उन्नाव (उत्तरप्रदेश) येथे मंदिरांजवळ अहिंदूंना दुकाने लावण्याची अनुमती देऊ नये ! – हिंदु जागरण मंचची मागणी

या मागणीला धार्मिक रंग देत बसण्यापेक्षा ‘अशी मागणी करण्याची वेळ हिंदूंवर का येते ?’, याचा विचार करणे आवश्यक !

दुर्गा मंदिराजवळ अहिंदूंना दुकाने लावण्यास प्रतिबंध असल्याची सूचना

उन्नाव (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील सर्व मंदिरांच्या २०० मीटर अंतरापर्यंत अहिंदूंना दुकाने लावण्याची अनुमती देण्यात येऊ नये, अशी मागणी येथील हिंदु जागरण मंचच्या जिल्हा शाखेने प्रशासनाकडे केली आहे. यासमवेतच या क्षेत्रामध्ये मद्याची दुकाने हटवण्याची मागणीही एका निवेदनाद्वारे करण्यात आली. शहरातील दुर्गा मंदिराजवळ असलेल्या एका भिंतीवर अहिंदूंना दुकाने लावण्यास प्रतिबंध असल्याची सूचनाही मंचाकडून रंगवण्यात आली आहे.

हिंदु जागरण मंचचे प्रांतीय प्रभारी विमल द्विवेदी यांनी सांगितले की, २ एप्रिलपासून चालू होणार्‍या चैत्र नवरात्रात मंदिरे आणि धार्मिक आयोजन स्थळे यांच्या जवळ स्वच्छता अन् सुरक्षा यांच्या दृष्टीकोनातून आम्ही पोलीस संरक्षण वाढवण्याची मागणीही केली आहे. यामुळे लव्ह जिहादी आणि अन्य असामाजिक घटक यांच्याकडून हिंदु भाविकांना कोणताही त्रास होणार नाही.