फटाके वाजवल्यामुळे होणारे आध्यात्मिक स्तरावरील दुष्परिणाम जाणा !

‘भजन, आरती किंवा सात्त्विक नाद यांमुळे चांगल्या शक्ती किंवा देवता येतात, तर फटाके आणि तामसिक आधुनिक संगीत यांमुळे वाईट शक्ती आकर्षिल्या जातात. वाईट शक्तींमधील तमोगुणाचा परिणाम मानवावर होतो आणि त्याची वृत्तीही तामसिक होते.

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

१. फटाक्यांच्या आवाजाने वाईट शक्ती जागृत होणे

फटाके उडतांना होणार्‍या मोठ्या आणि कर्णकर्कश नादामुळे वातावरणातील वाईट शक्ती जागृत होतात आणि त्याच पुढे मानवाच्या नाशासाठी कारणीभूत होतात.

२. वाईट शक्तींनी आक्रमण करणे

ज्याच्याकडून फटाके उडवले जातात, त्याच्यावरच प्रथम त्या आक्रमण करतात, म्हणजेच त्या व्यक्तीला या जागृत झालेल्या वाईट शक्तींचा त्रास होऊ शकतो.

३. फटाक्यांच्या धुरातील काळी शक्ती घेण्यासाठी आधीच तेथे वाईट शक्ती उपस्थित रहाणे

फटाक्यांच्या त्रासदायक धुरातून काळी शक्ती मोठ्या प्रमाणावर सर्वत्र पसरत असल्याने ही काळी शक्ती घेण्यासाठी त्या ठिकाणी वाईट शक्ती आधीच सूक्ष्मातून उपस्थित रहातात. यामुळे घराच्या परिसरातील स्पंदनेही त्रासदायक होतात.

४. व्यक्ती दुर्धर आजाराला बळी पडणे

कालांतराने अनेक वर्षे एखाद्या परिसरात फटाके उडत असतील, तर तेथील व्यक्ती वाईट शक्तींच्या त्रासाने पीडित होतात आणि कालांतराने दुर्धर आजारांना बळी पडतात.

५. फटाक्यांच्या विषारी धुरामुळे एखाद्या स्थानातील देव-देवतांना अथवा तपःश्चर्या करणार्‍या पुण्यात्म्यांना तेथून निघून जाणे भाग पडणे आणि त्यामुळे फटाके उडवणार्‍या व्यक्तीला याचे पाप लागणे

फटाक्यांच्या आवाजामुळे, तसेच त्यातून निघणार्‍या विषारी धुरामुळे एखाद्या स्थानात देव-देवतांचे वास्तव्य असेल, तर त्यांना तेथून निघून जाणे भाग पडते. त्यामुळे या देव-देवतांचा शापही फटाके उडवणार्‍यांना लागतो. कधी कधी अनेक पुण्यात्मे एखाद्या क्षेत्री सूक्ष्मातून तपःश्चर्या करत असतात. फटाके उडवल्यामुळे वातावणातील चैतन्य कमी होऊन त्यांच्या तपःसाधनेत व्यत्यय येतो. तेही त्या व्यक्तीला शाप देऊन दुसरे स्थान शोधण्यासाठी तेथून निघून जातात. दीपावलीसारख्या महत्त्वाच्या सणांच्या दिवशी किंवा कोणत्याही सभा-समारंभात फटाके न उडवणेच अधिक इष्ट आहे.’

– श्रीचित्‌‌शक्ति सौ. अंजली मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (वर्ष २०११)

उत्सवकाळात शास्त्रविसंगत फटाक्यांची आतषबाजी करणे, हा राष्ट्र आणि धर्म द्रोह !

दीपावली साजरी करतांना मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. देश आर्थिक संकटात असतांना आणि आतंकवादाच्या सावटाखाली दीपावली साजरी करण्याची लाजिरवाणी स्थिती आली असतांना शास्त्रविसंगत फटाक्यांची आतषबाजी करणे, हा राष्ट्र आणि धर्म द्रोह आहे !

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.