प.पू. दास महाराज यांनी प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण केलेली भावपुष्पांजली !

प.पू. दास महाराज

‘भारतभूमीवर अनेक गुरु-शिष्य होऊन गेले, आताही आहेत आणि यापुढेही होतील; परंतु प.पू. भक्तराज महाराज यांच्या शिकवणीनुसार आणि त्यांच्या संकल्पानुसार राष्ट्र अन् धर्म यांच्या उद्धाराचा संकल्प करणारे, गुरुकार्याची महती सर्वत्र पसरवणारे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा (रामराज्याच्या स्थापनेचा) संकल्प करून हिंदु राष्ट्राचा ध्वज फडकवणारे त्यांचे परमशिष्य (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले, हे एकमेवाद्वितीय ‘जनक’ आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरूंचा संकल्प पूर्ण करण्यासाठीच आपले सर्वस्व गुरुचरणी समर्पण केले आहे. मानसोपचारतज्ञ असून आणि विदेशात राहूनही त्यांनी सर्वस्वाचा त्याग करून गुरुकार्यासाठी स्वत:ला संपूर्णपणे वाहून घेतले. काही जण भोगभूमीत जाऊन प्रपंच करून मग परमार्थ करत आहेत; मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सर्वस्वाचा त्याग केला आहे. त्यांचा अवतारच या भूमीवर रामराज्य स्थापनेसाठीच (हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी) झाला आहे.

या भारतभूमीवरील ताम्रपटावर परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे नाव ‘हिंदु राष्ट्राचे जनक’ म्हणून सुवर्णाक्षरात झळकणार आहे.’

आपला चरणसेवक दास,

प.पू. दास महाराज, पानवळ-बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग. (५.७.२०२१)