भारताचे शेजारी राष्ट्र असलेला श्रीलंका अतिशय कर्जबाजारी झाला आहे आणि तेथे अराजकता माजली आहे. नेपाळही कर्जबाजारी झाला असून तेथे आणीबाणी लागू झाली आहे, तर बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणात होणारी घुसखोरी भारतासाठी धोकादायक बनली आहे. तेव्हा या शेजारच्या राष्ट्रांमधील घडामोडींचा भारतावर काय परिणाम होईल, हे पहाणे सुरक्षेसाठी महत्त्वाचे ठरेल.
१. श्रीलंकेतील अराजकता भारतासाठी धोकादायक !
१ अ. श्रीलंकेतील राजपक्षे घराणे चीनच्या आहारी जाणे आणि त्यांना चीनची कूटनीती न समजणे : श्रीलंकेने चीनकडून प्रचंड प्रमाणात कर्ज घेतले आणि आता तो कर्जबाजारी होऊन बसला आहे. चीनने श्रीलंकेत सर्वप्रथम हंबनतोता हे बंदर बांधले. तेथे प्रतिवर्षी ५ सहस्र जहाजे येतील, अशी त्यांना अपेक्षा होती. ते सिद्ध होऊन अनेक वर्षे झाली आहे; पण तेथे वर्षाला ५ जहाजेही येत नाहीत. त्यामुळे श्रीलंकेसाठी तो पांढरा हत्ती बनला आहे. काही वर्षांपूर्वी तेथे निवडणूक झाली. त्यात राजपक्षे हा परिवार चांगल्या मतांनी निवडून आला आणि ते तेथील महत्त्वाचे नेते बनले. त्यांनी कोलंबो बंदरही विकसित करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी परत चीनकडून कर्ज घेतले. तेथेही काहीही निष्पन्न होण्याची शक्यता नाही. राजपक्षे घराणे चीनच्या एवढ्या आहारी गेले आहे की, त्यांना चीनची कूटनीती न समजल्याने ते देशाचे सार्वभौमत्व गमावून बसले.
१ आ. श्रीलंकेचा पर्यटन व्यवसाय बंद पडणे आणि भारताने त्याला कर्ज देणे : श्रीलंकेचा मुख्य व्यवसाय हा पर्यटनावर अवलंबून आहे. २ वर्षांपूर्वी कोरोनामुळे दळणवळण बंदी होती. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा मोठा भाग असलेला पर्यटन आणि चहाचा व्यवसाय पूर्णपणे बंद पडला होता. त्यांच्याकडे इंधनासारख्या प्रतिदिन लागणाऱ्या गोष्टी खरेदी करण्यासाठीही विदेशी चलन शेष नाही. चीन, तसेच अन्य कोणतीही राष्ट्रे त्यांना साहाय्य करायला सिद्ध नाहीत. अशा परिस्थितीत श्रीलंकेच्या विविध मंत्र्यांनी भारताकडे साहाय्यासाठी हात पसरले. तेव्हा भारताने त्यांना ३ अब्ज डॉलर्स एवढे ‘सॉफ्ट’ (साध्या) अटींवर कर्ज दिलेले आहे.
१ इ. श्रीलंकेतून दक्षिण भारतात होणारी घुसखोरी वाढ धोकादायक असणे : श्रीलंकेतील अस्थिरता भारतासाठी धोकादायक आहे. या अस्थिर परिस्थितीमुळे श्रीलंकेतून दक्षिण भारतात होणारी घुसखोरी वाढली आहे. अनेक वेळा चीन आणि पाकिस्तान येथील गुप्तहेर संस्थांच्या कारवाया श्रीलंकेतून चालतात. ते दक्षिण भारतात आतंकवाद निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे आता भारताने श्रीलंकेला त्यांच्या बाजूने आतंकवादी करायला नको, असे ठणकावून सांगितले पाहिजे.
