आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

(भाग २१)

घराच्या भिंतींचा रंग आणि सजावट सात्त्विक असण्याचे महत्त्व !

पू. तनुजा ठाकूर

१. घराच्या भिंतींवर तामसिक पद्धतीची नक्षी किंवा रंग वापरले जाणे

‘आजकाल तैलरंग (ऑईलपेंट) विक्री करणारी अनेक व्यापारी आस्थापने (कंपन्या) नित्य नूतन रंग देऊन आणि नवनवीन पद्धतींनी (पॅटर्नने) घराला रंगवण्याची विज्ञापने देत असतात. सामान्य हिंदूंना सत्त्व, रज, आणि तम यांचे ज्ञान नसल्याने ते अशा विज्ञापनांकडे त्वरित आकर्षित होतात, उदा. काही लोक काही तामसिक पद्धतीच्या नक्षी आपल्या घराच्या भिंतींवर काढून घेतात. काही वेळा पोपटी किंवा काळ्या रंगाने भिंती रंगवतात, तर काही जण लाल भडक किंवा वांगी रंग आपल्या मुलांच्या खोलीला देतात.

२. भिंतींना पारंपरिक आणि सात्त्विक रंग दिल्यासच त्यातून सर्वांना लाभ होणे अन् तामसिक स्वरूपाच्या रंगांमुळे त्रासदायक स्पंदने निर्माण होऊन घरातील व्यक्तींना त्रास होणे

‘आपली वास्तू जेवढी सात्त्विक असेल, तेवढे ते स्थान साधना करण्यासाठी तेवढेच पोषक ठरते आणि आपल्या घरात सुख-शांती अन् समृद्धी अधिक प्रमाणात नांदेल’, हे लक्षात ठेवून वास्तूला सात्त्विक ठेवण्याचा प्रयत्न करावा; म्हणून भिंतींना पारंपरिक रंगच द्यावेत. घराच्या आतील भिंतींसाठी पांढरा, फिकट पिवळा किंवा फिकट निळा आणि चंदन हे रंगच उत्तम असतात. अन्य रंगांमुळे घरातील रज-तमाचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे मन विचलित होणे, झोप न येणे, लहान मुलांचे अभ्यासात मन एकाग्र न होणे इत्यादी त्रास होऊ शकतात.

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (१०.२.२०२२) (क्रमश:)