‘विरामचिन्हे’ आणि त्यांचे भाषेतील कार्य !

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

‘अपूर्णविराम’ आणि तो वापरण्याची पद्धत !

‘प्राचीन काळी संस्कृत ही आर्यावर्तातील ज्ञानभाषा आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे संस्कृतपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या भाषांचे व्याकरणही स्वतंत्रपणे लिहिले गेले; मात्र त्याचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच होता. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असण्ो अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या शुक्रवार, २२.४.२०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘स्वल्पविराम’ कुठे लिहावा ?’, या संदर्भातील काही सूत्रे पाहिली. त्यानंतरच्या आजच्या लेखात ‘अपूर्णविराम’ (:) कुठे लिहावा ?’, याविषयी माहिती पाहू.

(लेखांक ८ – भाग ६)

२ ई. अपूर्णविराम

हा (:) या चिन्हाने दाखवतात. लिखित भाषेत ‘अपूर्णविरामा’चा उपयोग पुढील ठिकाणी केला जातो.

सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे

२ ई १. उपमथळ्याच्या पुढे त्याचे स्पष्टीकरण लिहावयाचे असणे : लेखनामध्ये कोणत्याही उपमथळ्याच्या पुढे त्या उपमथळ्याविषयी अधिक माहिती द्यावयाची असेल, तर उपमथळ्यानंतर ‘अपूर्णविराम’ दिला जातो. याचे एक उदाहरण पुढे दिले आहे.

२ ई १ अ. भगवंताचे भक्तावरील प्रेम : भगवंत त्याची अनन्य भक्ती करणाऱ्या भक्तावर अतिशय प्रेम करतो. भीष्माचार्य हे भगवान श्रीकृष्णाचे परम भक्त होते. श्रीकृष्णाने, ‘कुरुक्षेत्रावरील युद्धात मी शस्त्र हाती घेणार नाही’, अशी प्रतिज्ञा केली होती, तर भीष्माचार्यांनी एका प्रसंगी श्रीकृष्णावर रुष्ट होऊन, ‘मी श्रीकृष्णाला युद्धात शस्त्र हाती घ्यावयास लावीन’, अशी प्रतिज्ञा केली. केवळ भीष्माचार्यांची प्रतिज्ञा सत्य व्हावी, यासाठी भक्तवत्सल श्रीकृष्णाने स्वतःची प्रतिज्ञा मोडून युद्धात शस्त्र हाती घेतले.

२ ई २. ‘नाटक’ हा वाङ्मयप्रकार लिहितांना त्यातील पात्रांच्या तोंडी असलेले संवाद लिहिण्यापूर्वी पात्रांच्या नावांसमोर अपूर्णविराम लिहिणे : साहित्यविश्वात कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके असे विविध वाङ्मयप्रकार असतात. त्यांपैकी ‘नाटक’ या प्रकारामध्ये त्यातील विविध पात्रे परस्परांशी बोलत असतात. तेव्हा त्यांच्या बोलण्यातून नाटकाचे कथानक उलगडत जाते. हा वाङ्मयप्रकार लिहितांना पात्रांची नावे लिहिल्यावर त्यांच्यासमोर अपूर्णविराम लिहिला जातो आणि त्यापुढे त्या पात्रांचे संवाद लिहिले जातात. याचे एक उदाहरण पुढे दिले आहे.

गोविंद : या वर्षी गणेशोत्सवात मनोरंजन करणारा चित्रपट दाखवायचा नाही.

ज्ञानेश : का बुवा ?

गोविंद : चित्रपटांमध्ये मारामाऱ्या, वाईट दृश्ये, ढणढणाटी संगीत असं सर्व असतं. एका बाजूला भक्तीभावाने पूजा केलेली श्री गणेशाची मूर्ती ठेवायची आणि दुसरीकडे हे असलं काहीतरी दाखवायचं ! बरं नाही वाटत रे ! देव राहील तरी का अशा ठिकाणी ?

ज्ञानेश : खरंच रे ! मी कधी असा विचारच केला नव्हता.

गोविंद : माझ्याही हे मागील वर्षी लक्षात आलं. लोकांनी काय धुडगूस घातला होता !

२ ई ३. उपमथळ्याच्या शेवटी क्रियापद असल्यास आणि त्याच्या पुढे अपूर्णविराम लिहावयाचा असल्यास उपमथळ्याच्या शेवटी उद्गारवाचकचिन्ह देणे : काही वेळा उपमथळ्याच्या शेवटी क्रियापद येते, उदा. ‘जेवतांना एकमेकांना स्पर्श करू नये’, या उपमथळ्यात ‘नये’ हे क्रियापद आहे. क्रियापद म्हणजे, ‘वाक्यातील क्रिया दर्शवणारा आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द होय.’ एरव्ही एक साधे वाक्य म्हणून वरील वाक्य लिहिल्यास ‘नये’ या शब्दानंतर आपण पूर्णविराम लिहितो; मात्र हे वाक्य उपमथळा म्हणून लिहावयाचे असेल आणि उपमथळ्याच्या पुढे अपूर्णविराम लिहावयाचा असेल, तर ‘नये’नंतर पूर्णविराम देऊ नये. त्याऐवजी उद्गारवाचकचिन्ह द्यावे. याचे आणखी एक उदाहरण पुढे दिले आहे.

२ ई ३ अ. सकाळी उठल्यावर श्लोक म्हणावा ! : सकाळी उठल्यावर श्लोक म्हटल्याने आपल्याला ईश्वराचे स्मरण होते आणि त्याच्या आशीर्वादाने आपला दिवस चालू होतो.

२ ई ४. उपमथळा प्रश्नार्थक असेल, तर त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह देऊन मग अपूर्णविराम देणे : उपमथळ्यामध्ये प्रश्न विचारलेला असेल, तर त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे आणि प्रश्नचिन्हाच्या पुढे अपूर्णविराम द्यावा. याचे उदाहरण पुढे दिले आहे.

२ ई ४ अ. साधकाने सिद्धींमध्ये का अडकू नये ? : ‘सिद्धींची प्राप्ती होणे’, हा साधनामार्गावरील एक टप्पा आहे. ते साधनेचे अंतिम ध्येय नाही. ‘मोक्षप्राप्ती’ हे साधनेचे अंतिम ध्येय आहे. सिद्धींमध्ये अडकल्यास साधकाची पुढील प्रगती खुंटते.’

(क्रमशः पुढील शुक्रवारी)

– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.६.२०२२) ॐ