आसाममध्ये भाजपकडून अल्पसंख्यांक मोर्चाच्या सर्व शाखा विसर्जित !

आसाममध्ये मुसलमानबहुल भागात निवडणुकीत यश न मिळाल्याने घेतला निर्णय !

  • हा आसाममधील भाजपचा स्तुत्य निर्णय म्हणावा लागेल. राष्ट्रहित आणि हिंदुहित जोपासणार्‍या भाजपला अल्पसंख्य समाज पाण्यात पहातो. त्यामुळे तो कधीही भाजपला मत देणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे !
  • भाजपने अल्पसंख्यांकांची मते मिळण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अधिकाधिक राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंची मते कशी मिळतील, यासाठी प्रयत्न करावेत, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

नवी देहली – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आसाममध्ये भाजपाला बहुमत मिळाले असले, तरी मुसलमानबहुल ८ मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात भाजपाला विजय मिळू शकला नाही. त्यामुळे भाजपाच्या राज्य कार्यकारिणीने राज्यातील अल्पसंख्याक मोर्चाच्या सर्व शाखा विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे.

१. भाजपचे आसाममधील प्रदेशाध्यक्ष रंजित दास यांनी सांगितले की, भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या राज्य, जिल्हा आणि मंडळ स्तरावरील सर्व शाखा तात्काळ विसर्जित करण्यात येत आहेत. आमच्या पक्षाच्या महिला, युवा आणि इतर विविध कार्यकारणी आहेत. तसाच अल्पसंख्यांक मोर्चाही आहे. आम्ही अल्पसंख्यांकांचे प्राबल्य असलेल्या काही मतदारसंघात उमेदवार दिले होते; मात्र या मतदारसंघांमधील अनेक बुथवर आमच्या उमेदवारांना २० मतेही मिळाली नाहीत, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.

२. भाजप राज्य अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रमुख मुख्तार हुसेन खान यांनी या निर्णयामागचे नेमके कारण काय आहे ठाऊक नाही, असे सांगितले. पक्षाला अनेक ठिकाणी अपेक्षेएवढी मते मिळाली नाहीत, असेही ते म्हणाले.