निवडणुका असणार्‍या राज्यांत नाही, तर महाकुंभला कोरोनाचा धोका कसा ? – शंकराचार्य जगद्गुरु स्वामी स्वरूपानंद सरस्वती

हरिद्वार (उत्तराखंड) – कोरोनाचा प्रसार त्याच राज्यांत झाला आहे, जेथे केंद्र सरकारला हवे आहे. बंगाल आणि आसाम राज्यांत निवडणुका आहेत; मात्र तेथे संक्रमणाचा कोणताही धोका नाही; मात्र सनातन धर्माच्या सर्वांत मोठे पर्व महाकुंभ मेळ्याला कोरोनाची भीती दाखवून भाविकांना येण्यापासून रोखले जात आहे. सरकार अशी भीती दाखवून स्वतःच्या दायित्वापासून पळू शकत नाही. कोरोनाचा धोका आहे, तर त्याच्यापासून संरक्षण करण्याचा उपाय केले पाहिजेत, अशी टीका द्वारका आणि शारदा पिठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी येथे केली. ते एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

शंकराचार्य पुढे म्हणाले की, कोरोनाविषयीचे नियम थोपून भाविकांना येण्यास रोखणे हा अन्याय आहे. सरकारने सीमेवर चाचणीची सोय केली पाहिजे. भाविकांनाही याविषयी जागृत असले पाहिजे. भारतात लोकशाही आहे. लोकशाहीत शासनकर्ते सेवक असतात; मात्र केंद्र सरकार पालक बनले आहे.

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये वेदांना न मानणार्‍यांची भरती !

शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी तीर्थक्ष्रेत्र ट्रस्टवर प्रश्‍न उपस्थित करत म्हटले की, सरकारने या ट्रस्ट मध्ये रा.स्व. संघाच्या लोकांची भरती केली आहे. संघाची लोक वेदांना नाही, तर भगव्या ध्वजाला हिंदूंचे प्रतीक मानत आहेत. जे वेदांना मानत नाहीत, ते मंदिराला कसे मानतील ? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.