विश्वकल्याणाचा व्यापक संकल्प आणि संपूर्ण विश्वावर निरपेक्ष प्रीती करणारे सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीतून अनुभवलेले भावक्षण !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

‘परात्पर गुरु डॉक्टर, तुमच्या सहस्रचंद्रदर्शन विधीचे औचित्य साधून तुमची प्रथम भेट, भावभेट आणि दर्शनरूपी स्मरण हेच त्रिदल मानून तुमच्या चरणी अर्पण करते. ‘गुरुदेवा, सच्चिदानंद परब्रह्मस्वरूपा आणि परमकृपाळू ईश्वरा, या निर्गुडीच्या पानाचे (बेलाचे पान उपलब्ध नसते, तेव्हा शिवाला बिल्वदलाच्या ठिकाणी निर्गुडीचे पान अर्पण करतात.) बिल्वदल मानून स्वीकार करावा’, अशी भावपूर्ण प्रार्थना !

३ जून या दिवशी आपण सौ. शालिनी प्रकाश मराठे यांची परात्पर गुरु डॉ. आठवलेयांच्याशी प्रथम भेट कशी झाली आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध माध्यमांतून दिलेली भावभेट याविषयी पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.

(भाग २)

भाग १. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/584837.html

परात्पर गुरु डॉ. आठवले

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध माध्यमांतून दिलेली भावभेट

२ ई. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना घडवणे : आमच्या आयुष्यातील प्रत्येक योग्य गोष्ट जी आम्ही करतो, ती परात्पर गुरु डॉक्टरांनीच आम्हाला शिकवली आहे. सभेला किंवा सत्संगाला जातांना वही आणि पेन घेऊन सूत्रे लिहून घेण्याचे त्यांनीच शिकवले.

सौ. शालिनी मराठे

२ ई १. ‘परिपूर्ण सेवा कशी करायची ?’, याची अंतर्मनातून जाणीव करून देणे : प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या वेळी मी मटारचे दाणे सोलत असतांना तिथे परात्पर गुरु डॉक्टर आले आणि त्यांनी हात पुढे केला. मी माझ्यासमोर असलेल्या मटारच्या शेंगांमधील मूठभर शेंगा उचलून त्यांच्या हातात ठेवल्या. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘साधक अजून नवीन आहेत.’’ तेव्हा ‘संतांशी कसे वागावे किंवा परिपूर्ण सेवा कशी करावी ?’, हे माझ्या लक्षात न आल्याने मी शेंगा त्यांच्या हातात दिल्या होत्या. त्यांच्या ‘साधक अजून नवीन आहेत’, या सांगण्यातून त्यांची चूक सांगण्याची पद्धत मला शिकायला मिळाली. एरव्ही काही संत चुका ओरडून किंवा रागावून सांगतात; पण त्यांनी मला अप्रत्यक्षपणे चुकीची जाणीव करून दिली आणि अंतर्मनातून ‘मी शेंगा सोलून चांगले दाणे त्यांना द्यायला हवे होते’, याची मला जाणीवही करून दिली.

२ ई २. परात्पर गुरु डॉक्टरांना हार हातात द्यायचा असतांना हार त्यांच्या गळ्यात घालणे, साधिकेची अंतर्मनातील स्थिती ओळखल्याने त्यांनी हार गळ्यात घालून घेणे आणि पुढील सभांमध्ये ‘अशी चूक कुणाकडून होऊ नये’, यासाठी सूचना देणे : वर्ष १९९८ मध्ये पणजी येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सार्वजनिक प्रवचन होते. त्या वेळी श्री. प्रकाश मराठे यांना परात्पर गुरु डॉक्टरांना टिळा लावायची सेवा होती. मला त्यांना हार अर्पण करण्याची सेवा होती, म्हणजे ‘हार त्यांच्या हातात द्यायचा’, असे सांगितले होते. त्यांना हार अर्पण करतांना माझा एकदम भाव जागृत झाला. परात्पर गुरु डॉक्टरांना हार घालतांना ‘साक्षात् देव समोर आहे’, असे मला वाटले. त्या वेळी ‘हार देवाच्या हातात देत नाहीत, तर गळ्यात घालतात’, असे मला वाटल्याने मी हार त्यांच्या गळ्यात घातला. माझी स्थिती त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तो हातात न घेता माझ्याकडून गळ्यात घालून घेतला. नंतर उत्तरदायी साधकांनी ‘मी हार गळ्यात घालायला नको होता’, असे मला कडक शब्दांत सांगितले. त्या काळात पुढे झालेल्या सर्व सार्वजनिक सभांमध्ये माझ्यासारखी चूक अन्य कुणाकडून, म्हणजे ‘कुणीही हार गळ्यात घालू नये’, असे कटाक्षाने सांगण्यात आले.

