गंगानदी कधीही कोरडी पडणार नाही ! – संशोधनाचा निष्कर्ष

हवामान पालटाचा हिमालयावर कोणताही परिणाम होत नसल्याचाही निर्वाळा

नवी देहली – भारतातील कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असणारी गंगानदी कधीही कोरडी पडणार नाही, असे एका संशोधनातून समोर आले आहे. ‘कॅटो इन्स्टिट्यूट’चे संशोधक स्वामीनाथन् एस्. अय्यर आणि ग्लेशियोलॉजिस्ट विजय रैना यांनी हे संशोधन केले आहे. यापूर्वी ‘इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमेट चेंज’च्या अभ्यासानुसार ‘हवामान पालटामुळे वर्ष २०३५ मध्ये हिमालयातील बर्फ वितळल्याने गंगानदी कोरडी पडेल’, असे म्हटले गेले होते. त्याला आताचे संशोधन छेद देत आहे.

(चित्रावर क्लिक करा)

हिमालयातील बर्फ वितलण्याची प्रक्रिया सहस्रो वर्षांपासून चालूच !

‘कॅटो इन्स्टिट्यूट’च्या संशोधकांचे म्हणणे आहे की, हवामान पालटामुळे हिमालयातील बर्फ वितळणार नाही. मुळात बर्फ वितळण्याची प्रक्रिया हिमयुगाच्या समाप्तीनंतर, म्हणजे गेल्या ११ सहस्र ७०० वर्षांपासून चालूच आहे.

गंगानदीमध्ये वितळणार्‍या बर्फाच्या पाण्याचे प्रमाणा केवळ १ टक्के !

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् ‘इस्रो’च्या उपग्रहाद्वारे करण्यात आलेल्या ताज्या अभ्यासानुसार, वर्ष २००२ ते २०११ या काळात हिमालयातील बहुतेक पर्वतांवरील बर्फ स्थिर आहे. काही पर्वत आकुंचन पावले आहेत. गंगानदीचे स्रोत असणार्‍या गंगोत्रीमधील बर्फाचे डोंगर पुढील ३ सहस्र वर्षे रहाणार आहेत; कारण येथे प्रतिवर्ष बर्फ पडतच असतो. हा बर्फ वसंत ऋतूमध्ये वितळण्यास चालू होतो आणि उन्हाळ्यापर्यंत तो गंगानदीमध्ये पोचतो. अशा बर्फाच्या पाण्याचे गंगानदीतील प्रमाण केवळ १ टक्के इतकेच आहे. आतापर्यंत ‘गंगानदीमध्ये हिमालयातील बर्फांतून पाणी येते’, असे म्हटले जात होते; मात्र प्रत्यक्षात तसे नसल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. पावसाचे पाणी आणि हिमपात यांमुळेही नद्यांमध्ये पाणी येत असते. हवामान पालटामुळे उष्णता वाढत आहे. यामुळे समुद्रातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीकरण होत आहे. यासह त्यामुळे पाऊसही चांगला पडतो आणि नद्यांमध्ये पाणी येते.