हिंदु राष्ट्राच्या स्थापनेमध्ये संप्रदायांचे योगदान आणि सांप्रदायिक एकतेचे महत्त्व !

१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे होणाऱ्या ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने…

भारतात ठिकठिकाणी छोटी पाकिस्ताने निर्माण होऊ द्यायची नसतील, तर देशात हिंदु राष्ट्राची स्थापना होणे आवश्यक !

१. सर्व संप्रदायांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला त्यांचे मूलभूत ध्येय बनवणे आवश्यक !

पू. तनुजा ठाकूर

ईश्वराने सांगितल्याप्रमाणे सांप्रदायिक एकता ही काळाची आवश्यकता आहे. त्यामुळे सर्व संप्रदायांनी हे वास्तव चांगल्या प्रकारे समजून घ्यावे आणि ते लवकरात लवकर कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. संप्रदायांनी योगदान देतांना एक साधी गोष्ट लक्षात ठेवावी. आपल्याकडे जे नाही, ते आपल्याला द्यायचे नाही, तर आपल्याकडील तन, मन, धन, बुद्धी, कौशल्य यांपैकी जे देता येईल, ते हिंदु राष्ट्राच्या या महायज्ञामध्ये एक आहुती म्हणून अर्पण करायचे आहे. ही आहुती ईश्वर निश्चित स्वीकारेल.

हिंदु राष्ट्राची स्थापना हेच संप्रदायांनी त्यांचे मूलभूत ध्येय बनवणे का आवश्यक आहे ? याविषयी जाणून घेऊया. मी मागील १८ वर्षांपासून धर्मप्रसाराची सेवा करत आहे. जेव्हा प्रथमच मी माझ्या गुरूंची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) भेट घेतली, तेव्हा ते मला म्हणाले, ‘तुम्ही सत्संग घेण्यास प्रारंभ करा !’ त्यांच्या आशीर्वादाने मी कृतीला प्रारंभ केला. विश्वास करा, मला अध्यात्मातील ‘अ’देखील ठाऊक नव्हता. तेव्हापासून आजपर्यंत धर्मप्रसार ही माझी मुख्य साधना आणि सेवा राहिली आहे. या काळात माझा विविध प्रकारचे संप्रदाय, संघटना आणि संस्था यांच्याशी परिचय झाला. आनंदाची गोष्ट, म्हणजे मला सर्वांविषयी अतिशय आत्मीयता वाटते; पण मला एक खेदाची गोष्ट जाणवली की, प्रत्येक जण आपापला राग आळवत असतो. ‘माझे गुरु श्रेष्ठ’, ‘माझा संप्रदाय श्रेष्ठ’, ‘माझी साधनापद्धत श्रेष्ठ’, ‘माझी उपासनापद्धत श्रेष्ठ’, असे प्रत्येकाला वाटत असते. या संकुचित मानसिकतेतून ते पुढे जाऊ शकत नाहीत. आपण ही संकुचित मानसिकता त्यागली नाही, तर आपल्याला धर्माचे खरे ज्ञान होऊ शकणार नाही.

२. ‘जेथे सनातन धर्माचे अस्तित्व समाप्त होते, तेथे नरकाखेरीज दुसरे काहीही असू शकत नाही’, याचा प्रत्येकाने विचार करावा !

आम्ही, तुम्ही आणि हे राष्ट्र यांच्यात अद्वैत आहे. आपण सर्व जण एका राष्ट्राने बांधले गेलो आहोत. त्यामुळे जर हे राष्ट्रच राहिले नाही, तर आपल्या कुणाचे अस्तित्व शेष रहाणार नाही, तसेच हे राष्ट्र रहाण्यासाठी धर्म टिकणे अत्यंत आवश्यक आहे. एक प्रकारे आपण असे म्हणू शकतो की, राष्ट्र आणि धर्म यांच्यात अद्वैत आहे. ‘राष्ट्र आणि धर्म यांच्यात विविध ठिकाणच्या अद्वैत कसे आहे ?’, असा प्रश्न तुम्हाला पडेल. ईश्वरीकृपेने मला देश-विदेशात जाण्याचा योग आला. जेव्हा माझ्यावर विदेशात जायची वेळ यायची, तेव्हा प्रथम मी अर्धमेली होत असे; कारण तेथे तमोगुणाचे प्राबल्य आहे. तेथे असे काही आसुरी साम्राज्य आहे की, तेथे जाण्यापूर्वी माझ्या मनात विचार यायचा की, ठाऊक नाही कोणत्या जन्मात पाप केले आहे, ज्यामुळे मला तेथे जावे लागत आहे ?

