ज्या ठिकाणी हिंदू रहातात त्या ठिकाणी गोमांस वर्ज्य केले जावे ! – आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा

आसाममध्ये आगामी अधिवेशनात ‘गो संरक्षण विधेयक’ सादर केले जाण्याची शक्यता !

असे प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगण्यापेक्षा आणि त्या संदर्भात कायदे करत रहाण्यापेक्षा केंद्रातील सरकारनेच देशभरासाठी कायदा करावा, असेच हिंदूंना वाटते !

गौहत्ती (आसाम) – गाय आपली माता आहे. हिंदू गायींची पूजा करतात. बंगालमधून आम्ही गायींची तस्करी होऊ देणार नाही. ज्या ठिकाणी हिंदू रहातात त्या ठिकाणी गोमांस वर्ज्य केले जावे. लक्ष्मणपुरीच्या (लखनौच्या) दारुल उलूमनेही असेच वक्तव्य केल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी प्रस्तावित ‘गो संरक्षण विधेयका’वर केले आहे. राज्यात गायींच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले. आसाममध्ये आगामी अधिवेशनात ‘गो संरक्षण विधेयक’ सादर केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या विधेयकामुळे ‘मॉब लिचिंग’सारख्या (जमावाकडून हत्या होण्यासारख्या) घटनांना आणखीन प्रोत्साहन मिळेल. उत्तर भारतात याआधीही अशा अनेक घटना घडल्याचे देशाने पाहिल्या आहेत, अशी भीती विधानसभेत राज्यपालांच्या भाषणानंतरच्या चर्चेच्या वेळी विरोधी पक्ष ‘एआयइयूडीएफ्‘ने म्हटले होते. तसेच ‘भाजपने असेच विधेयक गोवा, मिझोरम आणि मेघालय यांसारख्या राज्यांत आणून दाखवावे’, असेही आव्हान  विरोधी पक्षांनी भाजपला दिले आहे.