आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

(भाग २२)

वास्तूशुद्धी होण्यासाठी घरातील कोळीष्टके त्वरित काढावीत !

पू. तनुजा ठाकूर

१. कोळीष्टकांमुळे अनिष्ट शक्ती घरात अधिक प्रमाणात आकृष्ट होणे आणि त्यातूनच कलह, व्याधी अन् अन्य समस्या निर्माण होणे

ज्या घरात किंवा वास्तूमध्ये कोळीष्टके असतात, तेथे आध्यात्मिक त्रासाचे प्रमाण अधिक असते. कोळीष्टके एकप्रकारे अशुभच असतात. हा अंधविश्वास नाही, तर त्याच्यामागे वैज्ञानिक आणि धार्मिक कारण आहे. कोळीष्टके जर पुष्कळ दिवसांपासून राहिली, तर त्यात अनिष्ट शक्ती वास करू लागतात. त्यामुळे पडके घर किंवा जुने घर जेथे कुणी रहात नाही, तेथे आपल्याला दाट कोळीष्टके आढळून येतात. कोळ्याच्या जाळ्याची रचनाच अशी असते की, त्याच्या दिशेने अनिष्ट शक्ती लगेचच आकृष्ट होतात. घरातील तो कोपरा किंवा तो भाग नकारात्मक ऊर्जेने भरून जातो. त्यामुळे घरात कलह, व्याधी आणि अन्य समस्या निर्माण होतात.

२. कोळीष्टके असणाऱ्या घरांमध्ये आर्थिक चणचण भासणे, धनाचा नाश होणे हे परिणाम दिसणे आणि ही स्थिती सुधारण्यासाठी साधना, तसेच वास्तूशुद्धीचे उपाय नियमितपणे करणे आवश्यक असणे

काही जणांच्या घरात वारंवार आणि काही दिवसांतच किंवा प्रतिदिन कोळ्याचे जाळे सिद्ध होते. धर्मप्रसाराला गेल्यावर जेव्हा मी त्यांच्या घरांचे सूक्ष्म परीक्षण करायचे, तेव्हा मला लक्षात यायचे की, अशा घरांमध्ये अनिष्ट शक्तींचा त्रास पुष्कळ अधिक प्रमाणात असतो. तेथे कलह किंवा क्लेश अधिक असणे, आर्थिक चणचण भासणे, धनाचा कोणत्या ना कोणत्या कारणाने नाश होणे, असे त्रास अधिक प्रमाणात दिसून येतात. अशा स्थितीत योग्य साधना आणि वास्तूशुद्धीचे सर्व उपाय नियमित करायला पाहिजेत. ‘घरात नकारात्मक स्पंदने जेवढी अधिक, तेवढे वास्तूदेवतेचे तत्त्व अल्प प्रमाणात कार्यरत होते’, हा सोपा नियम लक्षात ठेवावा.

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासनापीठ (३०.२.२०२२)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.