मौजे साळगाव (जिल्हा कोल्हापूर), ३ मार्च (वार्ता.) – महाशिवरात्रीला शिवाचे तत्त्व १ सहस्र पटीने कार्यरत असते, तरी या दिवशी शिवाचा नामजप करणे, तसेच धर्माचरण करून त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ घ्या, असे आवाहन सनातन संस्थेच्या साधिका सौ. आशा साठे यांनी केले. १ मार्च या दिवशी आजरा तालुक्यातील मौजे साळगाव येथे महाशिवरात्रीनिमित्त शिव महाजलाभिषेक आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित मार्गदर्शनात त्या बोलत होत्या. या वेळी सौ. साठे यांनी शिवरात्रीचे महत्त्व, हिंदु संस्कृतीनुसार करावयाच्या धार्मिक विधी या संदर्भातही मार्गदर्शन केले. याचा लाभ ३६५ महिला आणि पुरुष यांनी घेतला.
हे प्रदर्शन आयोजित करण्यात साळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. सुभाष दोरुगडे यांचा पुढाकार होता. कार्यक्रस्थळी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनही लावण्यात आले होते.
विशेष
१. गावात झालेल्या या कार्यक्रमासाठी गावातील महिला सकाळी ८ वाजल्यापासून उपस्थित होत्या. प्रवचनाची वेळ दुपारी १.३० वाजता असूनही महिला जिज्ञासेने प्रवचन ऐकण्यासाठी थांबल्या होत्या.
२. सौ. आशा साठे यांनी मार्गदर्शनात नमस्काराच्या योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक करून दाखवल्यावर अनेक महिलांनी तात्काळ तशी कृती केली.
३. गावातील अनेक महिलांनी कार्यक्रमाची छायाचित्रे ‘व्हॉट्सॲप स्टेट्स’ ला ठेवली होती.
४. मार्गदर्शन झाल्यावर आयोजक, तसेच अनेक महिलांनी भेटून ‘मार्गदर्शनातून पुष्कळ शिकायला मिळाले’, असे सांगितले.
महाशिवरात्रीच्या निमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य घडामोडी
१. आजरा येथे लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शन कक्षास नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी यांनी सदिच्छा भेट देऊन कार्याचे कौतुक केले, तसेच ‘काही साहाय्य लागल्यास सांगा’, असे सांगितले.
२. बांबवडे (तालुका शाहूवाडी) येथील महादेव मंदिरातील ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी आलेल्या महाविद्यालयीन युवतींना हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी ‘लव्ह जिहाद’ हा विषय समजावून सांगितला.