आसामची स्थिती काश्मीरप्रमाणे होणार नाही, हे मुसलमानांनी आम्हाला सांगावे ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

राज्यात ३५ टक्के मुसलमान असल्याने त्यांना ‘अल्पसंख्यांक’ म्हणता येणार नसल्याचेही प्रतिपादन !

हिंदूंच्या राज्यात एका राज्याच्या हिंदु मुख्यमंत्र्याला असे सांगावे लागते, हे हिंदूंना लज्जास्पद ! ही स्थिती हिंदु राष्ट्राची स्थापना करणे किती आवश्यक आहे, हेच स्पष्ट करते ! – संपादक

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – आसामच्या एकूण लोकसंख्येपैकी ३५ टक्के लोकसंख्या ही मुसलमान असल्याने त्यांना यापुढे राज्यामध्ये ‘अल्पसंख्यांक’ म्हणून गृहीत धरता येणार नाही, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी विधानसभेत केले आहे.  ‘वर्ष १९९० मध्ये काश्मीरमधील हिंदूंच्या ज्या हत्या झाल्या, त्यासाठी मुसलमान उत्तरदारयी आहेत’, असेही मुख्यमंत्री सरमा यांनी या वेळी म्हटले. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटामध्ये दाखवल्याप्रमाणे आसामची अवस्था होईल, अशी जी इतर समुदायांना भीती वाटत आहे, ती दूर करण्याचे दायित्व मुसलमानांचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा पुढे म्हणाले की,

१. जे काश्मिरी हिंदूंचे झाले, तेच आसाममधील लोकांविषयी होईल का ? असे मला अनेक जण विचारतात. १० वर्षांनंतर आसाममध्येही अशीच परिस्थिती असेल का ? जशी आता ‘द कश्मीर फाइल्स’मध्ये दाखवण्यात आली आहे ? आमची भीती घालवणे, हे मुसलमानांचे कर्तव्य आहे. मुसलमानांनी बहुसंख्यांक असल्यासारखे वागले पाहिजे आणि आम्हाला आश्‍वस्त केले पाहिजे की, येथे काश्मीरची पुनरावृत्ती होणार नाही.

२. आज मुसलमान समाजातील लोक हे विरोधी पक्षाचे नेते आहेत, आमदार आहेत. त्यांना सत्तेमध्ये समान अधिकार मिळत आहे. त्यामुळेच आदिवासी लोकांच्या अधिकारांचे संरक्षण होईल आणि त्यांच्या अधिकारांवर गदा येणार नाही, याचे दायित्व त्यांनी घेतले पाहिजे.

३. आदिवासींच्या प्रतिबंधित भूमींवर अतिक्रमण करण्याची काहीच आवश्यकता नाही. जर बोरा आणि कलिता (आसामी लोक) त्या भूमींवर स्थायिक झालेले नाहीत, तर इस्लाम आणि रहमान (मुसलमान) यांनीसुद्धा त्या भूमींवर वास्तव्य करू नये.

४. आसाममधील लोक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. आपली संस्कृती आणि रहाणीमान यावर आक्रमण होईल का, अशी भीती त्यांना वाटत आहे. औदार्य हे दुहेरी असले पाहिजे. मुसलमानही संस्कारी आणि क्षत्रिय संस्कृती यांच्या संरक्षणाविषयी बोलले, तर औदार्य टिकून राहील. १० वर्षांपूर्वी आम्ही अल्पसंख्यांक नव्हतो; पण आज आहोत.