१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अध्यात्म विद्येला पुन्हा उजळवण्याचे कार्य महनीय ! – प.पू. गोविंददेवगिरि महाराज, कोषाध्यक्ष, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्या
जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् । मी जेव्हा जेव्हा आठवलेजी यांचा विचार करतो, तेव्हा माझे अंतःकरण आदराने भरून येते; कारण त्यांनी अत्यंत कुशलतेने हिंदु राष्ट्राच्या संस्थापनेचा उद्घोष केला आहे. ते सनातन संस्थेचे संस्थापक आहेत. मी पहात आलो आहे की, या संस्थेने चांगल्या कार्यकर्त्यांची निर्मिती केली आहे. असंख्य युवक-युवती समर्पितभावाने हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी अखंड प्रयत्नशील आहेत. अशा प्रकारचे कार्य करणे, आजच्या घडीला एक असाधारण कार्य आहे आणि हे त्यांच्याकडून निर्विकारपणे केले जात आहे. अध्यात्म ही हिंदुत्वाची आधारशीला आहे. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची स्थापना करून त्यांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) हिंदु राष्ट्राला केवळ राजकीय रूप न देता आपल्या (भारताच्या) अध्यात्म विद्येला पुन्हा उजळवण्याचे आणि अनेक प्रयोग करून अनेक साधकांना यासाठी घडवण्याचे एक महनीय कार्य केले आहे. एकांतात राहूनही अखंड हिंदु राष्ट्राचे चिंतन करणारे आणि भारताच्या परंपरांचे पुररुज्जीवन करण्यासाठी अखंड प्रयत्नशील रहाणारे, सनातन संस्थेच्या माध्यमातून सनातन प्रवाहाला या राष्ट्रात पुनर्जागृत करण्यासाठी कटीबद्ध असलेल्या अशा या महान विभूतीचा ८० वा वाढदिवस आम्हा सर्वांसाठी पुष्कळ आनंददायी गोष्ट आहे. मी त्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या कामना करत परमपिता परमेश्वराकडे प्रार्थना करतो की, ते आम्हाला शताधिक वर्षे अशाच प्रकारे मार्गदर्शन करत राहोत आणि भारताचे भविष्य उज्ज्वल करण्यात त्यांचे योगदान देत राहोत. भारतमाता की जय ! वन्दे मातरम् !
२. परात्पर गुरूंच्या शिकवणीचे आचरण करणे, हे भारतातील सर्व तरुण वर्गाचे कर्तव्य ! – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, अध्यक्ष, हिंदू फ्रंट फॉर जस्टिस
परात्पर गुरु जयंत आठवले यांचा वाढदिवस हा मोठा आनंदाचा दिवस ! वास्तवात गुरुजींनी (परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी) या विश्वाला एक प्रकाश दिला आहे. आम्हा साऱ्या अनुयायांना अध्यात्माचा मार्ग दाखवला आहे. त्या मार्गावर चालून आम्ही देशाची आणि हिंदुत्वाची सेवा करू शकतो. या देशाला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी हा आध्यात्मिक मार्ग दाखवला, त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. ‘त्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे’, अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो, ज्यामुळे त्यांचे सान्निध्य आणि आशीर्वाद अन् शिकवण आम्हाला मिळत राहो. त्यांचा वाढदिवस हे एक आंदोलन बनावे. त्यांच्या संकल्पाप्रमाणे आध्यात्मिक मार्ग अवलंबून धर्माधारित हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठीची चळवळ त्या निमित्ताने उभी रहावी. त्यांच्या संकल्पाची पूर्तता आम्हाला करावी लागेल. परात्पर गुरूंच्या शिकवणीचे आचरण करणे, हे भारतातील सर्व तरुण वर्गाचे कर्तव्य आहे. परात्पर गुरूंच्या चरणी मी वंदन करतो आणि ‘त्यांनी आम्हाला आशीवर्चन द्यावेत’, अशी प्रार्थना करतो.
