ओवैसी यांना अफगाणिस्तानात पाठवून द्यायला हवे ! – केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांचे प्रत्युत्तर

(म्हणे) ‘भारतात महिलांवरील अत्याचारांत वाढ झाली आहे; परंतु सरकार अफगाणिस्तानमधील महिलांविषयी चिंता करत आहे !’ – असदुद्दीन ओवैसी

ओवैसी यांना भारतीय महिलांच्या दु:स्थितीविषयी एवढीच चिंता आहे, तर त्यांनी आतापर्यंत ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात आवाज का उठवला नाही ? त्यांच्या बांधवांनी रचलेल्या षड्यंत्रावर आळा घालण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत ? याची उत्तरे ओवैसी देतील का ? – संपादक

डावीकडून केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे आणि खासदार असदुद्दीन ओवैसी

नवी देहली – अफगाणिस्तानवरील तालिबानच्या नियंत्रणानंतर तेथील महिलांवरील अत्याचारांविषयी संपूर्ण जग चिंतेत आहे; परंतु ‘एम्आयएम्’चे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ‘भारत सरकारने तालिबान सरकारमधील अफगाणी लोकांना साहाय्य करण्यापेक्षा भारतातील महिलांना साहाय्य केले पाहिजे’, असे विधान केले. यावर केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी ‘मुसलमान महिला आणि समुदाय यांच्या सुरक्षेसाठी असदुद्दीन ओवैसी यांना अफगाणिस्तानला पाठवून द्यायला हवे’, असे प्रत्युत्तर दिले आहे.

ओवैसी म्हणाले, ‘‘एका माहितीनुसर भारतात ९ पैकी एका मुलीचा ती ५ वर्षांची असतांना मृत्यू होतो. भारतात महिलांवरील अत्याचारांत वाढ झाली आहे; परंतु ते (केंद्रशासन) अफगाणिस्तानमधील महिलांविषयी चिंता करत आहेत. अफगाणिस्तान तालिबानच्या पूर्ण नियंत्रणात आहे. तालिबान्यांशी चर्चा केली पाहिजे, असे सर्व आंतरराष्ट्रीय सुरक्षा तज्ञांना वाटते; परंतु आपल्याकडून त्यांंच्याशी कोणताही संवाद साधला जात नाही.’’