कृपाकटाक्ष गुरूंचा पडला शिष्यांवरी । उद्धरतो जीव असे कुठेही तो भूवरी ।।
रामनाथी (गोवा) – टाळांचा सुमधुर गजर, मुखी श्रीमन्नारायणाचा घोष, हाती भगवे ध्वज आणि रथात विराजमान झालेले श्रीविष्णुरूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले अन् त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दिव्य दर्शन, अशा भक्तीमय वातावरणात सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त दिव्य आनंददायी ‘रथोत्सव’ २२ मे २०२२ या दिवशी साजरा करण्यात आला. २२ मेच्या आधी २ दिवस मुसळधार पाऊस पडत होता. रथोत्सवाच्या दिवशी पावसाने विश्रांती घेऊन साधकांचे भिजण्यापासून रक्षण केले खरे; परंतु गुरुदेवांच्या केवळ दर्शनाने जागृत झालेल्या भावाश्रूंत साधक न्हाऊन निघाले.
दिव्य रथोत्सवाच्या आधी साधकांची उत्कंठा शिगेला !
सप्तर्षींच्या आज्ञेने गेल्या काही वर्षांपासून सनातनच्या सर्व साधकांची प्राणप्रिय गुरुमाऊली, म्हणजेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी श्रीविष्णु, श्रीराम, श्रीकृष्ण आदी विविध रूपांत दर्शन दिले होते. त्यामुळे यावर्षीही साधकांच्या मनात ‘यंदा गुरु आपल्याला कोणत्या रूपात दर्शन देतील ?’, अशी उत्कंठा निर्माण झाली होती. अंततः वैशाख कृष्ण सप्तमीचा, म्हणजेच गुरुमाऊलींच्या जन्मोत्सवाचा मंगलमय दिवस उजाडला ! साधकांसाठी भूवैकुंठ असलेल्या रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील साधक भक्तीरसाने ओथंबले होते. श्रीगुरूंचे माहात्म्य वर्णिलेली भावपूर्ण भजने अधून-मधून आश्रमातील ध्वनीक्षेपकांवर लावण्यात येत असल्याने सर्व साधक गुरुस्मरणाने जणू वैकुंठाची अनुभूती घेत होते.
गुरुमाऊलींच्या श्रीविष्णुरूपातील दर्शनाने साधक धन्यधन्य झाले !
आश्रमातील साधकांना ‘जन्मोत्सवाच्या दिवशी श्रीरामशिळेचा पालखीसोहळा असून त्यामध्ये त्यांना सहभागी व्हायचे आहे’, हे कळल्यावर ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’, अशी त्यांची अवस्था झाली. वास्तविक साधक पालखीसोहळ्यासाठी जमले होते; परंतु पालखीचा आनंद शतगुणित करण्यासाठी श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेव या सोहळ्यात दिव्य रथात विराजमान आहेत, हे कळताच साधकांचा भाव पुष्कळ जागृत झाला. सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्री गुरुदेव श्रीविष्णूच्या रूपामध्ये दिव्य रथात विराजमान झाले होते. रथात त्यांच्यासमोर उजवीकडे त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि डावीकडे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ बसल्या होत्या. श्रीगुरूंच्या दिव्य रथाच्या मागे असलेल्या पथकांतील साधकांना गुरुदेव रथात प्रत्यक्ष विराजमान आहेत, हे ठाऊक नसतांनाही त्यांची पुष्कळ भावजागृती होत होती. रथोत्सवात सहभागी झालेल्या साधकांच्या मुखावरील भाव अन् आनंद, त्यांनी धारण केलेली सात्त्विक आणि पारंपरिक वेशभूषा, हातात धरलेले भगवे ध्वज, लक्ष वेधून घेणारे फलक, श्रीराम शाळिग्रामाची पालखी आणि सर्वांच्या मुखी श्रीमन्नारायणाचा जयघोष, अशा भक्तीमय वातावरणात या रथोत्सवास प्रारंभ झाला.
भक्त आणि भगवंत यांच्या भेटीचा अद्भुत क्षण !
शंखनाद आणि वेदमंत्र यांच्या घोषात श्रीगुरूंच्या रथोत्सवास प्रारंभ झाला. श्रीगुरूंचा दिव्य रथ आश्रमाच्या प्रवेशद्वारावर उभारलेल्या बालकक्षाच्या समोर आल्यावर श्रीविष्णु रूपातील श्रीगुरूंना पाहून बालसाधकांचाही भाव जागृत झाला. पुढे धर्मप्रसाराची सेवा करणारे साधक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. श्रीगुरूंचे रथातील नयनमनोहारी रूप पाहून साधक स्तब्ध झाले, निःशब्द झाले ! साधकांची विलक्षण भावजागृती झाली. गुरूंना ‘याची देही याची डोळा’, श्रीविष्णुरूपात पाहिल्याचा साधकांच्या मुखमंडलावरील कृतज्ञतेचा भाव शब्दातीत होता ! ‘मूर्ती तुझी ही ठसली नेत्री । पहा चालल्या दिवस या रात्री । दुजी हौस न चित्ती उरली रे श्रीहरि । मन माझे गुंतियले चरणी बा श्रीहरि ।।’ अशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनातील भावस्थिती साधकांनी प्रत्यक्ष अनुभवली. रामनाथी परिसरात शेकडो साधक आणि जिज्ञासू यांनी रथोत्सवाच्या दिव्य दर्शनाचा लाभ घेतला.
नृत्यआराधनेद्वारे श्रीमन्नारायणाचे गुणगान !
श्रीगुरूंचा दिव्य रथ श्री रामनाथ मंदिराजवळ आल्यावर तेथे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील नृत्य विभागातील साधिका ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १५ वर्षे) आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. शर्वरी कानस्कर (वय १५ वर्षे) यांनी ‘जय जनार्दना…’ या गीताद्वारे श्रीमन्नारायणाची नृत्यआराधना केली. रथोत्सवाच्या मार्गात एकूण ३ ठिकाणी नृत्यआराधना करण्यात आली. या वेळी साधिकांच्या चेहऱ्यावरील उत्कट भाव पाहून दुतर्फा उभे असलेल्या साधकांचीही भावजागृती होत होती.
नागेशी येथील साधकांनीही घेतले श्रीगुरूंचे भावपूर्ण दर्शन !
नागेशी येथे साधक सेवा करतात, त्या दिशेने रथोत्सव मार्गक्रमण करू लागला. तेथे सेवा करणारे साधक विविध सदनिकांच्या आगाशींमध्ये आणि मजल्यांवरून रथोत्सवाचे दर्शन घेण्यासाठी आधीपासून उभेच होते. ‘श्रीगुरु आम्हाला भेटावयास आमच्याकडे आले’, या एकाच विचाराने सर्वांचा भाव दाटून आला.
आनंद सोहळ्याचा परतीचा मार्ग !
नागेशी येथील सर्व साधकांचा निरोप घेऊन श्रीगुरूंचा रथोत्सव पुन्हा रामनाथी येथील सनातन आश्रमाच्या दिशेने परत निघाला. रस्त्यावर दुतर्फा उभ्या असलेल्या साधकांना पुन्हा एकदा श्रीगुरूंच्या दर्शनाची संधी लाभली. पुढे रामनाथी आश्रमातील साधक अन् संत रथाच्या परतीच्या वाटेकडे पहात थांबले होतेच ! रथोत्सव आश्रमात परत आल्यावर सर्वांनी पुन्हा त्यांचे भावपूर्ण दर्शन घेतले.
क्षणचित्रे
१. रथोत्सवात श्री देव रामनाथ, श्री शांतादुर्गादेवी, श्री देव नागेश महारुद्र, श्री महालक्ष्मीदेवी, श्री दत्तगुरु यांचाही भावपूर्ण जयघोष करण्यात आला. या माध्यमातून या देवतांचे आशीर्वाद घेण्यात आले.
२. मार्गावरील अनेकांनी घराबाहेर येऊन उत्सुकतेने रथोत्सवाचे दर्शन घेतले.
३. अनेक वाहनचालकांनीही रथोत्सव येत असल्याचे पाहून स्वत:च त्यांचे वाहन दुसऱ्या रस्त्याने वळवून रथोत्सवासाठी पूर्ण सहकार्य केले.
४. रथोत्सवासाठी रामनाथी ते नागेशी या रस्त्याच्या दुतर्फा ध्वज लावण्यात आले होते. रथोत्सवाला प्रारंभ होण्यापूर्वी एकही ध्वज फडकत नव्हता; मात्र रथोत्सवाला प्रारंभ होण्याच्या काही वेळ आधी वारा नसतांनाही ध्वज फडकू लागले.
वाचक आणि हितचिंतक यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
१. श्री रामनाथ देवस्थानात आलेले एक कुटुंब रथोत्सव तो पुन्हा माघारी येईपर्यंत रामनाथीला थांबून त्याचे पुन्हा भावपूर्ण दर्शन घेणे
रत्नागिरी येथून गोव्यात पर्यटनासाठी आलेले एक कुटुंब श्री रामनाथ देवस्थानात दर्शनासाठी आले होते. हा रथोत्सव पाहून ते कुटुंबीय प्रभावित झाले. त्यांनी रथोत्सवाच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या राहिलेल्या सनातनच्या एका साधकाकडे, ‘रथोत्सव पुन्हा परतीच्या मार्गावर म्हणजे रामनाथीला येणार आहे का ?’ याविषयी विचारणा केली. रथोत्सव परत रामनाथीला येणार असल्याचे समजल्यानंतर संबंधित कुटुंबीय रथोत्सवाच्या दर्शनासाठी रामनाथी येथे थांबले आणि त्यांनी रथोत्सवाचे भावपूर्णरित्या दर्शन घेतले.
२. कंबरदुखीचा तीव्र त्रास असूनही रथोत्सवाचे दर्शन घेणाऱ्या आणि ‘पूर्वपुण्याईमुळे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे दर्शन झाले’, असे सांगणाऱ्या सौ. शांता कंटक !
फोंडा, गोवा येथील सौ. शांता कंटक या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचिका आणि विज्ञापनदात्या आहेत. गेले बरेच दिवस त्या कंबरेच्या दुखण्यामुळे घरी झोपूनच आहेत. सनातनच्या साधिका सौ. सुप्रिया नाडकर्णी यांनी त्यांना रथोत्सवाविषयी माहिती दिल्यानंतर त्या म्हणाल्या, ‘‘मी कोणत्याही परिस्थितीत रथोत्सवाला येणारच.’’ रथोत्सवाला त्या आल्या आणि रथाच्या स्वागतासाठी रांगेत उभ्या राहिल्या. यानंतर सनातनच्या साधिकेकडे त्या कृतज्ञतापूर्वक म्हणाल्या, ‘‘पूर्वपुण्याईमुळे मला परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे दर्शन झाले.’’
संधीवाताचा तीव्र त्रास होत असतांनाही रथोत्सवाला उपस्थित रहाणाऱ्या धर्मप्रेमी सौ. प्रीती नाईक !
म्हापसा येथील धर्मप्रेमी सौ. प्रीती नाईक यांना संधीवाताचा तीव्र त्रास आहे. त्यांना इतरांचे साहाय्य घेऊन प्रत्येक कृती करावी लागते. त्या ‘वॉकर’ घेऊन चालतात; मात्र तरीही त्यांनी रथोत्सवाला उपस्थित राहून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन घेतले. ‘माझ्या जीवनाचे सार्थक झाले’, असे सांगतांना भावाश्रू वहात होते. |
ग्रामस्थांचा अभिप्राय !
अनेक ग्रामस्थांनी ‘रथोत्सव अप्रतिम झाला. त्याचे नियोजन आवडले’, असे मत व्यक्त केले. – एका हितचिंतक पत्रकार
रथोत्सव निर्विघ्नपणे संपन्न होण्यासाठी फोंडा पोलिसांचे सहकार्य !
रथोत्सवाला प्रारंभ होण्यापूर्वीपासून फोंडा पोलीस ठाण्यातील काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रथोत्सवाच्या मार्गावर उपस्थित होते. रथोत्सवाला प्रारंभ झाल्यानंतर आणि तो संपेपर्यंत रथोत्सवाच्या पुढे पोलीस अधिकारी अन् पोलीसदलाचे कर्मचारी चालत होते. रथोत्सव मार्गक्रमण करत असतांना पोलिसांनी रस्त्यावरील अन्य वाहतूक काही वेळासाठी अन्यत्र वळवून रथोत्सवासाठी मार्ग पूर्णपणे मोकळा करून दिला. रथोत्सव निर्विघ्नपणे साजरा होण्यासाठी पोलीस, उपजिल्हाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आदींनी केलेल्या सहकार्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.
रथोत्सवाविषयी पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेले अभिप्राय
१. ‘मी स्वतः दिंडी चालू असतांना तिथे येऊन गेलो. तुमचा प्रत्येक कार्यक्रम शिस्तबद्ध असतो. त्यामुळे आम्हाला अधिक ताण नसतो.’ – एक पोलीस अधिकारी
२. ‘तुमचे गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) १५ वर्षांहून अधिक काळ आश्रमातून बाहेर गेले नाहीत. एका ठिकाणी राहून त्यांनी ग्रंथलिखाण केले. हे विलक्षण आहे.’ – अन्य एक पोलीस अधिकारी
श्रीविष्णूचे वस्त्रालंकार परिधान करण्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विचार !
‘म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण’, असे म्हणतात. याची अनुभूती मी ८० व्या वाढदिवसाला घेतली. लहान मुलांना ‘राम’ आणि ‘कृष्ण’ यांच्या प्रमाणे जसे सजवतात, तसे ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सप्तर्षींच्या आज्ञेने साधकांनी मला श्रीविष्णूच्या वेशात सजवले होते.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२२.५.२०२२)
संतांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अवतार संबोधण्याचे कारण !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कधीही स्वतःला अवतार म्हटलेले नाही. सनातन संस्थाही असे कधी म्हणत नाही. ‘नाडीभविष्य’ या प्राचीन अन् प्रगल्भ ज्योतिषशास्त्रानुसार सप्तर्षींनी प्रत्येक व्यक्तीचे भविष्य लिहून ठेवले आहे. तमिळनाडूतील जीवनाडीपट्टीचे वाचन करणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सप्तर्षींनी जीवनाडीपट्ट्यांमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अवतार असल्याचे लिहून ठेवले आहे. सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेने आणि नाडीपट्टीमध्ये सांगितल्यानुसार जन्मोत्सवाच्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीविष्णूच्या रूपात वस्त्रालंकार धारण केले आहेत.
चैतन्यदायी रथोत्सवाच्या वेळी मिळालेले विविध शुभसंकेत !
सप्तर्षींनी रथोत्सवाचे आयोजन करण्यासंदर्भात दिलेल्या आज्ञेनुसार विविध शुभसंकेत मिळाले.
रथोत्सव चालू होण्याआधी आणि चालू असतांनाही गरुड आकाशामध्ये घिरट्या घालत असल्याचे दृश्य अनेकदा दिसले.
श्रीगुरूंचा रथ रामनाथी आश्रमातून रस्त्यावर येताच दूर उभी असलेली सवत्स गाय रथाकडे पळत आली. तिचे लक्ष केवळ रथाकडेच होते. रथ दूर जाईपर्यंत ती रथाकडेच एकटक पहात होती. वाहतूक व्यवस्थेसाठी उपस्थित पोलिसांनी गायीला हाकलण्याचा प्रयत्न केला, तरीही ती तेथेच थांबून रथ न्याहाळत असल्याचे लक्षात आले.
रथोत्सव नागेशीकडे जाण्यासाठी वळत असतांना पारपतीवाडा येथे एक काळे श्वान आल्याचे दिसले.
या सर्व घटनांतून सप्तर्षींनी सांगितल्यानुसार सर्व गोष्टी तंतोतंत तशा प्रकारेच घडल्या.
विंचवाच्या रूपात महर्षि विश्वामित्र यांनी रथाचे रक्षण करणे !
२२ मेच्या पहाटे ४.२० वाजता रथ जेथे उभा होता, तेथे विंचू आला. याविषयी महर्षींना विचारल्यावर त्यांनी, ‘रथाच्या रक्षणासाठी महर्षि विश्वामित्र विंचवाच्या रूपात रथाच्या ठिकाणी आले होते. स्वतः राजा असूनही महर्षि असलेले विश्वामित्र हे एकमेव ऋषि होते. परात्पर गुरु डॉ. आठवले हेही रथावर आरुढ होणे, हे महर्षींनी त्यांना चक्रवर्ती राजाप्रमाणेच आध्यात्मिक सिंहासनावर विराजमान केले आहे’, असे सांगितले. – श्री. विनायक शानभाग