एकदा मी भगवंताला प्रश्न केला की, ‘हे भगवंता, मला या तमोगुणात ३-४ मास का रहावे लागत आहे ?’ तेव्हा भगवंत म्हणाले, ‘‘तू एकदा म्हणाली होतीस की, धर्मप्रसारासाठी नरकात जरी जावे लागले, तरी मी जाईन.’’ तर खऱ्या अर्थाने तो नरकच आहे. ‘जेथे सनातन धर्माचे अस्तित्व समाप्त होते, तेथे नरकाखेरीज दुसरे काहीही असू शकत नाही’, ही गोष्ट सर्व हिंदूंनी चांगल्या प्रकारे समजून घेतली पाहिजे.

३. आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सर्व संप्रदायांनी अहंभाव आणि भेदभाव सोडून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटित झाले पाहिजे !

या भ्रमात कधीही राहू नका की, आपण काहीच प्रयत्न केले नाही, तरी हा सनातन हिंदु धर्म काही नष्ट होणार नाही. एकेकाळी संपूर्ण विश्वामध्ये केवळ हाच धर्म पसरलेला होता; परंतु हिंदूंच्या निष्क्रीयतेमुळे तो भारतातही सीमित होत चालला आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्य झाले आहेत आणि प्रत्येक राज्यात एक छोटा पाकिस्तान बनला आहे. उद्या आपले काय होणार ? हे आपल्यालाच ठाऊक नाही, अशी स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना आवश्यक आहे, हे सर्व संप्रदायांच्या लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. विविध ठिकाणच्या अधिवेशनामध्ये अनेक राष्ट्रवादी हिंदुत्वनिष्ठ संघटना उपस्थित आहेत. त्या तुलनेत आध्यात्मिक संस्था फारच अल्प दिसत आहेत. यामागील कारण काय असेल ? मला वाटते की, आज बहुतांश आध्यात्मिक संस्थांमध्ये अहंकाराचे प्रमाण पुष्कळ अधिक आहे. ज्या राष्ट्रनिष्ठ हिंदुत्वनिष्ठ संघटना आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांना कोणतीही नवीन गोष्ट सांगितली, तर ते लगेच स्वीकारतात; कारण त्यांचा फलक कोरा आहे; परंतु जे अध्यात्म जाणतात, त्यांना वाटते की, ‘तुम्ही कोण आहात आम्हाला सांगणारे ? आमचा ईश्वर आम्हाला वाचवेल.’ काळाच्या प्रवाहात भगवद्गीतेमध्ये जे सांगितले आहे, त्याचे आचरण करावे लागेल, तरच ईश्वर आम्हाला साहाय्य करील. हे सत्य सर्व संप्रदायांनी चांगल्या प्रकारे समजून घेतले पाहिजे आणि आपला अहंभाव अन् भेदभाव सोडून सर्वांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटित झाले पाहिजे.

याची फलनिष्पत्ती काय असेल ? हे थोडक्यात जाणून घेऊया. जर सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संस्था एकत्र आल्या, तर सर्वांना एकमेकांपासून शिकायला मिळेल. आपण एकत्र आलो, तर आपल्याला कूपमंडूक वृत्तीतून बाहेर पडता येईल. आपल्याला समजेल की, आमचा वैदिक सनातन धर्म किती विशाल आहे ! कसे कसे अद्भुत साधक आहेत ! साधनापद्धती कशा आहेत ? उपासनापद्धती किती प्रकारच्या आहेत ? आपल्या सनातन धर्माची विशेषत: ही आहे की,
‘साधनानाम् अनेकता । उपास्यानाम् अनियमः ।’
(अर्थ : साधनेचे अनेक मार्ग आहेत आणि उपासनेचे विशिष्ट नियम नाहीत.) आम्ही एकमेकांचा सन्मानही करतो; कारण आम्ही मान्य करतो की, सर्वांत मोठा शैव श्रीविष्णु आहे आणि सर्वांत मोठा वैष्णव शिव आहे. अशा प्रकारे आपल्या धर्मात समन्वय आहे. म्हणून मी सर्व संप्रदायांना नम्र विनंती करते की, तुमच्या संप्रदायाचा उद्देश व्यष्टी असेल, तर त्यात ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हा एक समष्टी उद्देश निश्चित समाविष्ट करा, तसेच आपल्या सर्व अनुयायांना सांगा की, ‘तुम्हाला सांगितलेली व्यष्टी साधना निश्चित पूर्ण करा; परंतु काळानुसार समष्टी उद्देशाला प्राधान्य देणे आवश्यक आहे.’ आपण जर या दिशेने प्रयत्न केले नाही, तर आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याविना रहाणार नाही.

