वर्ष १९९२ पासून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृती जपणारे कोल्हापूर येथील मंडळ !

‘श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक रिक्शा मित्रमंडळा’चा उपक्रम

‘श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक रिक्शा मित्रमंडळा’ची पितळी श्री गणेशमूर्ती

कोल्हापूर – ५ जानेवारी १९९२ या दिवशी स्थापन झालेले आणि गेली ३३ वर्षे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृती जपत कार्यरत असलेले एक रिक्शा मंडळ आहे ते म्हणजे ‘श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक रिक्शा मित्रमंडळ’ होय ! ताराबाई पार्क येथील हे मंडळ आणि रिक्शास्थानक ४० सहकार्‍यांच्या माध्यमातून चालू करण्यात आले. मंडळातील सभासदांच्या रिक्शावर छत्रपती संभाजी महाराज यांचे चित्र आहे, हे विशेष ! छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने असलेले कदाचित् राज्यातील एकमेव रिक्शा मित्रमंडळ असेल !

मंडळाच्या माध्यमातून पितळी गणपतीची स्थापना आणि आता उभारले आहे सुंदर श्री गणेश मंदिर ! 

या मंडळाचे सहकारी जेव्हा एकत्र असत, तेव्हा त्यांच्या मनात ‘येथे एक गणेश मंदिर उभारावे’, असा विचार आला. यातून त्यांनी साडेपाच किलोच्या पितळी श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. येथील श्री गणेश मंदिराचे सर्व दायित्व हे रिक्शा मंडळाचे कार्यकर्तेच पहातात. त्यांच्यातीलच एक जण एक वर्षभर मंदिराची पुजारी म्हणून सेवा पहातात. येथे श्री गणेशजन्मकाळ मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ५ सहस्रांहून अधिक भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. येथील मंदिरात सकाळी ७.४५ आणि सायंकाळी ६.३० वाजता प्रतिदिन आरती करण्यात येते. याच समवेत संकष्टी चतुर्थी, अंगारकीही येथे साजरी केली. त्या वेळी भाविकांना प्रसाद वाटप करण्यात येतो. हे सर्व या मंडळाने लोकवर्गणीतून आणि रिक्शाचालकांनी त्यांच्या आर्थिक सहभागातून उभे केले आहे. येथील गणपति ‘नवसाला पावणारा गणपति’ म्हणून प्रसिद्ध असून अनेक भाविक येथे श्रद्धेने येतात. आता येथील शहर बसस्थानकाचे नावही ‘पितळी गणपति स्थानक’, असेच पडले आहे.

सध्या संचालक मंडळात अध्यक्ष श्री. एकनाथ मारुति उलपे, श्री. तानाजी कृष्णात चव्हाण हे उपाध्यक्ष, सचिव श्री. अशोक गोविंद मोरे, तर खजिनदार म्हणून श्री. मोहन आनंदराव पाटील कार्यरत आहेत.
‘श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक रिक्शा मित्रमंडळा’ची कमान
‘श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक रिक्शा मित्रमंडळा’च्या वतीने प्रत्येक रिक्शावर ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ यांचे लावण्यात आलेले स्टीकर