मूर्तीदान नको, विसर्जनच योग्य !

महाराष्ट्रात प्रतिवर्षी काही हिंदुद्वेषी संघटना श्री गणेशमूर्ती दान चळवळ राबवतात. ‘पाण्याची टंचाई, दुष्काळ आणि जलप्रदूषण अशी कारणे देत श्री गणेशमूर्ती दान करा’, असे या संघटनांकडून सांगितले जाते. धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन केल्याने पूजकास आध्यात्मिक स्तरावर अधिक लाभ होणे शक्य आहे. गणपतीच्या मूर्तीचे दान अशास्त्रीय असल्याची कारणे आणि अन्य माहिती पाहूया.

उत्तरपूजेनंतर मूर्तीचे विसर्जन करतात. विसर्जनाला जातांना गणपतीसमवेत दही, पोहे, नारळ, मोदक इत्यादी शिदोरी द्यावी. जलाशयाजवळ पुन्हा आरती करावी आणि मूर्ती शिदोरीसह पाण्यात सोडून द्यावी. जेथे विसर्जन केले, तेथील माती घरी आणून ती सर्वत्र शिंपडण्याची प्रथा आहे.

गणपतीच्या मूर्तीचे दान अशास्त्रीय असल्याची कारणे

  • भाद्रपद मासातील श्री गणेशचतुर्थीस प्राणप्रतिष्ठापना केलेल्या मूर्तीचे विसर्जन करावे, असा शास्त्रोक्त विधीच आहे.
  • देवतांचे दान घेणे किंवा देणे हा देवतांचा अपमान आहे. देवतांचे दान घेण्याचे किंवा देण्याचे सामर्थ्य मनुष्यात नाही.
  • मूर्ती म्हणजे एखादे खेळणे किंवा शोभिवंत वस्तू नव्हे की, जिचा उपयोग संपला; म्हणून ती दुसर्‍याला दान म्हणून दिली.
  • मूर्तीदान केल्यानंतर तिचे यथासांग विसर्जन होईल, याची शाश्‍वती नसते.
  • दान केलेल्या मूर्ती संबंधित कार्यकर्ते तेथेच टाकून जातात अथवा दगडाच्या खाणीत टाकतात. भाविकांच्या श्रद्धास्थानाची ते अशी ‘विल्हेवाट’ लावतात ! मग धर्मप्रेमींनी असा धर्मद्रोह का होऊ द्यायचा ?