विश्वकल्याणाचा व्यापक संकल्प आणि संपूर्ण विश्वावर निरपेक्ष प्रीती करणारे सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीतून अनुभवलेले भावक्षण !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘परात्पर गुरु डॉक्टर, तुमच्या सहस्रचंद्रदर्शन विधीचे औचित्य साधून तुमची प्रथम भेट, भावभेट आणि दर्शनरूपी स्मरण हेच त्रिदल मानून तुमच्या चरणी अर्पण करते. ‘गुरुदेवा, सच्चिदानंद परब्रह्मस्वरूपा आणि परमकृपाळू ईश्वरा, या निर्गुडीच्या पानाचे (बेलाचे पान उपलब्ध नसते, तेव्हा शिवाला बिल्वदलाच्या ठिकाणी निर्गुडीचे पान अर्पण करतात.) बिल्वदल मानून स्वीकार करावा’, अशी भावपूर्ण प्रार्थना ! 

‘परात्पर गुरु डॉक्टर, गुरुकृपायोगांतर्गत साधना करत असतांना तुमच्या कृपेने आणि केवळ तुमच्या अस्तित्वानेच आमच्यासारख्या सामान्य जिवाला तुम्ही स्थुलातून सूक्ष्मात कसे नेलेत ? अंतःकरणाची शुद्धी (मशागत) करून कृतज्ञताभाव आणि शरणागती यांची सहस्रो भावफुले कशी फुलवलीत ? चैतन्य, आनंद आणि ज्ञान यांचे सहस्र दीप कसे लावलेत ? आणि मोक्षप्राप्ती अन् आनंदप्राप्ती यांसाठी आवश्यक असलेली पात्रता अंगी येण्यासाठी अध्यात्मातील बालवाडी ते ‘पीएच्.डी.’पर्यंतचे शिक्षण, म्हणजेच ९८ टक्के महत्त्व असलेले प्रायोगिक अंगाचे ज्ञान आमच्या गळी उतरवून कृतीत कसे उतरवलेत ?’, हे तुम्हीच जाणता ! ही अंतरंग साधना शब्दातीत आहे, तरीही कृतज्ञता म्हणून ही अमृताची (आत्मतत्त्वाची) गोडी शब्दांत सांगण्याचा भाबडा प्रयत्न करते. तुम्हीच तो तडीस न्या, एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना !

(भाग १)

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रथम भेट

सौ. शालिनी मराठे

एकदा माझा भाऊ (श्री. अशोक सिद्धये) आणि आतेभाऊ (श्री. उदय बर्वे) यांनी आमच्या घरी येऊन आम्हाला सांगितले, ‘‘डॉ. जयंत आठवले नावाचे पूर्वी इंग्लंडमध्ये रहाणारे संमोहनतज्ञ आहेत. ते प.पू. भक्तराज महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे अध्यात्माविषयी मार्गदर्शन करतात आणि अभ्यासवर्ग घेतात. ते विषय पुष्कळ चांगला समजावून सांगतात. तुम्ही अभ्यासवर्गाला अवश्य जा.’’ त्यानंतर फेब्रुवारी १९९३ मध्ये एका रविवारी फोंडा, गोवा येथील शहनाई सभागृहात आम्ही (मी, माझे यजमान श्री. प्रकाश मराठे आणि सासूबाई पू. (कै.) (श्रीमती) सीताबाई मराठे) अभ्यासवर्गासाठी गेलो. तेव्हा आमची परात्पर गुरु डॉक्टरांशी प्रथम भेट झाली.

१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रथम भेटीत त्यांची लक्षात आलेली सूत्रे 

अ. परात्पर गुरु डॉक्टरांचे रहाणीमान साधे होते. ‘पॅन्ट’ आणि सदरा असा त्यांचा पोशाख होता.

आ. जवळच्या लहान ‘स्टूल’वर पाण्याचा झाकलेला पेला, खडीसाखर, पेन, लहान वही आणि घड्याळ होते.

इ. त्यांच्या उजव्या हाताच्या पटलावर प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र होते.

ई. त्यांच्या मुखमंडलावर स्मितहास्य असून डोळे प्रेमळ आणि तेजस्वी होते.

