कराड, २५ मार्च (वार्ता.) – महाविद्यालयीन युवक-युवती कराड परिसरातील सुर्ली घाट, डिचोली डोंगर, टेंभू कॅनॉल, आगाशिव डोंगर, वाखाण रस्ता यांसह अनेक निर्जनस्थळी फिरत असतात. निसर्गाच्या सान्निध्यात फोटोग्राफी करण्याचा आनंद लुटतात; मात्र काही युवक-युवतींचे भलतेच उद्योग चालू असतात, असे वारंवार पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. याठिकाणी संशयास्पदरित्या आढळणार्या महाविद्यालयीन युवक आणि युवती यांच्यावर कडक कारवाई करा, अशा सूचना पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी दिल्या आहेत.
पोलीस उपअधीक्षक ठाकूर म्हणाले की, आपला पाल्य महाविद्यालयातच जातो कि महाविद्यालयाच्या नावाखाली अन्य कुठे आपला वेळ वाया घालवत आहे, याकडेही पालकांनी लक्ष द्यावे, तसेच विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संवाद साधत त्यांच्यावर पालकांनी लक्ष ठेवावे. एखादी दुर्घटना घडल्यावर उपाय काढण्यापेक्षा अशा घटना टाळण्यासाठी सर्वच पालकांनी विशेष काळजी घ्यायला हवी. पोलिसांच्या वतीने ‘निर्भया पथक’ उपरोल्लेखित परिसरामध्ये गस्त घालतांना ध्वनिचित्रीकरणही करणार आहे, जेणेकरून संशयास्पदरित्या महाविद्यालयीन युवक आणि युवती आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करणे सोपे जाईल.