‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने महर्षींनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा रथोत्सव साजरा करण्यात आला. देवाच्या कृपेने या रथोत्सवाचे माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे पालखीच्या ठिकाणी शुभागमन होणे
जेव्हा परात्पर गुरुदेवांचे पालखीच्या ठिकाणी शुभागमन झाले, तेव्हा सनातनच्या संतांनी त्यांचे स्वागत केले. तेव्हा विष्णुस्वरूप गुरुदेवांच्या स्वागतासाठी संतांच्या ठिकाणी सूक्ष्मरूपात अष्टदेवता आणि अनेक ऋषी-मुनी उपस्थित असल्याचे जाणवले. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर देवतांची कृपा झाल्यामुळे देवबळ आणि ऋषिमुनींची कृपा झाल्यामुळे तपोबळ अन् ज्ञानबळ या तिन्ही बळांमध्ये वृद्धी झाल्याचे जाणवले. अशा प्रकारे श्री विष्णुस्वरूप परात्पर गुरुदेव केवळ साधक आणि संत यांनाच प्रिय नसून ऋषिमुनी अन् देवता यांनाही प्रिय असल्याचे जाणवले.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पालखीतील ‘श्रीराम शाळिग्रामा’चे भावपूर्ण दर्शन घेऊन फुले वहाणे
रथोत्सवाच्या आरंभी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पालखीमध्ये ठेवलेल्या ‘श्रीराम शाळिग्रामा’चे भावपूर्ण दर्शन घेऊन त्यावर फुले वाहिली. तेव्हा परात्पर गुरुदेवांची भक्तीमय दृष्टी शाळिग्रामावर पडल्यावर त्यामध्ये सुप्तावस्थेत असलेले श्रीरामाचे निर्गुण स्तरावरील तत्त्व जागृत होऊन प्रकट झाले. तेव्हा शाळिग्रामातून तेजस्वी निळसर रंगाचा दिव्य प्रकाश वातावरणात प्रक्षेपित झाल्याचे सूक्ष्म दृश्य दिसले. त्याचप्रमाणे या शाळिग्राममध्ये पिवळसर रंगाची तेजस्वी ज्योत दिसली. ही ज्योत म्हणजे प्रभु श्रीरामाच्या हृदयात विराजमान असणाऱ्या शिवाची आत्मज्योत होती. जेव्हा परात्पर गुरुदेवांनी शाळिग्रामाला फुले वाहिली, तेव्हा शाळिग्रामातून संपूर्ण वातावरणात चैतन्य आणि आनंद यांच्या लहरींची उधळण होऊन संपूर्ण वातावरण चैतन्यदायी अन् आनंदमय झाले. शाळिग्रामरूपी प्रभु श्रीरामाने परात्पर गुरु डॉ. आठवले आणि साधक यांना ‘पृथ्वीवर लवकर रामराज्य स्थापन होणार आहे’, हा शुभाशीर्वाद दिला.
३. परात्पर गुरुदेवांचे नारायणरूप पहाण्यासाठी ऋषिमुनी आणि देवता यांच्यासह सृष्टीच आतूर झाल्याचे जाणवणे
जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले रथामध्ये विराजमान झाले, तेव्हा स्वर्गलोकातील देवतांनी परात्पर गुरुदेवांवर सुवासिक पुष्पांची वृष्टी केली आणि शंखनाद केला. त्यामुळे संपूर्ण वातावरणात फुलांचा मंद दैवी सुगंध दरवळून वातावरण अधिकच मंगलमय आणि दिव्य झाले. परात्पर गुरुदेवांनी श्रीविष्णुप्रमाणे वेशभूषा केली होती आणि त्यांनी मुकुटासहित सुवर्णालंकार धारण केले होते. त्याचप्रमाणे त्यांनी प.पू. दास महाराजांनी त्यांना भेट दिलेली लाकडी गदा आणि तुळशीची माळ धारण केली होती. त्यामुळे परात्पर गुरुदेवांचे दिव्य रूप अधिकच खुलून आले होते. ‘त्यांचे हे नारायणरूप पहाण्यासाठी साधक, संत, ऋषिमुनी आणि देवता यांच्यासह संपूर्ण सृष्टीच आतुर झालेली आहे’, असे जाणवत होते.
४. ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी देवतांची तत्त्वे सनातनच्या ३ गुरूंच्या माध्यमातून कार्यरत झालेली असणे
रथोत्सवात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या ठिकाणी श्री महालक्ष्मीदेवी आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या ठिकाणी श्री दुर्गादेवी विराजमान असल्याचे जाणवले. श्रीविष्णूच्या पृथ्वीवर हिंदु राष्ट्र स्थापन करण्याच्या अवतारी कार्यामध्ये ज्ञानशक्तीस्वरूप परात्पर गुरुदेव, इच्छाशक्तीमय श्री महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि क्रियाशक्तीमय श्री दुर्गादेवीस्वरूप श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ सहभागी असल्याचे जाणवले. या तिन्ही अवतारी गुरूंमुळे पृथ्वीवरील पापाचा भार न्यून होऊन पृथ्वीवर उच्च लोकांतील दैवी शक्तींचा स्रोत येत आहे. त्यामुळे सूक्ष्म युद्धामध्ये वाईट शक्तींचा पराभव होऊन समस्त देवतांचा विजय होणार आहे आणि पृथ्वीवर प्रथम सूक्ष्मातून अन् नंतर स्थुलातून रामराज्याची म्हणजे ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होणार आहे.
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सवाची सूक्ष्मातून जाणवलेली दिव्य शोभा
श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरुदेवांचे श्रीविष्णुस्वरूप आणि सद्गुरुद्वयींचे देवीस्वरूप अनुभवण्यासाठी ब्रह्मांडातील विविध लोकांतील सात्त्विक जीव रथोत्सवात सूक्ष्मातून उपस्थित असल्याचे जाणवले. रथाच्या मागे महर्लाेक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक येथील अनेक ऋषी-मुनी शंखनाद करत सूक्ष्मातून चालत असल्याचे जाणवले, तसेच रथाच्या वरती पंख असणारे ‘गंधर्व’ आणि ‘श्रीविष्णूचे दूत’ उडत असल्याचे सूक्ष्मातून दिसले. परम विष्णुभक्त ‘देवर्षि नारद’ आणि ‘तुंबरु’ (घोड्याचे मुख असलेला ‘गंधर्व’ जो गायन करतो आणि त्याच्या हातात भोपळ्याप्रमाणे दिसणाऱ्या ‘तुंबरु’ नावाच्या फळाचे मृदंगाप्रमाणे दिसणारे वाद्य असते किंवा जो वीणेवर वादन करतो) वीणा घेऊन मंगलगान करत रथाच्या समोर चालत असल्याचे सूक्ष्मातून दिसले. सर्वांना श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरुदेवांच्या रथोत्सवात सहभागी होण्याचा आनंद लुटायचा होता. त्यामुळे सर्वजण सहस्रो वर्षांपासून या सुवर्णक्षणाची व्याकुळतेने वाट पहात असल्याचे जाणवले.
६. परात्पर गुरुदेवांचा रथ श्री सूर्यनारायणाच्या रथाप्रमाणे असणे आणि त्यामुळे विविध चक्रे गतीमान होणे
परात्पर गुरुदेव विराजमान झालेला रथ सामान्य रथ नसून तो ‘गरुडरथ’ असल्याचे जाणवले. तेव्हा रथाच्या दोन्ही बाजूला सोनेरी रंगाचे गरुडाचे पंख असल्याचे सूक्ष्मातून दिसले. तेव्हा रथाच्या चाकांचा स्पर्श भूमीला न होता, तो हवेत ढगांमध्ये तरंगत असल्याचे आणि हवेत उंच उडत असल्याचे जाणवले. तेव्हा रथाचे पत्र्याचे अश्व खरोखरचे अश्व असल्याचे जाणवले. त्या वेळी साक्षात् सूर्यनारायणाने
श्रीनारायणाच्या ‘जयंत’ अवताराला त्याचा पांढऱ्या ७ अश्वांचा दिव्य रथ दिल्याचे जाणवले. या श्रीमन्नारायणाचा हा दिव्य रथ कार्यरत झाल्यामुळे सृष्टीतील ऋतुचक्र, विचारचक्र, धर्मचक्र आणि कालचक्र ही सूक्ष्म अन् दिव्य चक्रे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने गतीमान झाल्याचे जाणवले.
