फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकाने केलेले प्रयत्न
वाचकांनो, आपले वाहन सर्व्हिसिंगसाठी देतांना वाढीव अंदाजपत्रक अथवा अनावश्यक देखभाल-दुरुस्तीची भिती दाखवून लूट होत नाही ना, याची काळजी घ्या !
१. वाहनाची तपासणी आणि दुरुस्ती विनामूल्य करायची असतांना ग्राहकांना घाबरवून अधिकची कामे काढणे
‘७ सप्टेंबर २०२१ या दिवशी चारचाकी वाहनाच्या नियमित ‘सर्व्हिसिंग’ साठी (देखभाल आणि दुरुस्ती) मी आस्थापनाच्या एका केंद्रावर गेलो होतो. तेथे गेल्यावर मला आधी सर्व्हिसिंगचे १ सहस्र ७०० रुपयांचे अंदाजे देयक देण्यात आले. देयक सिद्ध करण्यापूर्वी तेथील कर्मचार्याने मला पुष्कळ घाबरवण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, ‘‘तुम्ही आता लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी जाणार आहात. तेव्हा तुमच्या वाहनाच्या चाकांचा असमतोल (इकडे तिकडे) होऊ शकतो. त्यामुळे आपण या सर्व्हिसिंगला चाकांचा समतोल (बॅलन्स) करून घेऊया. हा बघा या पुस्तकात हा नियम आहे. सर्वजण हे करून घेतात.’’
२. विनामूल्य तपासणी आणि दुरुस्ती असूनही १ सहस्र ७०० रुपयांचे अतिरिक्त देयक बनवणे
मला काही सुचेना; म्हणून मी लगेच ‘हो’ म्हटले. नंतर त्याने, ‘गाडीच्या काचांचे ‘स्क्रीन वॉशिंग’ (काचा स्वच्छ) करणे आवश्यक आहे’, असे सांगून त्याचेही पैसे लावले. याशिवाय कोरोना काळात गाडीचे निर्जंतुकीकरण (हायजिनिंग) करायचे असते; म्हणून त्याचेही वेगळे पैसे लावले. माझी गाडी विकत घेतल्यानंतरचे हे दुसरे सर्व्हिसिंग होते आणि ते विनामूल्य होते, तरीही त्याने १ सहस्र ७०० रुपयांचे देयक बनवले.
३. कर्मचार्याच्या वागण्यावर शंका येऊन जाणकारांचे मत विचारल्यानंतर त्यांनी अतिरिक्त कामांची आवश्यकता नसल्याचे सांगणे
त्या व्यक्तीच्या वागण्यावर मला शंका आली; म्हणून मी ज्यांच्याकडून गाडी खरेदी केली होती, त्यांना याविषयी सांगितले. ते म्हणाले की, ‘तुम्हाला चाकांचा समतोल (व्हील बॅलन्स) करण्याची आवश्यकता नाही; कारण तुमची गाडी केवळ १ सहस्र किलोमीटरच चालली आहे.’ नंतर मी या विषयातील जाणकार असलेल्या सहकार्याला संपर्क केला. त्यानेही सांगितले की, ‘‘व्हील बॅलन्स’ची आवश्यकता नाही, तसेच ‘स्क्रीन वॉश’चीही आवश्यकता नाही. तसेच गाडीचे निर्जंतुकीकरण (हायजिनिंग) करण्याचाही नियम नाही. तुम्ही त्यांना देयक रहित करून द्यायला सांगा.’
४. जाणकारांनी सांगूनही देयक अल्प न केल्याने पुढे तक्रार करण्याची चेतावणी दिल्यानंतर व्यवस्थापकाने देयक रहित करणे
आस्थापनाच्या कर्मचार्याला शून्य देयक करून देण्यास सांगितले. तेव्हाही त्याने मला पुष्कळ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मी त्याला थेट ‘तक्रार करीन’, अशी चेतावणी दिली. त्यानंतर त्याने निमूटपणे देयक न्यून केले. त्यातही त्यांनी ‘स्क्रीन वॉश’चे ७२ रुपये, निर्जंतुकीकरणाचे १७५ रुपये आणि ‘जीएस्टी’ (वस्तू आणि सेवा कर) मिळून ३०० रुपयांचे देयक आकारलेच. त्यामुळे मी त्याला परत विरोध केला. त्यानंतर त्याने ७२ रुपये वजा केले; परंतु निर्जंतुकीकरणाचे पैसे तसेच ठेवले. त्यामुळे मी त्यांच्या व्यवस्थापकांना भेटलो. व्यवस्थापक म्हणाले, ‘‘ही पहा इतरांची बिले ! आम्ही त्यांच्या वाहनांचेही निर्जंतुकीकरण करण्याचे पैसे घेतलेले आहेत.’’ ते ऐकत नसल्याचे पाहून मी त्यांच्यासमोरच या विषयातील जाणकार असलेल्या माझ्या सहकार्याला परत दूरभाष केला. तो त्या व्यवस्थापकांशी बोलला. त्यानंतर त्यांनी निर्जतुकीकरणाचे पैसेही वजा करून माझे देयक पूर्णत: शून्य केले.
५. जाणकारांना विचारून अभ्यास केल्यास फसवणूक टळणे शक्य असल्याचे साधकाला प्रसंगातून शिकायला मिळणे
या प्रसंगातून वाहनाचे ‘सर्व्हिसिंग’ करतांना सामान्य जनांची कशा प्रकारे फसवणूक केली जाते, हे शिकायला मिळाले. त्यामुळे गाडी ‘सर्व्हिसिंग’ला देण्यापूर्वी अभ्यास करावा. तसेच ‘एस्टिमेट’ (अंदाजे खर्च) बनवत असतांनाच या विषयातील जाणकार व्यक्तीशी चर्चा करावी. त्यामुळे आपली पुढे होणारी फसवणूक टळू शकते.
परात्पर गुरुदेवांच्या कृपेने मला शिकायला मिळाले आणि फसवणूक टळली. त्याविषयी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– डॉ. उदय धुरी, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती. (सानपाडा, नवी मुंबई)
अतिरिक्त साहित्य देयकात दाखवून, तसेच अतिरिक्त स्वच्छता करून आर्थिक फसवणूक करणारे सर्व्हिसिंग सेंटर चालक !
१. सर्व्हिसिंग सेंटरमध्ये गाडी देखभाल-दुरुस्तीसाठी देतांना १० सहस्र रुपयांचे काम अतिरिक्त सांगितल्याचे लक्षात येणे
‘१२ ऑगस्ट २०२१ या दिवशी मी माझ्या काकांची चारचाकी गाडी नियमित सर्व्हिसिंग (देखभाल आणि दुरुस्ती) करण्यासाठी यजमानांसमवेत एका सर्व्हिसिंग सेंटरमध्ये गेले होते. तेथील कर्मचार्याने आम्हाला देखभाल दुरुस्तीचा अंदाजे खर्च सांगितला. एवढा व्यय खरेच आवश्यक आहे का, हे माझ्या यजमानांनी पाहिले. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की, अनुमाने १० सहस्र रुपयांचे काम अधिक सांगण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही त्या सर्व कामांपैकी केवळ ४ सहस्र ५०० रुपयांचे काम करण्यास मान्यता दिली.
२. अधिकच्या साहित्याचे पैसे आकारणे, तसेच आवश्यक तेवढेच काम करण्याची विनंती करूनही अतिरिक्त स्वच्छता करून देयक वाढवणे
घरी परत येतांना आम्ही मागील वेळी केलेल्या देखभाल आणि दुरुस्तीचा सर्व तपशील तपासला. तेव्हा आमच्या लक्षात आले की, यापूर्वीच्या (सप्टेंबर २०२० मध्ये) देखभाल आणि दुरुस्तीसाठीही अधिकचे पैसे आकारण्यात आले होते. त्यांनी गाडीमध्ये एक ‘ड्रेन प्लग’ अपेक्षित असतांना २ ‘ड्रेन प्लग’चे आणि एका ‘वायपर वॉशर’ ऐवजी ६ चे देयक आकारले होते. अन्य स्वच्छता करणे अपेक्षित नसतांना त्या करून त्यांचेही पैसे लावले होते. सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे हे सर्व करतांना ग्राहकाची कोणतीही संमती घेतली नव्हती. याविषयी माझ्या काकांशी चर्चा केली, तेव्हा असे लक्षात आले की, त्यांनी ‘सर्व्हिसिंग’ करतांना ‘गाडीचे आवश्यक तेवढेच काम करावे, अधिकचे काम करू नये’, अशी विनंती केली होती.
३. आस्थापनांच्या वरिष्ठांकडे ‘इ-मेल’ने तक्रार केल्यानंतर सर्व्हिसिंग सेंटरच्या कर्मचार्यांनी आढेवेढे घेऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे
मी त्वरित आस्थापनाच्या वरिष्ठांकडे ‘ई-मेल’ने तक्रार नोंदवली. या तक्रारीमध्ये सर्व माहिती तपशीलवार पाठवली. त्यानंतर दुसर्याच दिवशी आम्हाला सर्व्हिसिंग सेंटरमधून दूरभाष आला. त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला सर्व्हिसिंग सेंटरमध्ये भेटायला बोलावले होते. सर्व्हिसिंग सेंटरमध्ये गेल्यावर आम्ही तेथील कर्मचार्याला जुने देयक दाखवले आणि त्याविषयी खडसावले. तेव्हा त्याने पुष्कळ आढेवेढे घेऊन आम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला आणि ‘पैसे परत देण्याविषयी विचार करू’, असे सांगितले.
४. कर्मचार्याला त्याचे म्हणणे ‘इ-मेल’च्या माध्यमातून कळवण्यास सांगितल्यावर त्याने लगेच १४ सहस्रांपैकी ६ सहस्र ३०० रुपये परत करणे
त्याला आम्ही गाडी देखभाल दुरुस्तीसाठी देतांना सांगितलेल्या कामांचा तपशील दाखवण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला की, ‘आज सुटी आहे. त्यामुळे तुम्ही उद्या या.’ त्यावर मी त्याला म्हणाले की, ‘हे उत्तर तुम्ही आम्हाला ई-मेलच्या माध्यमातून पाठवा, तरच आम्ही येथून जाऊ.’ त्यांनी लगेच देयक बनवून १४ सहस्रांपैकी ६ सहस्र ३०० रुपये परत केले. या प्रसंगातून गाडी ‘सर्व्हिसिंग’ करतांना आपली फसवणूक कशी होऊ शकते ? हे ईश्वरी कृपेने शिकायला मिळाले.
– सौ. शिवानी परब, बोरिवली, मुंबई (२०.९.२०२१)
साधकांना सूचना आणि वाचकांना आवाहन !‘वाहन सर्व्हिसिंग सेंटर’च्या अरेरावी संदर्भात काही अनुभव आले असल्यास अथवा तुम्ही त्यासंदर्भात काही कार्यवाही केली असल्यास ते अनुभव पुढील पत्त्यावर कळवा. जनप्रबोधनासाठी आपल्या अनुभवांचा आम्हाला लाभ होईल. अधिवक्ता नीलेश सांगोलकर, संपर्क क्रमांक : ९५९५९८४८४४ इ-मेल पत्ता : [email protected] पत्ता : ‘सुराज्य अभियान’, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा ४०१४०३. |