारतीय तरुणांना जगाचे नेतृत्व करण्यास शिकवू ! – योगऋषी रामदेवबाबा

याविषयी योगऋषी रामवेबाबा म्हणाले की, वर्ष १८३५ मध्ये ब्रिटीश अधिकारी मेकॉले याने जे पाप केले आहे, ते धुण्याचे काम ‘पतंजलि भारतीय शिक्षण बोर्ड’च्या माध्यमातून केले जाणार आहे. आता विद्यार्थ्यांची मानसिकता भारतीयत्वानुसार केली जाईल. आम्ही देशातील तरुणांना नेतृत्व करण्यास शिकवू. ते भारताचेच नाही, तर संपूर्ण जगाचे नेतृत्व करतील.