मेजर जनरल डॉ. जी.डी. बक्षी लिखित ‘अ हिस्टरी ऑफ हिंदुइझम’ पुस्तकाचे प्रकाशन !
मुंबई – हिंदु धर्माविषयीची माहिती व्हावी, यासाठी सहज हाताळता यावे असे एक पुस्तक आवश्यक आहे. सर्व काही एका खंडात समाविष्ट करणे शक्य नाही. हिंदु धर्मात आपल्याला अनुभव घ्यावा लागतो. ‘अहं ब्रह्मास्मि’ ही केवळ एक संकल्पना नाही, तर ती अनुभवली पाहिजे. आपल्याला आतापर्यंत चुकीचा इतिहास शिकवला गेला आहे. हिंदूंवर कसा छळ झाला, त्यांची संस्कृती कशी नष्ट केली गेली, नालंदा विद्यापीठ कसे नष्ट केले, अशा अनेक घटना यात आहेत. हिंदूंना आपल्या मुळांकडे परत जाण्याची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन मेजर जनरल (निवृत्त) डॉ. जी.डी. बक्षी यांनी केले. त्यांनी लिहिलेल्या ‘अ हिस्टरी ऑफ हिंदुइझम’ या पुस्तकाचे जुहू, मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
इस्कॉन टेंपल, जुहू, मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात मेजर जनरल डॉ. जी.डी. बक्षी (निवृत्त) यांची सनातन संस्थेचे साधक श्री. महेश पेडणेकर, श्री. अशोक दाभोळकर आणि सौ. लता भट यांनी भेट घेतली. या वेळी त्यांना सनातन संस्थेचे देशभरात चालू असलेले कार्य, तसेच संस्थेचे संशोधनाचे कार्य यांची माहिती दिली. मेजर जनरल डॉ. बक्षी (निवृत्त) यांनी संशोधन कार्यात रूची दाखवली आणि आनंद व्यक्त केला. त्यांनी सनातनच्या आश्रमाला भेट देण्याचे आश्वासन दिले.