आपत्काळाची नांदी असलेल्या कोरोना महामारीच्या काळात ईश्‍वराच्या कृपेने प्रतिकूलतेतही सनातनचा विहंगम गतीने झालेला प्रसार !

२१ मार्च २०२१ या दिवशीच्या दैनिकात आपण ईश्‍वराची लीला त्याच्या भक्तांनाही अगम्य असणे, आनंदवृद्धी करणारे सनातनचे काही ‘ऑनलाईन’ उपक्रम !, घरोघरी साजरी झालेली आणि अविस्मरणीय ठरलेली वर्ष २०२० ची गुरुपौर्णिमा, बालसंस्कार वर्ग, नामसत्संग-शृंखला आणि भक्तीमार्गातील अक्षर वाङमय असलेले ‘भाववृद्धी सत्संग’ यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा शेवटचा भाग येथे देत आहोत.

याआधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/461600.html

३. आध्यात्मिक स्तरावर साजरे झालेले सण

३ अ. सणांविषयी ‘सनातन प्रभात’मधून पुरोहितांनी केलेले मार्गदर्शन : यंदाचे सर्वच सण आध्यात्मिक स्तरावर साजरे झाले. प्रत्येक सणाच्या पूर्वी (उदा. नागपंचमी, श्रीकृष्णाष्टमी, रक्षाबंधन, गणेशचतुर्थी, नवरात्री, दसरा इत्यादी) ‘आपत्काळात हा सण कसा साजरा करू शकतो ?’ याविषयी धर्मशास्त्राचा आधार घेऊन पुरोहितांनी लिहिलेले लेख ‘सनातन प्रभात’ने वेळोवेळी प्रसिद्ध केले. त्यातून हिंदूंना सणांविषयी योग्य मार्गदर्शन मिळाले.

सौ. शालिनी मराठे

४. दैनिक ‘सनातन प्रभात’चे महत्त्वाचे योगदान !

४ अ.  दैनिक ‘सनातन प्रभात’, म्हणजे आत्मचैतन्याचे पोषण करणारे कामधेनूचे दुग्धामृत ! : परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘आत्मचैतन्याचे पोषण करणारे, पुष्टीसह तुष्टी आणि शांती देणारे’ दैनिक ‘सनातन प्रभात’रूपी कामधेनूचे दुग्धामृत पृथ्वीवरील सर्व जिवांसाठी उपलब्ध करून दिले आहे. ते प्रतिदिन प्राशन केल्याने निर्माण झालेले ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांच्या बळावर आपत्काळानंतर पृथ्वीवर शांती निर्माण करणारे हिंदु राष्ट्र स्थापन होणार आहे. त्यासाठी श्रीमन्नारायणाने ते सामाजिक माध्यमांवर जगातील सर्व साधक, धर्मनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी विविध भाषांतून या दळणवळण बंदीच्या काळातही उपलब्ध करून दिले आहे. केवढी ही गुरुकृपा !

५. आपत्काळात सनातनचे सर्वच उपक्रम बहरणे

कोरोना महामारीच्या या आपत्काळात प्रतिकूलता असूनही ग्रंथ वितरण, पंचांग वितरण, सात्त्विक वस्तूंचे वितरण, विविध शिबिरे, गटचर्चा, व्याख्याने, चर्चासत्रे, आढावे, धर्मशिक्षण वर्ग, हिंदु अधिवेशने, असे सर्वच उपक्रम बहरले. थंडीत काजू अन् आम्रवृक्ष बहरावेत आणि पुढे त्यांना भरघोस फळे यावीत, तसेच हे झाले.

६. ‘धर्म-अधर्मा’च्या या लढ्यात प्रत्येक जिवापर्यंत पोचण्यासाठी जणू धर्म स्वतःच ‘ऑनलाईन’ प्रसाराच्या माध्यमातून साकार झाल्याने सर्वत्र विश्‍वव्यापक धर्मप्रसार होत असल्याचे जाणवणे

संध्याकाळच्या वेळी इंद्रधनुष्याचे विविध रंग पसरून काही क्षणांतच आकाश त्या रंगांनी व्यापले जाते किंवा पावसाळ्यात असंख्य जलधारांनी धरणीमाता न्हाऊन निघते. त्याप्रमाणे ईश्‍वराच्या कृपेने या आपत्काळात विविध सामाजिक माध्यमांतून विश्‍वव्यापक धर्मप्रचार होत आहे. धर्म-अधर्माच्या या लढ्यात प्रत्येक जिवापर्यंत पोचण्यासाठी जणू धर्म स्वतःच ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून साकार होत आहे.

७. ‘ऑनलाईन’ प्रसारातून साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे

अ. ‘मी किंवा आम्ही प्रसार करतो’, हा साधकांचा अहं नष्ट होऊन ईश्‍वरच कर्ता आहे’, याची अनुभूती साधकांना घेता आली.