७. परात्पर गुरुदेवांचा रथोत्सव पृथ्वीवर होत नसून साक्षात् वैकुंठात होत असल्याचे जाणवणे
परात्पर गुरुदेवांच्या ठिकाणी निळी कांती असलेल्या श्री महाविष्णूचे दर्शन झाले. शेषनागाने परात्पर गुरुदेवांच्या मस्तकावर लाल रंगाची राजसी थाटातील छत्री धरली होती आणि गरुड अन् हनुमंत त्यांच्या दोन्ही बाजूला उभे राहून त्यांना चामराने वारे घालत होते. रथाच्या डाव्या बाजूला राजहंसावर स्वार झालेले ब्रह्मदेव आणि रथाच्या उजव्या बाजूला नंदीवर स्वार झालेले सदाशिव सूक्ष्मातून गरुडरथात स्वार झालेल्या श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरुदेवांसह रथोत्सवातून चालत असल्याचे दिसले. तेव्हा परात्पर गुरुदेवांच्या उजव्या बाजूला राजहंसावर स्वार झालेली श्री सरस्वतीदेवी आणि डाव्या बाजूला सिंहावर आरूढ झालेली श्री दुर्गादेवी दिसली. पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी श्री सरस्वतीदेवीकडून ज्ञानशक्ती आणि श्री दुर्गादेवीकडून मारक शक्ती यांचे प्रक्षेपण झाले.
श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांच्या चरणांशी गुलाबी रंगाच्या कमळामध्ये श्री महालक्ष्मीदेवी आसनस्थ असल्याचे सूक्ष्मातून दिसले. तिच्याकडून समस्त साधकांकडे सद्गुणरूपी ऐश्वर्याचे प्रक्षेपण झाले. या रथोत्सवात यक्ष, गंधर्व आणि किन्नर मंगल वाद्ये वाजवत भावविभोर होऊन नर्तन करत होते आणि काही अप्सरा हातामध्ये पणत्या घेऊन रथाच्या दुतर्फा उभ्या होत्या अन् काही अप्सरा आकाशमार्गावर उभ्या राहून सात्त्विक नृत्य करत होत्या. तेव्हा सूक्ष्मातून आकाशामध्ये सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसत होते. या इंद्रधनुष्याच्या वर विराजमान असणाऱ्या देवतांनी रथोत्सव संपेपर्यंत अखंड पुष्पवृष्टी केली. तेव्हा देवगुरु बृहस्पती आणि भृगु, वसिष्ठ आदि सप्तर्षींनी वेदमंत्रांचा जयघोष केला. अशा प्रकारे हा विष्णुस्वरूप नारायणाचा रथोत्सव पृथ्वीवर होत नसून वैकुंठात होत असल्याचे जाणवले.
८. साधकांच्या माध्यमातून नारदमुनींनी श्रीविष्णूचे गुणगान करणे
जेव्हा श्री. विनायक शानभाग परात्पर गुरुदेवांच्या महतीचे ओजस्वी वाणीतून निवेदनाद्वारे वर्णन करत होते, तेव्हा साक्षात् विष्णुस्वरूप असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुणगान श्रीविष्णूचे परम भक्त श्रीनारदमुनी करत असल्याचे जाणवले. त्यामुळे श्री. विनायक शानभाग यांची वाणी ऐकताच सर्व साधकांचा विष्णुस्वरूप परात्पर गुरुदेवांप्रती असणारा अनन्यभाव, कृतज्ञताभाव आणि शरणागतभाव जागृत होत होता. त्याचप्रमाणे सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि सौ. अनघा जोशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांच्या आवाजातील भक्तीगीते अन् श्री. मनोज सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी भक्तीगीतांच्या पार्श्वसंगीतरूपी वाजवलेल्या सतारीचा सात्त्विक नाद ऐकत असतांना त्यांच्या भावमय आवाजातून जणू भावगंगाच वहात असल्याचे जाणवले. तेव्हा सर्वांची मने भावगंगेत न्हाऊन निघाली आणि प्रत्येकाच्या हृदयसिंहासनावर श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरुदेवांचे सुंदर आणि लोभस रूप विराजमान असल्याचे सूक्ष्म दृश्य दिसले. सर्व साधकांनी ‘न भूतो न भविष्यति’ असा हा श्रीविष्णूचा रथोत्सव मन:पटलावर आनंदमय स्मृतींसह कोरून ठेवल्याचे जाणवले.
९. परात्पर गुरुदेवांच्या जयजयकाराने संपूर्ण वातावरण दुमदुमणे
परात्पर गुरुदेवांचा जयजयकार चालू असतांना सर्व साधकांमध्ये वीरश्री संचारून त्यांचा क्षात्रभाव आणि समर्पणभाव एकाच वेळी जागृत होत होता. त्यामुळे साधकांच्या मनावर परात्पर गुरुदेवांचे माहात्म्य सुवर्णाक्षरांत बिंबले गेले आणि त्यांच्या प्रती असणारा आदरभाव जयघोषातून आसमंतात घुमत होता. परात्पर गुरुदेवांच्या जयजयकाराने संपूर्ण वातावरण दुमदुमले आणि सर्वांच्या मनामध्ये नवचैतन्य जागृत होऊन नवउत्साह संचारला होता. त्यामुळे साधकांचे तोंडवळे भाव, चैतन्य आणि आनंद यांनी उजळून निघाले.