उ. बोलणे हळू आवाजात, एका लयीत आणि स्पष्ट होते.

ऊ. त्यांना भेटायला जातांना मी एकदा त्यांच्याकडे आणि एकदा प.पू. भक्तराज महाराज यांच्याकडे पाहिले. तेव्हा माझ्या मनात ‘एक प्रचारक आहेत आणि एक संत आहेत’, असा विचार आला. परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्या मनातील विचार न सांगताच ओळखला आणि ते मला म्हणाले, ‘‘मला (प्रचारकाला) नको. संतांनाच नमस्कार करा.’’ ‘त्यांनी माझ्या मनातील विचार कसा ओळखला ?’, याचे मला पुष्कळ आश्चर्य वाटले.

ए. या भेटीत त्यांनी आम्हाला कर्मकांडाच्या टप्प्याची माहिती सांगितली आणि ‘उपासनाकांड हा त्यापुढील टप्पा आहे’, हे समजावून सांगितले. त्यानुसार त्यांनी आम्हाला कुलदेवता अन् दत्त यांचे नामस्मरण अधिकाधिक करायला सांगितले.

ऐ. ‘परात्पर गुरु डॉक्टर साधे, सालस आणि चांगले आहेत. त्यामुळे ते घेत असलेल्या अभ्यासवर्गाला जाऊया’, असे मला वाटले.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध माध्यमांतून दिलेली भावभेट 

२ अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी शिष्यभावात राहून केलेले भव्य आणि दिव्य कार्य अनुभवणे : जानेवारी १९९३ ते १९९७ या कालावधीत आमच्यासाठी (मी आणि माझे यजमान श्री. प्रकाश मराठे यांच्यासाठी) मंतरलेले दिवस होते. ‘संसार आणि साधना करतांना दिवस कधी उजाडला अन् कधी मावळला’, याचे आम्हाला भानही नसायचे. या काळात गोव्यातील गुरुपौर्णिमा, प.पू. भक्तराज महाराज यांचा अमृत महोत्सव, त्यांचे महानिर्वाण आणि धर्मजागृती सभा अशा गोष्टी आम्हाला अगदी जवळून पहाता आल्या. परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला त्यात सहभागी करून घेतले. त्यांनी शिष्यभावात राहून केलेले भव्य आणि दिव्य कार्य (गुरुसेवा) आम्ही स्वतः पाहिले आहे.

२ आ. एकमेवाद्वितीय परात्पर गुरु डॉक्टरांच्या सान्निध्यात मन भावावस्थेत, बुद्धी शरणागतभावात आणि जीव कृतज्ञताभावात रहाणे : त्यांच्यातील १०० टक्के सकारात्मकता, कुठे, काय आणि का चुकले ? हे शोधण्याची आणि त्यावर उपाययोजना काढण्याची क्षमता एकमेवाद्वितीयच होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गोष्ट सात्त्विक, अचूक आणि परिपूर्ण असून ती सर्वांगसुंदर, म्हणजेच सत्य, शिव आणि सुंदर व्हायची. त्यामुळे आनंद मिळायचा. काही ना काही कारणाने परात्पर गुरु डॉक्टरांची सततच भेट व्हायची. त्यांच्या सान्निध्यात मन भावावस्थेत, बुद्धी शरणागतभावात आणि जीव कृतज्ञताभावात रहायचा.

२ इ. परात्पर गुरु डॉक्टरांमधील ईश्वरी गुणांनी प्रेरित होणे : परात्पर गुरु डॉक्टरांमधील ईश्वरी गुणांच्या सुगंधाने मोहून, त्यांच्या निरपेक्ष प्रीतीच्या वर्षावाने चिंब भिजलो. त्यांच्या विशुद्ध आत्म्याच्या तेजाने, गुरुसेवेच्या वायूवेगाने आणि विश्वकल्याणाच्या व्यापक संकल्पाने आम्ही भारावून गेलो अन् आम्हाला साधना करण्यासाठी प्रेरणा मिळाली.

(क्रमशः)

– गुरुचरणी शरणागत,

सौ. शालिनी प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.२.२०२२)

भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/585313.html