२ ई ३. वडीलधाऱ्यांनी सांगितलेल्या कृती मनापासून केल्या न जाणे; परंतु तीच सूत्रे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्यावर त्या कृती अंतर्मनाला भिडून मनापासून केल्या जाणे : आतापर्यंत आमचे आई-वडील, गुरुजन आणि शेजारी सर्वांनीच आम्हाला शिकवले; पण मी ते ऐकत नव्हते अन् त्याप्रमाणे करतही नव्हते, उदा. मला माझ्या विवाहापूर्वी माझे आई-वडील अनेक चांगल्या गोष्टी सांगायचे; पण मी त्या ऐकत नव्हते. माझी आई मला नेहमी सांगायची, ‘‘टिकली कपाळाच्या मध्ये (आज्ञाचक्रावर) लावावी.’’ मी मात्र तिचे न ऐकता टिकली भुवयांच्या मध्ये लावायचे. साधना चालू केल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेले शास्त्र लक्षात घेऊन मी आता कुंकू कपाळाच्या मध्ये लावण्यास चालू केले आहे.

माझ्या विवाहानंतर सासूबाई सणवार असेल, तर मला नऊवारी साडी नेसण्यास सांगत असत; पण मी ते मनापासून ऐकत नव्हते. काही वेळा सांगितले; म्हणून थोडा वेळ नेसले, असे माझ्याकडून होत असे. साधनेत आल्यावर सात्त्विक वेशभूषेचे महत्त्व समजले आणि त्यात नऊवारी साडी अधिक सात्त्विक असल्याचे महत्त्व समजले. त्यानंतर मी अनेक वेळा मनापासून, विशेषतः सणाच्या दिवशी नऊवारी साडी नेसू लागले.

परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेलीच सूत्रे मला वडीलधाऱ्यांनी आधी वेगळ्या शब्दांत सांगितली होती आणि ती योग्यही होती; परंतु माझ्याकडून तशा कृती होत नव्हत्या. परात्पर गुरु डॉक्टरांनी एखादी गोष्ट करायला सांगितल्यावर आम्ही करायचो; कारण ते सहज व्हायचे आणि आनंदही मिळायचा. त्यांच्या अस्तित्वानेच सर्व घडायचे; परंतु सगळ्यांना ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेले आम्ही सर्वच कसे काय ऐकतो ?’, याचे आश्चर्य वाटायचे.
(‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये १०० टक्के चैतन्य असल्याने त्यांनी कुणालाही काहीही सांगितले, तरी साधकांना अंतर्मनापासून ते ऐकावेसे वाटते.’ – संकलक)

२ ई ४. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्ट योग्य कशी करायची आणि आनंद प्राप्त कसा करायचा ?’, हे शिकवणे : माझ्या सासूबाई पू. (श्रीमती) सीताबाई मराठे म्हणायच्या, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांनी तुम्हाला काही शिकवायचे बाकी ठेवलेच नाही. ‘बोलणे, चालणे, कपडे, दागिने, आहार, विहार, साधना, नियोजन, संघटन, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन या ब्रह्मांडातील सर्व गोष्टी योग्य कशा करायच्या आणि आनंद कसा प्राप्त करायचा ?’, हे त्यांनीच शिकवले.’’
(‘आरंभीच्या टप्प्याला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सभांच्या माध्यमातून साधकांना साधनेची दिशा दिली. पुढे त्यांनी आचारधर्म, धार्मिक कृती, आयुर्वेद, भावजागृती, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन या माध्यमांतून ‘योग्य आचरण कसे करायचे ?’; तसेच राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आणि हिंदु राष्ट्र या समवेत येणाऱ्या आपत्काळात जीवितरक्षणासाठी कोणत्या कृती करायच्या आदी विषयांशी संबंधित ग्रंथमालिका प्रकाशित करून ‘समाजालाच योग्य कृती कशा असायला हव्यात ?’, हे सांगितले.’ – संकलक)

२ उ. परात्पर गुरु डॉक्टरांचे अवतारत्व प्रकट झाल्यावर विरोधकांचा विरोध गळून पडणे : आई-वडील यांचे दायित्व, नोकरी आणि संसार सोडून हे साधनेला जातात, पूर्णवेळ साधना करतात, हे काहींना सहन झाले नाही. ‘परात्पर गुरु डॉक्टर संमोहनशास्त्राचे तज्ञ आहेत. ते तरुणांना संमोहित करतात’, असे काही विरोधक म्हणू लागले; पण कालांतराने सत्य परिस्थिती, म्हणजेच परात्पर गुरु डॉक्टरांचे अवतारत्व प्रकट झाल्यावर त्यांचा विरोध गळून पडला.
(‘महर्षींनी परात्पर गुरु डॉ. आठवले, हे श्रीविष्णूचे अवतार आहेत, असे सांगितले आहे.’ – संकलक)              

(क्रमशः)

– गुरुचरणी शरणागत,

सौ. शालिनी प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.२.२०२२)

भाग ३. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/585731.html