१०. परात्पर गुरुदेवांची कृपामय दृष्टी पडल्यामुळे साधकांची मने कृतज्ञताभावाने भरून येणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्वागत करण्यासाठी रथाच्या मार्गाच्या दुतर्फा सनातनचे प्रसारातील साधक अत्यंत भावपूर्ण मुद्रेत हात जोडून उभे होते. साधकांना पाहून परात्पर गुरुमाऊलीचे हृदयही प्रीतीने भरून आले. परात्पर गुरुदेवांची कृपामय दृष्टी केवळ साधकांवरच नव्हे, तर सभोवतालच्या संपूर्ण परिसरावर पडली. त्यामुळे साधकांची मने कृतज्ञताभावाने भरून आली आणि त्यांच्या नेत्रांतून भावाश्रूंच्या रूपाने भावगंगा प्रवाहित झाली. संपूर्ण सृष्टीने परात्पर गुरुदेवांची प्रीती अनुभवल्यामुळे संपूर्ण सृष्टीच चैतन्याने न्हाऊन निघाली. श्रीमन्नारायणाच्या रूपातील परात्पर गुरुदेवांना पाहून साधक यांसह झाडे, वृक्ष, वेली, पशू आणि पक्षी कृतकृत्य झाले.
११. पाच रंगांच्या फुलांच्या रूपाने पंचमहाभूते परात्पर गुरुदेवांना शरण आल्याचे जाणवणे
रथोत्सवाची सांगता झाल्यावर श्री विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले सिंहासनावर आरुढ झाले. त्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्यांच्या चरणांवर पाच रंगांची फुले भावपूर्णरित्या वाहिली. तेव्हा पाच रंगांच्या फुलांच्या रूपाने पंचमहाभूते श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरुदेवांना शरण आल्याचे जाणवले. तेव्हा परात्पर गुरुदेवांना फुलांच्या रूपाने भावाचा स्पर्श झाल्यामुळे श्रीगुरूंचे मारक रूप शांत होऊन त्यांचे तारक रूप कार्यरत झाले. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील अवतारी तत्त्व काही अंशी सुप्तावस्थेत गेल्याने ते शिवात्मा-शिवदशेत गेले आणि त्यांच्याकडून शांतीच्या लहरींचे प्रक्षेपण चालू झाले.
१२. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे कोहळ्यावर कापूर पेटवून परात्पर गुरु डॉ. आठवले यांची दृष्ट काढणे
या रथोत्सवाच्या वेळी मार्गातील काही ठिकाणी वाईट शक्तींचा पुष्कळ दाब जाणवत होता. तेव्हा परात्पर गुरुदेवांच्या हातातून सोनेरी रंगाचे सुदर्शनचक्र सूक्ष्मातून या वाईट शक्तींच्या दिशेने गेले आणि त्यांना नाहीसे केले. तेव्हा वाईट शक्तींनी परात्पर गुरुदेवांवर निर्गुण-सगुण स्तरावरील त्रासदायक शक्ती सोडली होती. त्यामुळे परात्पर गुरुदेवांच्या भोवती पारदर्शक त्रासदायक आवरण निर्माण झाले होते. जेव्हा सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी महर्षींनी सांगितल्याप्रमाणे कोहळ्यावर कापूर पेटवून परात्पर गुरु डॉ. आठवले यांची दृष्ट काढली, तेव्हा त्यांच्या भोवती असणारी पारदर्शक त्रासदायक शक्ती कोहळ्याकडे खेचली गेली आणि कापराच्या ज्योतीने ती नष्ट झाली. त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भोवती महर्षींच्या संकल्पाने कार्यरत झालेल्या दिव्य तेजोमय शक्तीचे संरक्षककवच कार्यरत झाले.
रथोत्सवात सहभागी झालेल्या साधकांच्या गुणवैशिष्ट्यांची सूक्ष्मातील वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
कृतज्ञता
सर्व साधकांनी हा रथोत्सव निर्विघ्नपणे पार पडल्याबद्दल ईश्वराच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त केली. श्रीगुरूंच्या कृपेनेच त्यांच्या दिव्य रथोत्सवाच्या वेळी सूक्ष्मातून घडणाऱ्या घडामोडींचे मला ज्ञान प्राप्त झाले आणि त्यामागे दडलेले आध्यात्मिक रहस्य उमजले. यासाठी मी श्री गुरुचरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.५.२०२२)
|