प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्याकडून पू. भिडेगुरुजी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गोव्यातील हिंदुत्वविषयक घडामोडींवर चर्चा

प्रा. सुभाष वेलिंगकर

डिचोली, १९ एप्रिल (वार्ता.) – ‘भारत माता की जय’ या संघटनेचे राज्य संघचालक आणि भारतीय भाषा सुरक्षा मंचचे राज्यनिमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी महासभेच्या निमित्ताने पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांची डिचोली येथे भेट घेतली. या भेटीत त्यांनी पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांच्याशी गोव्यातील हिंदुत्वविषयक घडामोडींवर सविस्तर चर्चा केली. प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी पुढील महत्त्वाची सूत्रे या वेळी मांडली.

१. श्रीरामसेनेवर बंदी, तर पी.एफ्.आय.ला मोकळीक !

गोव्यात भाजपचे सरकार असूनही हिंदुत्वनिष्ठ संघटना श्रीरामसेना आणि श्रीरामसेनेचे प्रमुख श्री. प्रमोद मुतालिक यांच्यावर गोव्यात प्रवेशबंदी घातली आहे. वास्तविक श्रीरामसेनेमुळे गोव्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्‍न निर्माण झालेला नसतांना भाजप सरकारने वर्ष २०१२ पासून आजपर्यंत त्यांच्यावरील ही प्रवेशबंदी कायम ठेवली आहे; मात्र देशभर हिंदूंच्या विरोधात दंगली घडवणारे, हिंदूंची घरेदारे लुटणारे, हत्या आणि बलात्कार करणारे, जाळपोळ करणारे, तसेच आतंकवादी संघटनांशी घनिष्ठ संबंध असल्याचा संशय असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या संघटनेवर गोव्यात बंदी नाही. ‘पी.एफ्.आय.’ला गोव्यात कारवाया करण्यासाठी पूर्ण मोकळीक आहे.

२. मातृभाषेचे खच्चीकरण

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण धुडकावून राज्यात चर्च संस्था चालवत असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना शासन कोट्यवधी रुपये शासकीय अनुदान देते. याचा परिणाम म्हणून राज्यातील सुमारे ४५० मराठी आणि कोकणी या मातृभाषांतील प्राथमिक शाळा बंद पडल्या आहेत. हिंदु संस्कृती आणि परंपरा यांविषयी माहिती असलेला गोव्यातील भाजप गेल्या १० वर्षांपासून मातृभाषेचे खच्चीकरण करत आहे.