२. नेपाळमध्ये आणीबाणी लावण्यात येणे आणि सीमेवर मदरसे अन् मशिदी यांचे जाळे प्रचंड वाढणे
नेपाळमध्ये पूर्वी काही काळ भारताच्या विरोधातील सरकारे होती. सुदैवाने आताचे देऊबा हे पंतप्रधान भारताचे मित्र आहेत. नेपाळचीही अर्थव्यवस्था अतिशय कठीण परिस्थितीतून जात आहे. कोरोनाच्या काळात विदेशात काम करणाऱ्या नेपाळी नागरिकांना त्यांच्या देशात परत यावे लागले. त्यामुळे त्यांच्याकडून मिळणारे विदेशी चलन आता पूर्णपणे बंद झाले आहे. तेथे पर्यटन हा सर्वांत मोठा व्यवसाय आहे. तो गेल्या २ वर्षांपासून पूर्णपणे बंद पडला आहे. त्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था अतिशय वाईट स्थितीत असल्याने त्यांनी आणीबाणी घोषित केली आहे. सध्या त्यांनी महागड्या वस्तू आयात करायच्या नाही, असे ठरवले आहे. नेपाळ सीमेवर मदरसे आणि मशिदी यांचे जाळे प्रचंड प्रमाणात वाढले आहे. तेथून पाकिस्तानची ‘आय.एस्.आय.’ संघटना भारताच्या विरोधात अनेक अपकृत्ये करत असते. नेपाळवर चीनचे एवढे वर्चस्व आहे की, चीन त्यांच्या नेहमीच्या जीवनातही ढवळाढवळ करत असतो.
३. बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी अन् गोवंश तस्करी रोखणे आवश्यक !
शेजारी राष्ट्रांमध्ये बांगलादेशची अर्थव्यवस्था बऱ्यापैकी चांगली आहे. दळणवळण बंदीमुळे त्यांच्याही अर्थव्यवस्थेला धोका पोचला आहे; पण तो श्रीलंका आणि नेपाळ यांच्याएवढा गंभीर नाही. बांगलादेशातून होणारी घुसखोरी ही भारतासाठी मोठी डोकेदुखी बनली आहे. नुकतेच देहलीमध्ये अवैधपणे वास्तव्य करत असलेल्या रोहिंग्यांमुळे देशाच्या ऐक्यास धोका निर्माण झाला आहे. जहांगीरपुरीतील ‘सी ब्लॉक’ आणि ‘एच्-२’ या झोपडपट्ट्यांमध्ये सर्वाधिक बांगलादेशी लोकसंख्या आहे. त्यामुळे बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना पकडून त्यांच्या देशात परत पाठवणे आवश्यक आहे. बांगलादेशातून होणारी घुसखोरी थांबवून त्यांच्याशी भारताचे संबंध अधिक सबळ करावे लागतील. भारतातून गोवंशियांची बांगलादेशात तस्करी केली जाते. तेथे भारताहून ३-४ पट अधिक मोबदला मिळतो. ही तस्करी थांबवण्यात सीमा सुरक्षा दलाला यश मिळालेले नाही. त्यामुळे भारताला भूस्तरावरील सीमांचे चांगल्या प्रकारे रक्षण करावे लागेल.
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे
बांगलादेशातील नद्यांचा वापर ईशान्य भारताला करू देण्यावर दोन्ही देशांची सहमती !नुकतेच भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर हे बांगलादेशात जाऊन आले. भारतातील ज्या नद्या बांगलादेशातून समुद्रात मिसळतात, त्या नद्यांचा वापर ईशान्य भारताला करू द्यावा, यासाठी बांगलादेशने सहमती दर्शवली आहे. ईशान्य भारताला सर्वांत जवळचा समुद्र अर्थात् बांगलादेशात आहे. भारताला जर बांगलादेशातील गंगा, मेघना आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांचा वापर करता आला, तर त्यांच्या माध्यमातून समुद्रातून येणारा माल त्यांच्या मोठ्या बंदरातून ईशान्य भारतात आणता येईल. त्यामुळे ईशान्य भारतातील अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागू शकेल. – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन |