‘विरामचिन्हे’ आणि त्यांचे भाषेतील कार्य !

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

‘प्रश्नचिन्ह’ आणि ‘संयोगचिन्ह’ यांच्या वापराची पद्धत !

‘प्राचीन काळी संस्कृत ही आर्यावर्तातील ज्ञानभाषा आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे संस्कृतपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या भाषांचे व्याकरणही स्वतंत्रपणे लिहिले गेले; मात्र त्याचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच होता. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

मागील लेखात आपण ‘अपूर्णविराम (:)’ कुठे लिहावा ?’, याविषयी जाणून घेतले. आजच्या लेखात ‘प्रश्नचिन्ह (?)’ आणि ‘संयोगचिन्ह (-)’ या दोन चिन्हांची माहिती पाहू.

(लेखांक ८ – भाग ७)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/585359.html


२ उ. प्रश्नचिन्ह : हे ‘?’ या खुणेने दाखवले जाते. लिखित भाषेत ‘प्रश्नचिन्हा’चा उपयोग पुढीलप्रमाणे केला जातो.

२ उ १. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह लिहिणे : एखादे वाक्य प्रश्नार्थक असेल, म्हणजे त्या वाक्याद्वारे एखादा प्रश्न विचारण्यात आला असेल, तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह लिहावे. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. रामाने वालीचा वध का केला ?

आ. लालबहादूर शास्त्री यांनी राष्ट्राच्या उत्कर्षासाठी कोणती घोषणा दिली ?

इ. हुतात्मा भगतसिंग यांचे संपूर्ण नाव काय ?

सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे

२ उ २. प्रश्नार्थक वाक्य अवतरणचिन्हात येणे : प्रश्नार्थक वाक्य एकेरी अथवा दुहेरी अशा कोणत्याही अवतरणचिन्हात येत असेल, तर वाक्याच्या शेवटी प्रथम प्रश्नचिन्ह द्यावे आणि नंतर अवतरणचिन्ह पूर्ण करावे. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. ‘सत्यवचनी रहाण्या’चा संकल्प केलेल्या सिद्ध पुरुषाला क्षणभर प्रश्न पडला, ‘शिकाऱ्याला सत्य सांगावे कि असत्य बोलून हरणाचे प्राण वाचवावेत ?’

आ. त्याने उत्सुकतेने समीरला विचारले, ‘‘तुझी अभ्यासातील एकाग्रता नामजपामुळे वाढली का ?’’

इ. महाराज दुष्यंत यांनी कोळ्याला (मासेमारी करणाऱ्याला) विचारले, ‘‘ही अंगठी तुला कुठे मिळाली ?’’

२ ऊ. संयोगचिन्ह : हे ‘-’ या खुणेने दाखवले जाते. लिखित भाषेत ‘संयोगचिन्ह’ पुढील ठिकाणी वापरतात.

२ ऊ १. दोन शब्द जोडणे : अर्थाच्या दृष्टीने परस्परांशी संबंधित असलेले दोन शब्द जोडतांना त्यांच्यामध्ये संयोगचिन्ह लिहिले जाते. एरव्ही अशा दोन शब्दांमध्ये ‘आणि’, ‘अथवा’, ‘किंवा’ इत्यादी शब्द लिहिले जातात. हे शब्द लिहिणे टाळावयाचे असल्यास त्यांच्याऐवजी संयोगचिन्हाचा उपयोग केला जातो. याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

आई-वडील, मामा-भाचे, देव-दानव, लक्ष्मी-सरस्वती, तीन-चार इत्यादी.

२ ऊ २. ओळीतील शेवटच्या शब्दातील काही अक्षरे त्या ओळीत आणि काही अक्षरे खालच्या ओळीत जाणे : एखाद्या ओळीतील शेवटचा शब्द मोठा असल्यास तो त्या ओळीत पूर्णपणे मावत नाही. त्यामुळे त्या शब्दातील काही अक्षरे त्या ओळीच्या खालच्या ओळीत लिहावी लागतात. अशा वेळी वरच्या ओळीतील शेवटची अक्षरे आणि खालच्या ओळीतील पहिली अक्षरे एकाच शब्दातील आहेत, हे कळण्यासाठी वरच्या ओळीतील अक्षरांच्या शेवटी संयोगचिन्ह दिले जाते. याचे उदाहरण पुढे दिले आहे.

अ. प्रसिद्धी मिळालेले काही लोक अभ्यास नसलेल्या विषयां-वरही अधिकारवाणीने बोलतात.

२ ऊ ३. सनातनच्या वाङ्मयात नेहमी वापरल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण शब्दांत संयोगचिन्ह वापरण्याची पद्धत !

२ ऊ ३ अ. ‘सूक्ष्म-चित्र’ या शब्दांमध्ये संयोगचिन्ह देणे : मराठी भाषेत ‘सूक्ष्म’ या शब्दाचा अर्थ ‘अती लहान’ असा आहे. त्यामुळे ‘सूक्ष्म चित्र’ असे दोन शब्दांमध्ये संयोगचिन्ह न देता लिहिले, तर त्याचा अर्थ ‘अती लहान चित्र’, असा होऊ शकतो; परंतु सनातनच्या वाङ्मयात हा अर्थ अभिप्रेत नाही. सनातननुसार ‘सूक्ष्म-चित्र’ म्हणजे ‘मनुष्याला साध्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या अशा सूक्ष्मातून घडलेल्या घडामोडी दाखवणारे चित्र होय.’ संयोगचिन्ह दिल्यामुळे ‘सूक्ष्म’ आणि ‘चित्र’ हे दोन्ही शब्द परस्परांशी जोडले जातात आणि त्याद्वारे अपेक्षित असा अर्थ प्राप्त होण्यास साहाय्य होते. यासाठी ‘सूक्ष्म-चित्र’ या शब्दांमध्ये संयोगचिन्ह लिहावे. असाच आणखी एक शब्द म्हणजे ‘सूक्ष्म-चित्रकर्त्या’.

२ ऊ ३ आ. ‘सूक्ष्म दृष्टी’ या शब्दांमध्ये संयोगचिन्ह न लिहिणे : सनातनच्या वाङ्मयात ‘सूक्ष्म दृष्टी’ असे जेव्हा लिहिले जाते, तेव्हा त्याचा अर्थ, ‘साध्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या अती लहान अशा सूक्ष्मातील घडामोडी पाहू शकणारी दृष्टी’, असा असतो. येथे दृष्टीच सूक्ष्म आहे. व्याकरणाच्या भाषेत सांगावयाचे तर, ‘सूक्ष्म’ हे ‘दृष्टी’ या शब्दाचे विशेषण आहे. ‘विशेषण म्हणजे संबंधित शब्दाविषयी विशेष माहिती देणारा शब्द होय.’ या ठिकाणी ‘सूक्ष्म’ हा शब्द ‘दृष्टी’ या शब्दाविषयी विशेष माहिती देतो. व्याकरणात विशेषण आणि संबंधित शब्द यांमध्ये कधीही संयोगचिन्ह नसते. त्यामुळे ‘सूक्ष्म दृष्टी’ या दोन शब्दांमध्येही संयोगचिन्ह लिहू नये. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

सूक्ष्म ज्ञान, सूक्ष्म लहरी, सूक्ष्म परीक्षण, सूक्ष्म जगत इत्यादी.’

(क्रमशः पुढील शुक्रवारी)

– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.६.२०२२)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/591056.html