औरंगजेबाच्या साम्राज्याचा कणा मराठ्यांनी मोडला !

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ हिंदी चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनसंघर्ष आणि त्यांची शौर्यगाथा दाखवली गेली; पण त्यानंतरचा सर्वांत महत्त्वाचा अध्याय ‘औरंगजेबाच्या पराभवाचा’; मात्र तितक्याच प्रभावीपणे समोर आला नाही ! ‘छत्रपती संभाजी महाराज यांची निःपात्य हत्या केल्यानंतर मराठ्यांची शक्ती खचेल’, असे औरंगजेबाला वाटले होते; पण प्रत्यक्षात झाले उलटेच ! मराठ्यांनीच त्याचा पराभव सुनिश्चित केला. हा इतिहास केवळ जिंकलेल्या युद्धांचा नव्हता, तर एका महाकाय पातशाहीला पराभवाची चव चाखवणार्‍या योद्ध्यांचा होता. छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येने मराठ्यांचे रक्त सळसळले आणि त्यांच्या मृत्यूचा सूड घेतल्याविना त्यांना शांत बसवेना.

१. सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी औरंगजेबाची झोप उडवणे !

छत्रपती संभाजी महाराज यांना अमानुष छळ सहन करावा लागला; पण त्यांनी औरंगजेबासमोर झुकण्यास नकार दिला. त्यांच्या मृत्यूनंतर मोगलांनी रायगड काबीज केला आणि त्यांच्या पत्नी येसूबाई अन् पुत्र शाहू महाराज यांना कैद केले. मराठ्यांसाठी ही मोठी आपत्ती होती; पण याच घटनेने त्यांना एका ध्येयाने एकत्र आणले ते, म्हणजे औरंगजेबाला धूळ चारण्याचे ध्येय ! त्या वेळी मराठ्यांचा पराक्रमी सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी त्यांच्या पराक्रमाने औरंगजेबाची झोप उडवली.

तुषार कथोरे

२. मराठ्यांनी घेतलेला सूड आणि संताजी घोरपडे अन् धनाजी जाधव यांचे पराक्रम !

संगमेश्वरच्या युद्धात छत्रपती संभाजी महाराजांसह लढतांना वीरगती प्राप्त झालेल्या माल्होजी घोरपडे यांचा पुत्र संताजी घोरपडे यांनी मराठा साम्राज्याच्या सत्तेचा भार स्वखांद्यावर घेतला. धनाजी जाधव यांच्या साथीने त्यांनी मराठ्यांना नवसंजीवनी दिली आणि औरंगजेबाच्या सैन्यावर अखंड आक्रमणे केली. ‘छावा’ चित्रपटात संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंतच्या घटनांवर भर दिला गेला असला, तरी त्यानंतर मराठ्यांनी घेतलेला सूड आणि संताजी घोरपडे अन् धनाजी जाधव यांचे पराक्रमही तितकेच महत्त्वाचे आहेत.

औरंगजेबाने तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या केली; पण काही महिन्यांतच संताजी आणि धनाजी यांनी या ठिकाणी त्याच औरंगजेबाच्या छावणीवर भीषण आक्रमण केले. मराठ्यांच्या चपळ हालचालींमुळे मोगल सैन्य गोंधळून गेले. रात्रीच्या वेळी अचानक मराठे छावणीत घुसले आणि ‘हुजूर, मराठे आले !’, असा घबराटीचा गजर उठला. औरंगजेब स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडू लागला. मराठ्यांनी त्याच्या सैन्यावर इतके जबरदस्त आघात केले की, त्याच्या सहस्रो सैनिकांनी मृत्यू पत्करला. मराठ्यांनी छावणीतील मौल्यवान वस्तू, हत्ती, घोडे आणि २ सोन्याचे कळस लुटले अन् सिंहगडावर नेले.

३. मराठा सैन्याने रायगड कह्यात घेणे आणि छत्रपती शंभूराजांना अटक करणार्‍या मुकर्रम खानाला ठार मारणे 

औरंगजेबाला सततच्या मराठ्यांच्या आक्रमणांमुळे महाराष्ट्र सोडून पळावे लागेल, असेच वाटू लागले; पण मराठे इथेच थांबले नाहीत. संताजी घोरपडे यांनी पुढचे आक्रमण रायगडावर केले. जुल्फिकार खानच्या नेतृत्वाखालील मोगल सैन्याने रायगडाला वेढा घातला होता; पण मराठ्यांच्या पराक्रमाने त्यांना माघार घ्यावी लागली. रायगड पुन्हा मराठ्यांच्या कह्यात आला. मुकर्रम खान ज्याने छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथे कैद केले होते, त्याच्यावर मराठ्यांना सूड घ्यायचा होता. वर्ष १६८९ मध्ये मुकर्रम खान कोल्हापूर आणि कोकण या भागांचा सुभेदार झाला; पण मराठ्यांनी त्याला शांत बसू दिले नाही. संताजी घोरपडे अन् धनाजी जाधव यांनी मुकर्रम खानच्या सैन्यावर तुटून पडत त्याचा पूर्णतः पराभव केला आणि अखेरीस त्याला ठार मारले.

४. मराठ्यांनीच केला औरंगजेबाच्या स्वप्नांचा चुराडा !

याच युद्धांमुळे औरंगजेबाच्या स्वप्नांचा चुराडा झाला. छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू हा औरंगजेबाच्या विजयाचा नाही, तर त्याच्या विनाशाचा प्रारंभ होता. मराठ्यांनी पुढची तब्बल २७ वर्षे औरंगजेबाला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पळवून पळवून हैराण केले. अखेरीस या क्रूरकर्म्याने महाराष्ट्रातच एकाकी अवस्थेत तडफडून प्राण सोडले. इतिहास जो औरंगजेबाला जिंकलेला दाखवतो, तो खरेतर हरलेला होता. मराठ्यांनी त्याच्या साम्राज्याचा कणा मोडला आणि अखेर त्याला पराभवाचे तोंड पहावे लागले. ‘छावा’ चित्रपटाने हा इतिहास ज्या ठिकाणी सोडला, त्या ठिकाणाहून खरी मराठा शौर्यगाथा चालू झाली आणि मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानाचा खर्‍या अर्थाने सूड घेतला.

– तुषार कथोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, डब्ल्यू.ई.सी.टी.एस्., मुरबाड, मुंबई.