१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य आणि लिखाण करण्याऐवजी आध्यात्मिक ग्रंथलिखाणाला प्राधान्य देण्याचे कारण
‘वयामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी शारीरिक स्तरावर कार्य करणे मला अशक्य आहे. मी केवळ लिखाण करू शकतो, तसेच कालमाहात्म्यानुसार जी सेवा जेव्हा करणे आवश्यक असते, तेव्हा मी ती करतो. आता हिंदु राष्ट्राची स्थापना काही वर्षांतच होणार असल्याने त्यासाठी मी काही करण्याची आवश्यकता नाही. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे बीज मी १० – १५ वर्षांपूर्वीच साधकांच्या मनात रोवल्याने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करण्यासाठी साधक आणि संत सिद्ध झाले आहेत. हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावर सर्व मानवजातीला साधना करून प्रगती करण्यासाठी आवश्यक असणार आहे, ते म्हणजे आधुनिक वैज्ञानिक भाषेतील अध्यात्मविषयक ग्रंथ. फेब्रुवारी २०२० पर्यंत सनातनच्या ३२३ ग्रंथांच्या मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्ल्याळम्, बंगाली, ओडिया, आसामी आणि गुरुमुखी या ११ भारतीय आणि इंग्रजी, सर्बियन, जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच अन् नेपाळी या ६ विदेशी भाषांत, म्हणजे एकूण १७ भाषांत ७९ लाख २६ सहस्र ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.
मी ग्रंथलिखाणाचे कार्य करण्याचे आणखी एक कारण याप्रमाणे आहे – हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य स्थुलातील आणि तात्कालिक आहे, तर संतांच्या आणि नाडीपट्ट्यांच्या सांगण्यावरून हिंदु धर्माचे पुनर्स्थापन झाल्यावर हिंदु धर्म मानवाला सहस्रो वर्षे मार्गदर्शन करणार आहे. यासाठी ग्रंथ-लिखाण महत्त्वाचे आहे; म्हणून मी ते कार्य करत आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी इतर कार्यांपेक्षा ग्रंथकार्य करण्यास अधिक प्राधान्य देण्याला ईश्वरी ज्ञानाच्या माध्यमातून दुजोरा मिळणे : ‘माझ्याकडून अन्य कार्यांपेक्षा ग्रंथकार्याला अधिक प्राधान्य देण्यात येत असलेले योग्य आहे’, याची जणू पोचपावतीच ईश्वराने साधकांना मिळणार्या ईश्वरी ज्ञानाच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे दिली.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेली सनातनची ग्रंथसंपदा इतकी विपुल आहे की, परात्पर गुरु डॉ. आठवले यांना या एका जन्मात सर्व ग्रंथांचे लिखाण पूर्ण करणे अशक्य आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले पुढील जन्मी उर्वरित ग्रंथांचे लिखाण पूर्ण करणार आहेत.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१२.२०१८, रात्री ११.५०)’