आसाममध्ये भाजपच्या उमेदवाराच्या गाडीमध्ये ई.व्ही.एम्. यंत्र आढळल्याने ४ अधिकारी निलंबित

 एका मतदान केंद्रावर पुन्हा मतदान होणार !

गाडीमध्ये आढळलेले ई.व्ही.एम्.

नवी देहली – आसामच्या पाथरकंडी विधानसभा क्षेत्रात एका पांढर्‍या रंगाच्या बोलेरो गाडीमध्ये ई.व्ही.एम्. (इलेक्ट्रिक व्होटिंग मशीन) यंत्र आढळून आले आहे. विशेष म्हणजे गाडी भाजपचे आमदार आणि सध्याचे उमेदवार कृष्णेंदू पॉल यांची आहे, असे सांगण्यात येत आहे. यानंतर निवडणूक आयोगाने संबंधित ४ अधिकार्‍यांना निलंबित केले आहे. या गाडीमधील ई.व्ही.एम्.चा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. काँग्रेस आणि ए.आय.यु.डी.एफ्. यांनी हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे सांगत, ‘निवडणूक आयोगाने अन्वेषण करावे’, अशी मागणी केली आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनीही ट्वीट करून भाजपवर आरोप केले आहेत.

 

१ एप्रिलला मतदानानंतर रातबारी येथे नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक आयोगाच्या पोलिंग पथकाची गाडी बिघडल्याने रस्त्यात बंद पडली. यानंतर या पथकाने वरिष्ठ अधिकार्‍यांना वाहनासाठी विभागीय कार्यालयाला दूरभाष केला. त्यांना दुसर्‍या गाडीची व्यवस्था करत असल्याची सूचना दिली गेली; मात्र या पथकाने सरकारी गाडीची वाट न पहता एका खासगी गाडीची लिफ्ट घेतली. ही गाडी भाजप उमेदवार कृष्णेंदु पॉल यांची निघाली. ही गाडी स्ट्राँग रूमच्या परिसरात पोचताच विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ती ओळखली आणि त्यावर आक्रमण केले. यानंतर चालक आणि पथकाचे कर्मचारी पळाले. जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या साहाय्याने जमावावर नियंत्रण मिळवले. मतदान केंद्र १४९ वर पुन्हा मतदान करण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.