गुरुपौर्णिमा २०२१ च्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात सप्तर्षींच्या आज्ञेने बनवण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्राचे पूजन पहातांना साधिकेला जाणवलेली सूत्रे

‘सप्तर्षींनी श्रीकृष्ण आणि श्रीराम यांची चित्रे अन् सनातनचे तीन गुरु, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची छायाचित्रे घेऊन एक वैशिष्ट्यपूर्ण चित्र बनवण्यास सांगितले होते. (हे चित्र पृष्ठ १ वर प्रसिद्ध केले आहे.) गुरुपौर्णिमेच्या म्हणजे २३.७.२०२१ या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते त्या चित्राचे पूजन करण्यात आले. गुरुपौर्णिमेचा हा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम मी डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथून पाहिला. त्यात वैशिष्ट्यपूर्ण चित्राचे पूजन होत असतांना मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. ‘ज्ञानामुळे अधर्माचा अंधार दूर होऊन धर्मकार्य आपोआपच होऊ लागते. सूर्य उगवला की, त्याला अंधार नष्ट करावा लागत नाही. अंधार आपोआप नष्ट होतो’, असे पूजनासाठी ठेवलेल्या चित्रातून जाणवते.

२. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य निर्गुण स्तरावर ९० टक्के आणि सगुण स्तरावर १० टक्के चालू आहे’, असे जाणवणे :

‘ज्ञानशक्तीचे कार्य निर्गुण स्तरावर असल्याने सगुणाची धारणा न्यून होत आहे’, असे जाणवले. ज्ञानाचे कार्य निर्गुण स्तरावर होऊन अंशावतारी जीव जेव्हा ईश्वराच्या सर्वज्ञतेकडे मार्गक्रमण करू लागतो, तेव्हा अव्यक्त शक्ती सर्वशक्तीमानतेचे कार्य करते. या चित्राकडे पाहून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य निर्गुण स्तरावर ९० टक्के आणि सगुण स्तरावर १० टक्के चालू आहे’, असे मला जाणवले. जेव्हा देहाची जड धारणा नष्ट होते, तेव्हा त्रिगुणांचे कार्य संपून जिवाच्या दैवी कार्याच्या प्रगटीकरणाची अंशात्मक धारणा समष्टी स्तरावर कार्यरत होते. याला ‘देहाची दैवी धारणा’ असे म्हणतात.

३. ‘श्रीकृष्ण आणि श्रीराम तत्त्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून अनुक्रमे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडे अधिक प्रमाणात आकृष्ट होत आहे’, असे जाणवणे :

श्रीकृष्णाच्या चित्राच्या खाली श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे आणि श्रीरामाच्या चित्राच्या खाली श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे छायाचित्र घेण्यात आले आहे. ‘त्या दोघी बसलेल्या स्थितीत असून हात जोडून गुरुदेवांकडे पहात आहेत’, असे त्या चित्रात दाखवले आहे, म्हणजेच ‘श्रीकृष्ण आणि श्रीराम तत्त्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून अनुक्रमे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडे अधिक प्रमाणात आकृष्ट होत आहे’, असे मला जाणवले.

अशा दैवी विभूतींच्या चरणी आमचा शतशः प्रणाम !’

– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२७.७.२०२१)