दळणवळण बंदीत बंद असलेल्या सिरसा (हरियाणा) येथील ‘राईस मिल’ला वीज वितरण विभागाने पाठवले तब्बल ९० कोटी रुपयांचे वीजदेयक !

यावरून वीज वितरण विभागाचा कारभार कसा चालत असेल, याची कल्पना येऊ शकते ! सदोष देयके पाठवून ग्राहकांना मनःस्ताप देणार्‍या अधिकार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

सिरसा (हरियाणा) – दळणवळण बंदीत बंद असलेल्या येथील कलांवली परिसरातील ‘गणेश राईस मिल’ला वीज वितरण विभागाने तब्बल ९० कोटी रुपयांचे वीजदेयक पाठवले आहे. हा प्रकार तांत्रिक बिघाडामुळे झाल्याची स्वीकृती नंतर वीज वितरण विभागाने दिली.

हे देयक पाहून ‘गणेश राईस मिल’च्या संचालकांची झोपच उडाली. एरव्ही त्यांना या ‘मिल’चे देयक हे ५ ते ६ लाख रुपयांपर्यंत येते. या देयकाच्या संदर्भात झालेला गोंधळ लवकरात लवकर सोडवून नवीन देयक पाठवण्यात येईल, असे आश्‍वासन उप विभागीय अधिकारी रवि कुमार यांनी दिले.