‘सनातन प्रभात’ म्हणजे सामान्य नियतकालिक नव्हे, तर प्रतिदिन प्रकाशित होणारा अद्वितीय ग्रंथच !
हिंदु राष्ट्र स्थापनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अखंड प्रयत्नरत आणि कार्यरत असणे इतके सोपे नाही. हिंदु राष्ट्र म्हणजे थोडक्यात राष्ट्राचे सर्व स्तरांवर होणारे उत्थापन ! यात महत्त्वपूर्ण भूमिका ठरते ती लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची म्हणजेच पत्रकारितेची ! सध्या जागतिक स्तरावरील वृत्ते पाहिल्यास ‘तिसरे महायुद्ध कधीही चालू होईल’, अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत दायित्वाचे भान जोपासत प्रसिद्धीमाध्यमांनी वार्तांकन करणे अत्यावश्यक आणि कालसुसंगत ठरते. ‘ब्रेकिंग न्यूज’च्या नावाखाली अतिरंजित किंवा सनसनाटी वृत्ते देणे हे उथळ ठरते. हे देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे. आजवर अनेक प्रसिद्धीमाध्यमांनी असा आततायीपणा केला. पत्रकारितेने नीतीमूल्ये खुंटीला टांगली असल्याने असे घडते.
या सगळ्याला ‘सनातन प्रभात’ हा अपवाद आहे. ‘सनातन प्रभात’मध्ये अतिरंजितपणा कधीच नसतो. आपत्काळाच्या दृष्टीने कालसुसंगत मार्गदर्शन करणे हे सनातन प्रभातचे वैशिष्ट्य आहे. हे केवळ आणि केवळ शक्य होते, ते द्रष्टे संत आणि सनातन संस्थेचे संस्थापक असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळे ! काळाची पावले वेळीच ओळखून ते आज संपूर्ण मानवजातीला आपत्काळात तरून जाण्याच्या दृष्टीन सतर्क करत आहेत, प्रतिबंधात्मक उपाय सुचवत आहेत. यासाठी माध्यम ठरत आहे, ते ‘सनातन प्रभात’ ! अशा प्रकारे राष्ट्रोत्थानाचे महत्कार्यच सनातन प्रभातकडून होत आहे.
‘न मे भक्तः प्रणश्यति’
(अर्थ : माझ्या भक्ताचा नाश होत नाही)
हे भगवान श्रीकृष्णाचे वचन आहे. ते अनुभवता यावे, या दृष्टीने ‘सनातन प्रभात’मध्ये साधनेविषयीही मार्गदर्शनही करण्यात येते. केवळ साधकच नव्हे, तर सर्वच हिंदू, वाचक, विज्ञापनदाते, अर्पणदाते, हिंदुत्वनिष्ठ यांच्यासाठी ‘सनातन प्रभात’ मार्गदर्शक ठरत आहे. जीवितरक्षणाच्या हेतूनेच ‘सनातन प्रभात’कडून ही दिशा घेऊन प्रतिदिन मार्गक्रमण केले जात आहे.
तिसरे महायुद्ध, उंबरठ्यावर आलेला आपत्काळ यांच्या कालावधीत समाजरक्षणाच्या कार्यात मोठी भूमिका ‘सनातन प्रभात’ समूह पार पाडील. अशा घटनांकडे ‘टी.आर्.पी.’ वाढवण्याच्या उथळ दृष्टीकोनातून न पहाता प्रगल्भ आणि कृतीशील पत्रकारितेचे दर्शन समाजाला घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत !