
भारताचा १८ वर्षीय बुद्धीबळपटू दोम्माराजू गुकेश हा नुकताच विश्वविजेता ठरला. गुकेश हा विश्वनाथन आनंद यांच्यानंतर विश्वविजेता ठरणारा दुसरा भारतीय झाला आहे. त्याच्यावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव झाला. इतक्या लहान वयात त्याने हे घवघवीत यश प्राप्त केले, यासाठीही त्याचे अभिनंदन करण्यात आले. इतके मोठे यश संपादित करणे, ही काही साधी गोष्ट निश्चितच नाही. त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावेच लागतात. गुकेशनेही ते केलेच आहेत; पण त्यातील एक विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्याने सामाजिक माध्यमांचा वापर करणे टाळले ! खेळाशी संबंधित जितके आवश्यक आहे, तितक्याच गोष्टींसाठी तो सामाजिक माध्यमांवर अवलंबून होता. अन्य गोष्टींसाठी किंवा मनोरंजन, करमणूक यांसाठी त्याने सामाजिक माध्यमांकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे त्याला त्याच्या खेळात पूर्णपणे एकाग्रता साधता आली आणि हे यश स्वतःकडे खेचून आणता आले. सध्याची पिढी काय करते ? ती तर संपूर्णतः सामाजिक माध्यमांकडेच ओढली गेलेली आहे. त्याच्या वापरातच ही पिढी गढून गेलेली आहे. एक मिनिटही त्यापासून दूर जाणे काहींना जमत नाही. काही तरुण-तरुणी तर सामाजिक माध्यमरूपी व्यसनांच्या अधीन झालेले आहेत. त्यामुळे अशांना कुठला आला आहे उत्कर्ष आणि कुठली अपेक्षित असणार प्रगती ? जीवनाचा बोजाबिस्तारा सामाजिक माध्यमांतच जणू काही गुंडाळून टाकलेला आहे. अशांना यश कसे मिळणार ? यशोशिखर गाठणे तर दूरच; पण त्यांची पावले उलट दिशेनेच पडतात. त्यामुळे अशा मुलांना कुणीही रोखू शकत नाही. अशा सर्वांनीच गुकेश याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आता वाटचाल करायला हवी. भारताची प्रगती करणे, हे आजच्या तरुण पिढीच्याच हाती आहे. जे गुकेशला जमले, ते आजच्या पिढीतील युवक-युवतींनाही जमूच शकते. केवळ त्यांनी इच्छाशक्ती बाळगायला हवी आणि निश्चय करायला हवा. तसे झाल्यास यश निश्चित त्यांच्या पदरी पडेल, यात शंका नाही.
नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेली नेहा ब्याडवाल हिला प्रथम अपयश आले होते. नंतर तिने ३ वर्षे स्वतःला सामाजिक माध्यमांपासून दूर ठेवले. त्यांच्या आहारी जाणे तिने स्वतःहून टाळले. महत्त्वाची कामे वगळता तिने भ्रमणभाषचा वापरही अतिशय अल्प प्रमाणात केला. या काळात ती तिच्या मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात नव्हती. त्यामुळे तिला अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे शक्य झाले. या कठोर मेहनतीचा परिणाम म्हणूनच तिला यश प्राप्त झाले आणि ती वयाच्या २४ व्या वर्षी आय.ए.एस्. अधिकारी झाली ! नेहा आणि गुकेश यांची उदाहरणे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. तरुण पिढीने त्यांच्याप्रमाणे मनोनिग्रह केल्यास प्रत्येकाला यशोशिखर गाठता येईल, हे निश्चित !
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.