सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !
‘उद्गारवाचकचिन्ह’ आणि त्याच्या वापराची पद्धत !
प्राचीन काळी संस्कृत ही आर्यावर्तातील ज्ञानभाषा आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे संस्कृतपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या भाषांचे व्याकरणही स्वतंत्रपणे लिहिले गेले; मात्र त्याचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच होता. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.
मागील लेखात आपण ‘प्रश्नचिन्ह (?)’ आणि ‘संयोगचिन्ह (-)’ या दोन चिन्हांची माहिती घेतली. आजच्या लेखात ‘उद्गारवाचकचिन्ह (!)’ कुठे लिहावे ?’, याविषयी जाणून घेऊ.
(लेखांक ८ – भाग ८)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/586821.html
२ ए. उद्गारवाचकचिन्ह : हे ‘!’ या खुणेने दाखवले जाते. लिखित भाषेत ‘उद्गारवाचकचिन्हा’चा उपयोग पुढीलप्रमाणे केला जातो.
२ ए १. एखाद्या प्रसंगी उत्स्फूर्तपणे किंवा उत्कटपणे बोलल्या जाणाऱ्या शब्दापुढे ‘उद्गारवाचकचिन्ह’ लिहिणे : दैनंदिन जीवनात एखादी आश्चर्यचकित करणारी घटना घडली, एखादी सुखद अथवा दुःखद वार्ता आपल्या कानांवर आली किंवा नेहमीपेक्षा एकदम वेगळे दृश्य आपण पाहिले, तर उत्स्फूर्तपणे किंवा उत्कटपणे आपल्या तोंडून ‘अरेच्च्या’, ‘अबब’, ‘बापरे’ अथवा ‘अगंबाई’ यांसारखे उद्गार बाहेर पडतात. या उद्गारांच्या पुढे ‘उद्गारवाचकचिन्ह’ लिहिले जाते. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
अ. अरेरे ! श्रीमंत माधवराव पेशवे फारच तरुण वयात मृत्यू पावले.
आ. अप्रतिम ! एवढा भव्य राजवाडा मी पहिल्यांदाच पहात आहे.
इ. अरे वा ! हे चित्र अगदी सजीव वाटत आहे.
ई. शाबास ! रामरक्षा छान पाठ केली आहेस.
२ ए २. उत्स्फूर्तपणे किंवा उत्कटपणे बोलल्या जाणाऱ्या वाक्यापुढे उद्गारवाचकचिन्ह लिहिणे : ज्याप्रमाणे आपण उत्स्फूर्तपणे किंवा उत्कटपणे काही शब्द उच्चारतो, त्याचप्रमाणे काही वाक्येही उच्चारतो. या वाक्यांत काही वेळा ‘किती’, ‘केवढे’ इत्यादी प्रश्नार्थक शब्द असतात; परंतु त्यांत कोणतेही प्रश्न विचारलेले नसतात. बोलणाऱ्याला कोणत्याही उत्तराची अपेक्षा नसते. अशी वाक्ये ही खरेतर विधाने असतात. या वाक्यांना काही वेळा क्रियापदेही नसतात. अशा प्रकारच्या वाक्यांनंतर उद्गारवाचकचिन्ह लिहिले जाते. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
अ. किल्ल्याची या बाजूची तटबंदी अजूनही किती बळकट आहे !
आ. संत रामदासस्वामी यांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी केवढे महान कार्य केले !
इ. वाघिणीला मारणारे किंवा पकडणारे अनेक जण असतील; पण तिचे दूध काढणारे छत्रपती शिवराय जगात एकमेवच !
ई. मनुष्याला मृत्यूनंतर उपयोगी पडते, ती केवळ साधनाच !
२ ए ३. सनातनच्या वाङ्मयात वैशिष्ट्यपूर्ण मथळे आणि अन्य वैशिष्ट्यपूर्ण वाक्ये यांच्यापुढे उद्गारवाचकचिन्ह लिहिले जात असणे : प्रचलित मराठी वाङ्मयात प्रश्नार्थक मथळा वगळता अन्य कोणत्याही मथळ्यापुढे कोणतेही विरामचिन्ह लिहिले जात नाही. सनातनच्या वाङ्मयात मात्र राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित महत्त्वपूर्ण घटनांची वृत्ते, लेख, संतांचे अमूल्य विचारधन इत्यादींचे मथळे; दैनिक ‘सनातन प्रभात’मधील जनजागरण करणाऱ्या आकाशओळी; सनातनच्या अन्य प्रसारसाहित्यांमधील महत्त्वाची वाक्ये यांच्यापुढे उद्गारवाचकचिन्ह देण्यात येते. उद्गारवाचकचिन्ह दिल्यामुळे वाचकांचे त्या लिखाणाकडे लगेच लक्ष वेधले जाते, त्याचबरोबर त्या लिखाणातील विचार त्यांच्या मनावर कोरले जाण्यास साहाय्य होते. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
अ. मंदिरांच्या आर्थिक व्यवहारांत भ्रष्टाचार करणाऱ्यांविरुद्ध राज्यभरातील हिंदू संघटित !
आ. कमलनगर येथे अवैध भोंग्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल !
इ. प्रदूषण टाळण्यासाठी फटाके न वाजवण्याचा टिळकनगर शाळेतील विद्यार्थ्यांचा निर्धार !
ई. हिंदूंनो, राष्ट्र-धर्मावरील आघातांविरुद्ध न्यायालयीन लढा द्या !
उ. नामस्मरणाने प्रारब्ध जळते ! – प.पू. भक्तराज महाराज
(क्रमशः पुढील शुक्रवारी)