आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

(भाग २०)

घराचे रंगकाम, वास्तूतील स्पंदने आणि साधना यांचा एकमेकांशी असलेला परस्परपूरक संबंध !

पू. तनुजा ठाकूर

६. घरातील टाकाऊ किंवा अनावश्यक वस्तू काढाव्यात !

ज्या वस्तूंचा काही उपयोग होत नसेल किंवा ज्या वस्तू तुटलेल्या, फुटलेल्या असतील किंवा ज्या वस्तू पुष्कळ जुन्या झालेल्या असतील, त्या वस्तू घरात एकत्रित ठेवू नयेत. प्रत्येक वर्षी अशा अनावश्यक वस्तू काढून टाकाव्यात. आपण आपल्या घरात सुख-सुविधांसाठी जेवढ्या अधिक आधुनिक चैतन्यहीन विज्ञानाच्या उपकरणांचा उपयोग करतो, तेवढ्याच अधिक प्रमाणात आपली वास्तूही अशुद्ध होते; कारण त्या सर्वांतून त्रासदायक शक्ती प्रक्षेपित होते. यासाठी योग्य साधना करायला हवी.

 ७. साधना चांगली असल्यास तिचा वास्तूवर चांगला परिणाम होणे

७ अ. एका साधकाच्या नातेवाईकांच्या घरी गेल्यावर तेथील वास्तूची स्पंदने तुलनेत चांगली जाणवणे आणि घरातील प्रमुख व्यक्तीकडून चांगली स्पंदने वास्तूत पसरत असल्याचे लक्षात आल्यावर स्वतःला जाणवलेल्या सूत्राचा उलगडा होणे : वास्तूमध्ये एका व्यक्तीची साधना जरी उच्चकोटीची असेल, तर तिचा परिणाम वास्तूवर कशा प्रकारे होतो ? याचे एक उदाहरण सांगते. ऑक्टोबर २०१२ मध्ये मी चेन्नईमध्ये एका साधकाच्या नातेवाईकांच्या घरी गेले होते. त्यांचे घर सामान्य मध्यमवर्गियांप्रमाणे होते.

मी कुठेही गेल्यावर तेथील वास्तूची स्पंदने सूक्ष्मातून आपोआप जाणवतात. त्या वास्तूची स्पंदने सर्वसामान्यांपेक्षा पुष्कळच चांगली होती. त्यांचे देवघरही सर्वसामान्यच होते. तेथे अनेक देवतांची चित्रे आणि काही संतांची छायाचित्रे ठेवलेली होती; परंतु देवघरात मला काही विशेष अनुभूती आली नाही. मी विचार केला, ‘या घरातील स्पंदने एवढी चांगली कशी आहेत ?’ एवढ्यात त्या घरातील प्रमुख व्यक्ती (वय साधारणतः ५५ वर्षे) आली आणि त्यांनी मला नमस्कार केला. ते गृहस्थ मितभाषी आणि सज्जन प्रवृत्तीचे होते. त्यांच्याशी बोलतांना मला जाणवले, ‘त्यांच्याकडून पुष्कळच चांगली स्पंदने येऊन ती संपूर्ण वास्तूमध्ये पसरत आहेत.’ तेव्हा मला वास्तू सात्त्विक वाटत असण्यामागील कारण समजले.

७ आ. सज्जन गृहस्थ निष्काम कर्म करत असल्याने त्यांच्या वास्तूत चांगली स्पंदने येणे आणि त्यांनी एकनिष्ठपणे पूजा म्हणून कर्म करत असल्याचे सांगणे : मी त्यांच्या घरातील कुटुंबियांना विचारले, ‘‘या गृहस्थांच्या आध्यात्मिक पातळीविषयी तुम्हाला काही ठाऊक आहे का ?’’ त्यावर त्यांच्या मुलींनी सांगितले, ‘‘वडील पूजा-पाठ इत्यादी काही करत नाहीत; परंतु ते सर्वांवर निष्काम भावाने पुष्कळ प्रेम करतात. ते कधीच रागावत नाहीत. ते ज्या विभागात पदाधिकारी म्हणून नोकरी करतात, तेथे ते प्रत्येक मासाला लक्षावधी रुपयांची लाच घेऊन पैसे कमवू शकतात; परंतु ते आपल्या तत्त्वांशी एकनिष्ठ आहेत.’’ मी कुटुंबियांना सांगितले, ‘‘तुमच्या वडिलांची आध्यात्मिक पातळी ६० टक्के आहे आणि ते कर्मयोगानुसार साधना करत आहेत. त्यामुळे तुमच्या वास्तूमध्येही एवढी चांगली स्पंदने आहेत.’’ तेव्हा ते सज्जन गृहस्थ म्हणाले, ‘‘ही सर्व ईश्वराची कृपा आहे. तुम्ही असे सांगून माझा अहं वाढवू नका. माझ्याकडून  साधना इत्यादी विशेष काही होत नाही. मी तर केवळ एकनिष्ठपणे कर्म करतो. तीच माझ्यासाठी पूजा आहे.’’ यातून लक्षात येते, ‘जर तुमच्याकडे धन नसेल, तरीही तुम्ही साधना करा. त्यातून निर्माण होणाऱ्या सूक्ष्म स्पंदनांमुळे वास्तुदेवता तुमच्यावर प्रसन्न राहील.’

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (३०.२.२०२२)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक