रथोत्सवाच्या सांगतेच्या वेळी आश्रमात परततांना श्रीगुरूंचा दिव्य रथ
करूया अर्चन, पूजन, नृत्य आणि गायन ।
भाव मनीचा अर्पिता प्रसन्न होती श्रीमन्नारायण ।।
टाळघोष करूनी जागर हरिनामाचा करूया ।
ताल धरूनी आज श्रीमन्नारायणाला आळवूया ।।
श्रीमन्नारायणाची भक्ती शिकवणारा, चित्तवृत्ती जागृत करणारा दिव्य रथोत्सव !
श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दिव्य रथोत्सवामध्ये विविध पथकांतील साधक-साधिका यांनी श्रीविष्णूचे गुणसंकीर्तन करून श्रीविष्णुतत्त्वाला आवाहन केले. अत्यंत अलौकिक अशा या रथोत्सवामध्ये भाव, भक्ती आणि चैतन्य यांची उधळण झाल्याची साधकांना अनुभूती आली.
विशेष म्हणजे कित्येक साधकांना आपल्या समोरील रथात परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र नसून ते प्रत्यक्ष उपस्थित आहेत, हेही ठाऊक नव्हते, तरीही त्यांची भावजागृती होत होती. संपूर्ण वातावरण नारायणमय झाले होते. ‘नारायण नारायण गुरुवर नारायण’ ही गोड धून गात मार्गक्रमण करणारा रथोत्सव पाहून इतरांचाही भाव जागृत होत होता, इतके भावमय वातावरण त्या ठिकाणी निर्माण झाले होते. एकप्रकारे हा रथोत्सव चित्तवृत्ती जागृत करणारा आणि अंतर्मुखता वाढवणारा ठरला !
रथोत्सवात सहभागी ध्वजपथकाद्वारे जागवली चैतन्यशक्ती
नृत्यआराधना श्रीमन्नारायणाची करूनी ।
जागवू भाव-भक्ती सर्वांच्या अंतरी ।।
केवळ रथोत्सव नव्हे, हे तर भगवंतभक्तीचे पारायण ।
आनंदे डोलू, मुखाने बोलू नारायण नारायण ।।
श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांचा ‘न भूतो, न भविष्यती’ असा दिव्य रथोत्सव !
आतापर्यंत महर्षीच्या आज्ञेने परात्पर गुरुदेवांचे दिव्यत्व उलगडणारे विविध सोहळे साधकांनी अनुभवले आहेत. त्या सर्व सोहळ्यांमध्ये यंदाचा सोहळा अद्वितीय ठरला ! सनातनच्या ३ गुरूंचे चैतन्यदायी अस्तित्व, विविध भक्तीपथके, साधिकांची भावनृत्ये, टाळांचा गजर यांद्वारे साऱ्या सृष्टीवर चैतन्याची उधळण झाली. आधी २ दिवस पाऊस पडून गेल्यामुळे वसुंधरा, निसर्ग, लता-वेलीही स्वच्छ वसने लेऊन भगवंताच्या दर्शनासाठी आतुर झाल्या होत्या, हेही दिसून आले !
वर्षभर मंदिरात असणारा भगवंत वार्षिक पालखी उत्सवाच्या वेळी स्वतः भक्तांना भेटायला जातो, त्या वेळी भक्त आणि भगवंत दोघांनाही भेटीचा अपार आनंद मिळतो. अगदी त्याचप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले आणि साधक यांना एकमेकांना भेटून अपार आनंद मिळाला !