तेलंगणातील नलगोंडा शहरवासियांच्या दिवसाचा प्रारंभ राष्ट्रगीताने होतो !

संपूर्ण शहर प्रतिदिन सकाळी ५२ सेकंदासाठी स्तब्ध होते !

राष्ट्रभक्ती वाढवण्यासाठी प्राथमिक टप्प्यावर हा उपक्रम नक्कीच चांगला आहे; मात्र त्याही पुढे जाऊन राष्ट्रविरोधी कृती होत असतांना त्या वैध मार्गाने रोखण्यासाठी नागरिकांनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे. त्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करणे आवश्यक ! – संपादक

नवी देहली – तेलंगाणा राज्यातील नलगोंडा शहरातील लोकांच्या दिवसाचा प्रारंभ देशभक्तीने होतो. तेथे प्रतिदिन सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी राष्ट्रगीताची धून वाजवली जाते आणि राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ तेथील सर्व नागरिक उभे रहातात आणि मानवंदना देतात.

१. नलगोंडा येथील ‘जन गण मन उत्सव समिती’ने हा उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेतला. २३ जानेवारी २०२१ या दिवशी म्हणजे वर्षभरापूर्वी या उपक्रमाला प्रारंभ झाला. तेव्हापासून अजतागायत हा उपक्रम अखंडपणे चालू आहे.

२. नलगोंडातील १२ प्रमुख ठिकाणी ध्वनीक्षेपकावर सकाळी ठीक ८ वाजून ३० मिनिटांनी राष्ट्रगीताची धून वाजवली जाते. तेव्हा शहरातील प्रत्येक जण ५२ सेकंदांसाठी राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे रहातात. शहरातील लोकांना ही गोष्ट अंगवळणी पडली आहे.

३. ही कल्पना ‘जन गण मन उत्सव समिती’चे अध्यक्ष कर्णती विजय कुमार आणि त्यांचे मित्र यांची आहे. ‘प्रत्येक शहरात असा उपक्रम राबवण्यात आला, तर लोकांच्या मनातील राष्ट्रभक्तीला प्रोत्साहन मिळेल. हळूहळू हा उपक्रम नलगोंडाच्या आजूबाजूच्या गावांमध्येही राबवण्यात येणार आहे’, असे या समितीच्या सदस्यांचे म्हणणे आहे.