३. डॉ. आठवले ‘परिस’ बनून त्यांच्या भक्तांना महान बनवत आहेत ! – पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज, ९ वे पिठाधीश्वर, शदाणी दरबार तीर्थ, रायपूर, छत्तीसगड
गोवा स्थित सनातन संस्थेचे संस्थापक ज्यांना आपण प्रेमाने ‘परात्पर गुरु’ म्हणतो, अशा डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याला नमन करतो. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती व्यापक स्तरावर भारतीय संस्कृती अन् सनातन धर्म यांचा मूलभूत संदेश सर्वांपर्यंत पोचवून त्यांना महान अशा गौरवशाली हिंदु धर्माशी जोडण्याचे पवित्र कार्य करत आहेत. या संघटना आणि त्यांचे अनेक समर्पित अन् श्रेष्ठ वक्ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश जनमानसांत पोचवत आहेत. मी स्वतः तिथे (सनातनच्या आश्रमात) जाऊन पाहिले आणि (कार्य) समजून घेतले आहे. सनातन संस्था ही हिंदु धर्माच्या उत्थानासाठी तेथे धर्मसंमेलन, चरित्रनिर्माण, सत्कर्म, ज्ञान आणि विद्या यांच्या माध्यमातून सर्वांना भारताच्या संस्कृतीशी जोडत आहे. तेथे सेवा आणि साधना दोन्ही चालू आहे. डॉ. आठवले हे ‘परिस’ बनून त्यांच्या लोखंड, चांदी, सोने यांसारख्या (विविध प्रकृती असणाऱ्या) भक्तांना स्वतःच्या चुंबकीय शक्तीने जोडून ‘महान’ बनवत आहेत. राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी बनवत आहेत. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, या संस्थेच्या माध्यमातून आपला भारत बलशाली बनेल. भारत आणि हिंदु धर्माची कीर्ती होईल. असे महान गुरु कर्म, ज्ञान, विद्या यांच्या माध्यमातून आणि साधनेच्या बळावर लोकांमध्ये जागृती करत आहेत. त्यांना चांगले आणि सुखकारक जीवन मिळावे, यासाठी सद्गुरु शदाराम महाराज यांच्या चरणी मंगल कामना करतो.
४. भारतीय संस्कृतीचे संपोषक माननीय श्री. जयंत बाळाजी आठवले यांना ८० व्या जन्मादिनाच्या पुष्कळ शुभेच्छा ! – समर्थ श्री त्र्यंबकेश्वर चैतन्य महाराज, अखिल भारतवर्षीय धर्मसंघ आणि स्वामी करपात्री फाऊंडेशन, भादरा, राजस्थान
हर हर महादेव ! सनातन संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण भारतवर्षाला गौरवान्वित करणारे, या भारतवर्षाला आपल्या संकल्पानुसार हिंदु राष्ट्राच्या रूपात बघणारे आणि भारतीय संस्कृतीचे संपोषक (पोषण करणारे) माननीय श्री. जयंत बाळाजी आठवले यांना त्यांच्या ८० व्या जन्मादिनाच्या पुष्कळ शुभेच्छा ! आम्ही समग्र सनातन धर्मावलंबी तुमचे निरामय चिरायु आयुष्याची कामना करतो. अखिल भारतवर्षीय धर्मसंघ आणि स्वामी करपात्री फाऊंडेशन यांच्या वतीने सनातन संस्थेला आणि संस्थेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या संस्कृतीच्या प्रसारकार्याला पुष्कळ ‘साधुवाद’ (आशीर्वाद) देतो. माननीय श्री. जयंत आठवले यांना त्यांच्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा !
५. ‘गुरु कसे असावेत’, याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले ! – प.पू. रामभाऊस्वामी तंजावूर, तमिळनाडू.
‘परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे धर्मसंस्थापनेचे कार्य करत आहेत. मी सतत गुरुदेव डॉ. आठवले यांचे स्मरण करतो. ‘आठवले’ यांना ‘आठवल्या’विना माझा एकही दिवस जात नाही. गुरुदेव डॉ. आठवले यांच्या समवेत राहून सेवा करणारे सनातन संस्थेचे साधक धन्य आहेत. एकवेळ महान गुरूंचे दर्शन होईल; मात्र ‘गुरुसेवा’ करायला मिळणे याला भाग्य लागते. ‘गुरुसेवा’ करणारे सनातनचे साधक ‘भाग्यवंत’ आहेत. समर्थ रामदासस्वामींनी मनाच्या श्लोकांमध्ये ‘गुरु कसे असावेत’, असे जे वर्णन केले आहे, त्याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले होय ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त त्यांना पुष्कळ आशीर्वाद !’