४. सर्व संप्रदाय, संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ यांना एका छत्राखाली येऊन कार्य करावे लागेल !

आज हिंदुत्वनिष्ठ, आध्यात्मिक संस्था आणि संत यांच्याविषयी एवढा विद्वेष का आहे ? त्यांच्यावर एवढे आघात का केले जातात ? याचे कारण हिंदू संघटित नाहीत. विदेशात मुसलमानांच्या संदर्भात काही झाले, तरी संपूर्ण विश्वातील मुसलमानांकडून त्याविषयी प्रतिक्रिया उमटते; परंतु एखाद्या हिंदु संतांवर आघात झाले, तर आम्ही विचार करतो, ‘त्यांच्या गुरूंवर झाले आहेत, आपल्याला काय करायचे आहे ?’, ‘त्यांच्या संस्थेवर झाले आहेत, आपल्याला काय करायचे आहे ?’ लक्षात घ्या, जेव्हा आग लागते, तेव्हा त्याची झळ तुमच्या घरालाही लागू शकते. हिंदूंवरील हे आघात काही दिवस सतत वाढत जाणार आहेत. तेव्हा आपल्यातील कोण लक्ष्य ठरेल, हे आपल्याला ठाऊक नाही. अशी वेळ आपल्या जीवनात आलीच, तर आपले सर्व हिंदुत्वनिष्ठ बंधू-भगिनी, सर्व संप्रदायांचे लोक, सर्व धर्मगुरु आपल्या पाठीशी उभे राहिले पाहिजेत. आताही वेळ गेलेली नाही. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा पुनर्र्संकल्प करूया.

आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे की, जेव्हा जेव्हा धर्मग्लानी आली, तेव्हा तेव्हा गुरुस्थानी विराजमान असलेले संत, अध्यात्म आणि वेद यांनी समाजाला दिशा दिली आहे. त्यांनी अर्जुन, हरिहर बुक्कराय, चंद्रगुप्त यांसारखे व्यक्तिमत्त्व सिद्ध केले आणि या महापुरुषांनी समाजाला सुदृढ राष्ट्रीय व्यवस्था दिली. हे आमच्या वैदिक संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. शेवटी मी सर्व धर्मगुरूंना आवाहन करते की, आम्हालाही असेच अर्जुन, हरिहर बुक्कराय आणि चंद्रगुप्त मौर्य यांची आवश्यकता आहे. या अखंड भारतासाठी आपल्याला अर्जुन, हरिहर बुक्कराय आणि चंद्रगुप्त मौर्य हवे आहेत. त्यासाठी सर्व संप्रदाय, संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ यांना एका छत्राखाली एकत्र येऊन एकरूपपणे हिंदु राष्ट्राच्या उद्देशासाठी कार्य करावे लागेल.

५. हिंदूंनो, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार न बनता भागीदार बना, इतिहास तुमचे यशोगान करील !

मला एक लहानसे आश्वासन द्यायचे आहे की, हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यावर तुम्ही राष्ट्र आणि धर्म हिताच्या दृष्टीने जो काही उद्देश ठेवला असेल, तो आपोआप विनाश्रम निश्चित पूर्ण होईल. मला पूर्ण श्रद्धा आहे की, जर हिंदु राष्ट्र आले, तर स्वत:च गंगा निर्मळ होईल, गोरक्षण होईल, पाश्चात्त्य संस्कृतीकडे एकही भारतीय ढुंकून पहाणार नाही. अर्थात् जसे सूर्य उगवल्यावर संपूर्ण विश्व स्वत:हून कृतीशील होते, तसे या गोष्टी हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावर त्वरित होतील. हा एक ऐतिहासिक क्षण आहे, कलियुगाच्या प्रथम टप्प्यामध्ये ५ सहस्र वर्षांनी हा संधीकाळ आला आहे आणि पुन्हा असा संधीकाळ ५ सहस्र वर्षांनी येईल. आम्ही सर्व जीवात्म्यांनी या काळात जन्म घेण्यासाठी काहीतरी विशेष जप, तप आणि साधना केली आहे. त्यामुळे हा संधीकाळ वाया जाऊ देऊ नका. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार न बनता भागीदार बना. विश्वास ठेवा इतिहास तुमचे यशोगान करील.

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