केरळच्या साम्यवादी सरकारचे मुख्यमंत्री वियजन् यांचा सोने तस्करीत सहभाग ! – मुख्य आरोपीचा जबाब

विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्री वियजन् यांच्या त्यागपत्राची मागणी

कोची (केरळ) – केरळमधील सोने तस्करीच्या प्रकरणातील आरोपी स्वप्ना सुरेश हिने दंडाधिकार्‍यांपुढे नोंदवलेल्या तिच्या जबाबामध्ये तस्करीमध्ये केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन्, त्यांची पत्नी, मुलगी आणि दोन सहकारी, तसेच माजी मंत्री यांचा यात सहभागी होता, असे म्हटले आहे. यानंतर विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री विजयन् यांच्या त्यागपत्राची मागणी केली आहे. स्वप्ना सुरेश या संयुक्त अरब अमिरातच्या वाणिज्य दूतावासामध्ये नोकरी करत होत्या.

स्वप्ना सुरेश हिने पत्रकारांना सांगितले की, मी फौजदारी दंडसंहितेतील कलम १६४ अन्वये दंडाधिकार्‍यांपुढे जबाब नोंदवला आहे. मुख्यमंत्री विजयन्, त्यांची पत्नी कमला, मुलगी वीणा, माजी मुख्य सचिव नलिनी नेट्टो, विजयन् यांचे अतिरिक्त खासगी सचिव सी.एम्. रवींद्रन् आणि माजी शिक्षणमंत्री आमदार के.टी. जलील यांचे नाव त्यात घेतले आहे. हे प्रकरण वर्ष २०१६ मध्ये विजयन् प्रथम संयुक्त अरब अमिरातीत गेले, तेव्हा चालू झाले. विजयन् यांचे तत्कालीन प्रधान सचिव एम्. शिवशंकर यांनी मला त्यांच्या भेटीची सिद्धता करण्याच्या सूचना दिली. दुसर्‍या दिवशी मला शिवशंकर यांचा दूरभाष आला आणि त्यांनी ‘विजयन् त्यांची बॅग विसरले आहेत. ती बॅग तातडीने पाठवून द्यावी’, अशी  सूचना केली. त्यानुसार मी ती बॅग अमिरातीच्या कार्यालयात दिली. तिथे बॅग स्कॅन केली असता, ती नोटांनी भरल्याचे दिसले. त्यानंतर अनेकदा अमिरातीच्या व्यापारी प्रतिनिधींच्या निवासस्थानातून विजयन् यांच्या निवासस्थानी बिर्याणी पाठवली जात असे. त्यात अनेकदा धातूसदृश वस्तू असत. शिवशंकर यांच्या सूचनेनुसारच हे झाल्याची माहिती मी केंद्रीय अन्वेषण यंत्रणांना दिली आहे.
‘स्वप्ना सुरेश यांचे आरोप खोडसाळ आहेत’ असे शिवशंकर यांनी म्हटले आहे, तर नलिनी नेट्टो यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

संपादकीय भूमिका 

  • साम्यवाद्यांचे खरे स्वरूप ! ‘साम्यवादी पक्ष पीडित लोकांसाठी झटून त्यांना न्याय मिळवून देतोे’, अशा फुशारक्या मारणारे साम्यवादी हे हिंसक आणि भ्रष्ट असतात, याचे अनेक पुरावे आहेत. विजयन् यांच्यावरील आरोपांमुळे त्यात आणखी एकाची भर पडली आहे !
  • केरळमध्ये मुख्यमंत्री विजयन् यांची एकाधिकारशाही असल्यामुळे याविषयीचे सत्य समोर येणार नाही. त्यामुळे स्वतंत्र यंत्रणेद्वारे त्याची चौकशी होणे आवश्यक !