आ. विज्ञान वाईट नाही, तर त्याचे ‘सुयोग्य नियोजन करणारा’ दुर्मिळ आहे. ‘ऑनलाईन’मुळे पूर्वीपेक्षा २५ पटींनी प्रसार वाढला. या आपत्काळात वेग, गुणवत्ता आणि परिणामकारकता याने प्रसाराचा उच्चांक गाठला. मुले, नातवंडे यांच्याप्रमाणे वयस्करही भ्रमणभाष हाताळायला शिकून प्रसारसेवेत सहभागी झाले.

इ. माणसांसाठी आपत्काळ असतो. ईश्‍वर तर ‘महाकाळ’ आहे. तो कालातीत असून काळाचा निर्माता आहे. त्यामुळे ‘ईश्‍वरासाठी सर्वच संपत्काळ आहे’, हे त्याच्या भक्तांनी पुन्हा एकदा अनुभवले.

ई. प्रसार इतक्या वेगाने झाला की, ‘गरुडझेप’ किंवा ‘विहंगम गती’ म्हणजे काय ?’ ते या प्रसारातून साधकांना समजले. साधकांना या प्रतिकूल परिस्थितीत ‘मनोवेग किंवा वायूवेग’ पहायला मिळाला.

उ. यावरून ‘देवाला काहीच अशक्य नाही. त्याच्या कृपेने काहीही घडू शकते’, हे पाहून साधकांच्या मनातील श्रद्धा अधिक दृढ झाली.

८. कृतज्ञता

‘गुरुदेव, तीव्र आपत्काळ चालू होण्यापूर्वी त्याची नांदी असलेल्या कोरोनाच्या या आपत्काळात सनातन धर्म आणि सनातनचे कार्य प्रत्येक जिवापर्यंत पोचवण्यासाठी ‘ऑनलाईन’ प्रसारातून तुम्ही आम्हाला ‘विहंगम प्रसार कसा असतो ?’ याचे दर्शन घडवले. त्यासह ‘देवच सर्वकाही करत असतो आणि आत्मबळही तोच देऊ शकतो’, याची अनुभूतीही दिली.’ या तुमच्या कृपेसाठी अनंत कृतज्ञता !’

(समाप्त)

– गुरुचरणी शरणागत, सौ. शालिनी मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.११.२०२०)

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चैतन्यमय वाणीतून सणांविषयी मिळालेले मार्गदर्शन

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चैतन्यमय वाणीतून साप्ताहिक भाववृद्धी सत्संगांमधून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे सर्वच सण आध्यात्मिक स्तरावर साजरे होणे :

प्रत्येक सणाच्या कालावधीत ‘त्या सणाचे महत्त्व, संबंधित देवतेची गुणवैशिष्ट्ये, भावाच्या स्तरावर सण साजरा करून त्याचा लाभ कसा घ्यायचा ? आपली साधनावृद्धी करून या सणातील आनंद आणि चैतन्य कसे मिळवायचे ? साधकांसाठी हा कृतज्ञता काळ असून त्यासाठी स्वतःमधील कृतज्ञता आणि शरणागती वाढवून ईश्‍वराचे अनन्य भक्त कसे बनायचे ?’ याविषयीचे मार्गदर्शन साप्ताहिक भाववृद्धी सत्संगांमधून श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मुखातून ऐकता आले. त्यामुळे यंदाचे सर्व सण अंतर्मुख होऊन, देवाच्या अनुसंधानात राहून आणि आध्यात्मिक स्तरावर आनंद अन् चैतन्य अनुभवत भावावस्थेत साजरे झाले. आपत्काळ असूनही या वर्षी प्रथमच सणांच्या माध्यमातून सर्वांनाच फार आनंद मिळाला. ‘श्री महालक्ष्मीमाते (श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताई), तुझ्या या अनन्य कृपेसाठी कोटीशः कृतज्ञता !’

२. पितृपक्षाचे महत्त्व कळून भावपूर्ण आणि श्रद्धेने विधी होणे :

श्री दत्तगुरूंचे कार्य, दत्ताच्या नामजपाचे महत्त्व, वासनांमुळे अडकणारे पूर्वजांचे लिंगदेह, त्यामुळे त्यांच्या वंशजांच्या साधनेत येणार्‍या अडचणी, प्रत्येक जिवावर असलेले पितृऋण, त्यातून मुक्त होण्यासाठी आणि कृतज्ञता म्हणून श्राद्ध अन् महालय श्राद्ध करायची देवाने दिलेली संधी, ‘संत एकनाथांच्या घरी पितृपक्षात प्रत्यक्ष पितर येऊन जेवल्याची भावस्पर्शी कथा’ इत्यादी अनेक सूत्रे भाववृद्धी सत्संगाच्या वेळी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मुखातून ऐकून सर्वांना चैतन्य आणि प्रेरणा मिळाली. त्यामुळे घरोघरी पूर्वीच्या तुलनेत हे विधी भावपूर्ण आणि श्रद्धेने करण्यात आले. त्यामुळे पूर्वजांना गती मिळून ते आनंदी होऊन त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देत असल्याची अनुभूतीही अनेकांनी घेतली. ‘गुरुदेव, या भाववृद्धी सत्संगातून तुम्हीच समाजाला धार्मिक बनवून धर्माचरण करवून घेत आहात. तुमच्या या अनंत कृपेसाठी अनंत कृतज्ञता !’

३. नवरात्रीचा जागर !

३ अ. नवरात्रीत श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चैतन्यमय वाणीतून ‘देवीमहात्म्य’ ऐकतांना शक्तीचा जागर होणे : श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या माध्यमातून श्री महालक्ष्मीदेवीने नवरात्रीच्या काळात विश्‍वभरच्या तिच्या भक्तांना ‘दैवी भक्तीरसामृत’ पाजले. ९ दिवस प्रतिदिन १ घंटा मिळालेला हा भावसत्संग ही या वर्षीची श्री गुरूंची विशेष कृपा होती. जिच्याविना शिवही ‘शव’ होतो, अशा जगदंबा मातेच्या शक्तीचा जागर करून प्रत्यक्ष श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनीच जिज्ञासूंच्या हृदयांत भक्तीची ज्योत लावली. श्री दुर्गामातेच्या ९ रूपांचे वर्णन, तिचे दैत्यनाशाचे कार्य, अनेक सुंदर कथा, स्तोत्रे, आरती, जोगवा, गोंधळ हे सर्व ‘देवीमहात्म्य’ श्री सरस्वतीमातेच्या (श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या) चैतन्यमय वाणीतून ऐकतांना सर्वांना ‘नवरात्रीचे ९ दिवस कधी संपले ?’, हे कळलेच नाही. आपत्काळात देवीच भक्तांना  तारून नेणार आहे. त्यासाठी तीच सर्व भक्तांच्या अंतःकरणात शक्तीचा जागर करत होती. हे सर्व तिचेच नियोजन होते.

३ आ. श्री देवीच्या कृपेला पात्र होण्यासाठी केलेली भावपूर्ण प्रार्थना ! : श्रीगुरूंसारखा त्राता असतांना भीती कसली ?; पण जगदंबेची लेकरे बनून जगण्याची पात्रता अंगी निर्माण होण्यासाठी आणि विहंगम गतीने भक्तीभाव वाढवून तो टिकवून ठेवण्यासाठी आपण सर्व आई जगदंबेला शरण जाऊया आणि तिला आळवूया.

माते, श्री गुरूंसाठी हिंदु राष्ट्र तू लवकरी आण गं ।
‘जय जय माते, जगदंबे, तू  दुर्गा गं ।
जय जय माते, शिवप्रिये, तू काली गं ॥ १ ॥

चैतन्याने आत्मज्योत तू पेटव गं ।
आमुच्या हृदयी शक्ती अन् भक्ती तू जागव गं ॥ २ ॥

कलिकाळाला शीघ्रगतीने तू घालव गं ।
श्री गुरूंसाठी हिंदु राष्ट्र तू (लवकरी) आण गं ॥ ३ ॥

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सर्व साधकांच्या मनात भक्तीभाव निर्माण करून आणि त्यांच्यातील साधकत्व (हिंदुत्व) जागवून त्यांच्या मनात धर्मसंस्थापना केली ! श्री गुरुकार्यासाठी धाव घेणार्‍या आणि करुणामयी अशा श्री लक्ष्मीमातेच्या चरणी आम्ही तिची लेकरे कोटीशः कृतज्ञ आहोत !

३ इ. सनातनच्या ‘चैतन्यवाणी’ या ‘अ‍ॅप’मुळे लोकांना ‘श्री गणेशपूजा, आरत्या, स्तोत्रे, यांद्वारे प्रत्यक्ष साहाय्य होणे : सण-उत्सवांच्या या कालावधीत ‘श्री गणेश पूजा, आरत्या, स्तोत्रे, नामजप यांनी युक्त असे सनातनचे ‘चैतन्यवाणी’ हे ‘अ‍ॅप’ सर्वांसाठी उपलब्ध झाले. त्यामुळे पूजेसाठी ब्राह्मण मिळाला नाही, तरी त्याची उणीव भरून निघाली. ‘या संकटकाळात जिथे तिथे देव साहाय्याला आहे’, हे हिंदूंनी अनुभवले. भगवंता, या तुझ्या कृपेसाठी अनंत कृतज्ञता !

या लेखात/ कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक